आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ जून
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
आर्थिक
गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयानं
आज हजर होण्यासंदर्भात समन्स बजावलं आहे. ईडीनं काल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर
इथल्या निवासस्थानांवर छापे मारल्यानंतर त्यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे आणि कुंदन
शिंदे यांना अटक केली.
****
कोकण
रेल्वे मार्गावर रत्नागिरीजवळ रुळावरून घसरलेलं राजधानी एक्स्प्रेस गाडीचं इंजिन पुन्हा
मार्गस्थ करण्यात कोकण रेल्वेला यश आलं आहे. ही गाडी रत्नागिरीच्या दिशेनं रवाना झाली
असून, कोकण रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येत आहे. आज पहाटे सव्वाचार वाजता दिल्लीहून
मडगावकडे निघालेल्या या विशेष गाडीचं इंजिन रुळावर दरड कोसळल्यामुळे घसरलं होतं.
****
राजर्षी
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. शाहू
महाराज यांचे सामाजिक न्यायाचे विचार मार्गदर्शक असून, त्या विचारांवरच राज्याची आजही
वाटचाल सुरु आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या
कार्याचं स्मरण करुन त्यांना अभिवादन केलं.
****
इतर
मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यभर
चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात आकाशवाणी चौकात भाजप कार्यकर्त्यांच्या
वतीनं आंदोलन करण्यात आलं. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला
होता.
****
देशभरातल्या
हजारो तरूणांना नोकरीचं अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा मास्टर माईंड असलेल्या
आरोपीला हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत पोलिसांनी काल रात्री आंध्र प्रदेशातल्या कर्नुल
भागातून ताब्यात घेतलं. शैलैशकुमार दुबे असं त्याचं नांव असून, तो उत्तर प्रदेशचा रहिवाशी
आहे. या प्रकरणात मोठं रॅकेट हिंगोलीची गुन्हे शाखा आणि वसमत पोलिसांनी उघडकीस आणलं
आहे.
****
परभणी
जिल्ह्यात पालम तालुक्यात केरवाडी ते गणेशवाडी या रस्त्यावरील खड्डे ग्रामस्थांनी लोकसहभागातून
बुजवले आहेत. या रस्त्याच्या डांबरीकरणाची अनेकदा मागणी करुनही ते झालं नाही. या गावांना
दळणवळणासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे ग्रामस्थांनीच हे काम केल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment