Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 June 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २७ जून २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना
आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल
जरी झाले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
**
देशभरात डेल्टा प्लस कोरोना विषाणू संसर्गाचे
५० रुग्ण; प्रतिबंधित उपाय आणि संपर्कातील व्यक्ती शोधण्याचं काम वाढवण्याच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
** इतर मागासवर्गीयांच्या राजकीय
आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचं राज्यभरात
ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन; याच
मागणीसाठी काँग्रेसचंही
केंद्र सरकारविरूद्ध धरणे आंदोलन
**
खासगी आणि नागरी सहकारी
बँकावर कार्यकारी अथवा पूर्णवेळ संचालक पदावर लोकप्रतिनिधींच्या नियुक्तीला भारतीय
रिझर्व बँकेचा प्रतिबंध
** राज्यात
नऊ हजार ८१२ नवे कोविड रुग्ण;
मराठवाड्यात १३ जणांचा मृत्यू तर ४३८ बाधित
** माजी
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या
दोन्ही स्वीय सहायकांना १
जुलैपर्यंत पोलिस कोठडी
आणि
** कोरोना
विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या स्तराचे निर्बंध
लागू करण्याबाबत संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्याकडून आदेश जारी
****
देशभरात डेल्टा प्लस कोरोना विषाणूने बाधित ५० रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. महाराष्ट्र, मध्य
प्रदेश, तमिळनाडु, पंजाब, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश,
ओडीशा, राजस्थान, जम्मू
आणि काश्मीर आणि कर्नाटक या राज्यांमधील हे रुग्ण असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि
कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. डेल्टा प्लस प्रकारचा विषाणू आणखी पसरु नये
यासाठी प्रतिबंधित उपाय आणि संपर्कातील व्यक्ती शोधण्याचं
काम वाढवावं, अशा सूचना केंद्रीय आरोग्य सचिव, राजेश भूषण यांनी तमिळनाडु, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक,
पंजाब, जम्मू आणि काश्मीर तसंच हरियानाच्या मुख्य
सचिवांना पत्राद्वारे केल्या आहेत.
****
इतर
मागासवर्गीय- ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा
कायम व्हावं यासाठी भारतीय जनता पक्षानं काल राज्यभरात
ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं.
महा विकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय
आरक्षण रद्द करण्यात आलं, उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही मागासवर्गीय आयोग
स्थापन करण्यात या सरकारनं कमालीचा विलंब केला म्हणून हे आरक्षण रद्द करण्याचा
निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांनी केली आहे. ते नागपूर इथं झालेल्या आंदोलनावेळी बोलत होते. ते म्हणाले…..
सुप्रीम
कोर्टाने सेन्सस डाटा मागितलेला नाही, इम्पिरिकल डाटा मागितला आहे. जो राज्य मागासवर्ग
आयोगच तयार करु शकते. पण यांना २०२२ च्या निवडणूकापर्यंत ओबीसीला आरक्षण द्यायच नाहीये.
महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय यांना करायच्या आहेत. पण भारतीय
जनता पार्टी रस्त्यावर उतरली आहे. आम्ही आज रास्ता रोको केला आहे. जेल भरो केला आहे.
पंरतू यानीच आम्ही थांबणार नाही.जोपर्यंत ओबीसीला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमची
लढाई सुरुच राहील.
बीड जिल्ह्यात खासदार
प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वात परळी इथं आंदोलन झालं. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून बहुजन
समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. परभणीत जिंतूर रस्त्यावरील
महाराणा प्रताप चौकात जोरदार रस्तारोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे या
महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घोषणाबाजी करणाऱ्या
कार्यकर्त्यांना पोलिसांनी नंतर ताब्यात घेतलं. हिंगोलीत नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या नेतृत्वात तर
नांदेड इथं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, महानगराध्यक्ष
प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली नांदेड - हैद्राबाद आंतरराज्य महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. या
मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जालना शहरात आमदार संतोष दानवे यांच्या
नेतृत्त्वात अंबड चौफुली इथं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे चारही
बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. लातूरमध्ये आमदार
संभाजी पाटील निलंगेकर आणि जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वात तर उस्मानाबाद जिल्ह्यात आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या
नेतृत्वात आंदोलन झालं. औरंगाबादमध्ये खासदार डॉक्टर भागवत
कराड, आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं. पोलिसांनी
काही आंदोलकांना यावेळी अटक केली.
मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, बुलडाणा,
धुळे, गोंदिया, अहमदनगर,
चंद्रपूर जिल्ह्यातही काल आंदोलन करण्यात आलं.
****
भारतीय
राष्ट्रीय काँग्रेसनंही काल याच मागणीसाठी केंद्र सरकारविरूद्ध ठिकठिकाणी धरणे आंदोलन केलं.
हिंगोलीत काँग्रेसच्यावतीनं केंद्र सरकारविरुद्ध गांधी चौक भागात आंदोलन
करण्यात आलं. भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं हे आंदोलन केलं.
ओबीसींचा इम्पिरिकल डाटा देण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांच्याकडे पत्राद्वारे मागितली
होती. ती अजूनही दिली गेली नाही. तरीही फडणवीस यावरून जनतेची दिशाभूल करीत
असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
नांदेड इथंही काँग्रेसच्यावतीनं केंद्र सरकारविरुद्ध
आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या आंदोलनाचं
नेतृत्व केलं. केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधार्थ
छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबाद इथं राजर्षी शाहु महाराज यांच्या पुतळ्याला
अभिवादन करुन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत धरणे आंदोलन केलं. परभणी इथं आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वात तर
उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षातर्फे
धरणे आंदोलन करण्यात आलं. लातूर इथं महापौर विक्रम गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात
धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
खासगी आणि नागरी सहकारी
बँकावर कार्यकारी अथवा पूर्णवेळ संचालक पदावर लोकप्रतिनिधींच्या नियुक्तीला भारतीय
रिझर्व बँकेनं प्रतिबंध केला आहे. याबाबत बँकेनं नवी
नियमावली जारी केली असून आता खासदार-आमदार, नगरसेवक-स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांना बँकेच्या संचालक
मंडळावर राहता येणार नाही. याचबरोबर संचालक पदासाठी वय, शिक्षण, अनुभव यांचीही अट असणार आहे. तसंच, व्यापार -उद्योग यांच्याशी संबंधित विविध आस्थापनांमध्ये भागीदारी असणाऱ्या व्यक्तिंनाही कार्यकारी अथवा पूर्णवेळ संचालक पदी नियुक्ती करता येणार नाही. रिझर्व
बँकेनं जारी केलेल्या आदेशानुसार आता नागरी सहकारी बँकाच्या संचालकांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असणार आहे. तो
वाढवण्यासाठी रिझर्व बँकेची परवानगी आवश्यक असणार आहे. पाच हजार कोटींहून अधिक
व्यवसाय असणाऱ्या नागरी सहकारी बँकांना आता मुख्य जोखीम
अधिकारी नियुक्त करावा लागणार आहे.
****
राज्यात काल नऊ हजार ८१२ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे
राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६० लाख २६ हजार ८४७ झाली आहे. काल १७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण
संख्या, एक लाख २० हजार ८८१ झाली आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर २ टक्के एवढा आहे. काल आठ हजार ७५२ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ५७ लाख ८१ हजार ५५१ रुग्ण,
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९५ पूर्णांक ९३ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख २१ हजार २५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ४३८ कोविड बाधितांची नोंद झाली, तर १३ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. बीड, हिंगोली आणि
नांदेडमध्ये काल एकही मृत्यू झाला नाही. मृतांमध्ये औरंगाबाद आणि
लातूर जिल्ह्यात प्रत्येकी चार, जालना ३, तर परभणी आणि
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश
आहे.
बीड जिल्ह्यात १५६
नवे रुग्ण आढळले. तर औरंगाबाद ७६, उस्मानाबाद
७०, लातूर ६२, परभणी ३४, जालना ३१, नांदेड ७, आणि हिंगोली जिल्ह्यात दोन
नवे रुग्ण आढळले.
****
सामाजिक सुधारणा करून सर्वांना समान न्याय देण्यासाठी आग्रही असणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची जयंती
सामाजिक न्याय दिन म्हणून काल
साजरी करण्यात आली.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या
जयंती निमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव संस्था-सारथीच्या
पहिल्या उपकेंद्राचं कोल्हापूर इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल
ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. मराठा समाजाला न्याय
देण्यासाठी आपलं सरकार कटिबध्द आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी म्हणाले.
सरकार म्हणून जे जे करता येणे शक्य आहे, ते
सर्व करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आरक्षणाच्या अनुषंगाने कायद्याची लढाई शासनानं सोडली नसल्याचं सांगून दीन दुबळ्यांना ताकद देण्याचं काम महाविकास आघाडी
करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. खासदार संभाजीराजेंनी राज्यातील पहिलं उपकेंद्र
कोल्हापूरात सुरु केल्याबद्दल सरकारचे आभार मानले.
बीड जिल्हाधिकारी कार्यालय, तसंच नांदेड जिल्हा
पोलीस अधीक्षक कार्यालयात काल छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ७८ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरून, तसंच न्यूज-ऑन-ए-आय-आर डॉट कॉम हे संकेतस्थळ आणि न्यूज-ऑन-ए-आय-आर या मोबाईल अॅपवरून या
कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसऱ्या स्तराचे
निर्बंध लागू करण्याबाबत संबंधित जिल्ह्यांच्या
जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी केले जात आहेत. जालना जिल्ह्यात आजपासून पुन्हा अंशत: निर्बंध लागू करण्यात
आले आहेत. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकरी अंकुश पिनाटे यांनी काल
जारी केले. नवीन निर्बंधांनुसार औषधी दुकाने वगळता अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने
दररोज दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार असून, इतर
सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारवाजेपर्यंत तर शनिवारी आणि रविवारी
पूर्णत: बंद राहणार आहेत. लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना
परवानगी असेल. मॉल्स, सिनेमा हॉल, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहणार
आहेत. उपहारगृह सोमवार ते शुक्रवार दुपारी चारवाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू
राहतील तर दुपारी चार ते रात्री नऊवाजेपर्यंत केवळ पार्सल सुविधा सुरू राहील.
सार्वजनिक मैदाने पहाटे पाच ते सकाळी नऊपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले राहणार
आहेत. शासकीय आणि खाजगी वाहतूक नियमितपणे सुरू राहणार आहे. नागरिकांनी कोविड
नियमांचं पालन करावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
नांदेड, परभणी
आणि लातूर जिल्ह्यातही अशाच प्रकारचे निर्बंध लावण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नांदेडचे
जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटणकर आणि परभणीचे
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी
येत्या सोमवारपासून आणि लातूरचे
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी कालपासून हे आदेश लागू केले आहेत.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक
कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
सुनावण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं
त्या दोघांना शुक्रवारी रात्री अटक केली होती आणि काल विशेष न्यायालयात हजर केलं
होतं. त्यावर संचालनालयाच्या वकिलांनी सादर केलेले पुरावे, कागदपत्रं
आणि दावे या पार्श्वभूमीवर न्यायालयानं दोघांना १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी
सुनावली आहे.
दरम्यान, इडीकडून देशमुख आणि त्यांच्या मुलाला
काल कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, ते
उपस्थित राहिले नाहीत. उपस्थित राहू शकणार नसल्याचं देशमुख यांनी पत्र
लिहून कळवल्याची माहिती संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आकाशवाणीसोबत बोलताना दिली.
पुढच्या कारवाई संदर्भात अजून निर्णय झाला नसल्याचं अधिकाऱ्यांनी
सांगितलं.
****
जालना शहरातल्या मोतीबाग उड्डाणपुलावर काल
दुपारी भरधाव आयशर ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण
ठार, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. विनोद नवनाथ गोरे, असं
अपघातातल्या मृताचं नाव असून, ते औरंगाबादमधल्या गारखेडा इथले रहिवासी आहेत. तर
सिध्देश्वर देशमुख, असं गंभीर जखमीचं नाव असून, त्याच्यांवर
औरंगाबाद इथं खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर
काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पावसानं हजेरी लावली. कळमनुरी, वसमत तालुक्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाल्यानं पिकाला जीवदान मिळालं आहे.
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातही काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. या
पावसामुळे पिकांना आधार मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील जवळा बाजार इथं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं
काल एका गोदामातून १ लाख ३९ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या गुटख्याचा साठा
असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
//***************//
No comments:
Post a Comment