Monday, 28 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविड-19 बाधित रुग्णांना किंवा या संसर्गानं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना आयकरातून सूट देण्याचा निर्णय, केंद्र सरकारने घेतला आहे. वर्ष २०१९-२० मध्ये आणि त्यानंतरच्या वर्षात, करदात्याला कोविडच्या वैद्यकीय उपचारांसाठी त्याच्या नियोक्त्याकडून अथवा इतर कोणत्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळाली असल्यास, या रकमेला करातून सवलत देण्यात येणार आहे. तसंच एखाद्या व्यक्तीचा वर्ष २०१९ -२० आणि त्यानंतरच्या वर्षात कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास, त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना, त्यांच्या नियोक्त्या कंपनीकडून मिळालेल्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेवर, कर आकारला जाणार नाही, असं आयकर विभागानं सांगितलं आहे.

****

देशात काल नव्या ४६ हजार १४८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९७९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी दोन लाख ७९ हजार ३३१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ९६ हजार ७३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ५८ हजार ५७६ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत दोन कोटी ९३ लाख नऊ हजार ६०७ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या पाच लाख ७२ हजार ९९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असून, महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत कर्नाटक पोलिसांनी तात्पुरते चेक नाके उभारले आहेत. त्यामुळे सीमा भागात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा इथल्या कसगी सीमावर्ती जागेवर कर्नाटक पोलिसांनी सीमा तपासणी चेक नाके उभारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला स्थानिक शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला. उमरग्याचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या सूचनेनुसार शिवसैनिक रस्त्यावर उतरले. चौगुले यांनी याबाबत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. जिल्हाधिकार्यांनी या भागात महसुली हद्दीत असे प्रकार करण्यास कर्नाटक पोलिसांना कायदेशीररित्या रोखावं, तसेच सामाजिक सलोखा राखावा, अशी मागणी आमदार चौगुले यांनी केली आहे.

****

राज्यातल्या उद्योगांना सुरु असलेली वीज दरातील सवलत यापुढेही सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असून, यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. ते काल नागपूरमध्ये आयोजित बैठकीत बोलत होते. राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ, सुक्ष्म, लघु आणि मध्यम औद्योगिक घटकांना कशा पध्दतीनं होईल, या अनुषंगानं संगणकीय सादरीकरण यावेळी करण्यात आलं.

****

राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, देशभरातल्या एक हजार ८४६ स्टार्टअप्सनी या सप्ताहासाठी नोंदणी केली आहे. आरोग्यविषयक ३२०, शेतीविषयक २५२, शिक्षणविषयक २३८ अशा विविध क्षेत्रातील नवसंकल्पना सादर झाल्या असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

****

कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करताना वैद्यकीय प्राणवायूची कमतरता भासू नये, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याने प्राणवायू निर्मितीचे पुरेसे प्रकल्प जिल्ह्यातच सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना, आरोग्य विभागाने दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याला लागणाऱ्या एकंदर वैद्यकीय प्राणवायूपैकी ७० टक्के प्राणवायू हा द्रवरूपात, २० टक्के प्राणवायू हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून आणि उर्वरित दहा टक्के प्राणवायू हा ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून जमा करण्याचे निर्देश जिल्ह्यांना देण्यात आले आहेत.

****

वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य संघर्ष समितीनं आता आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनापासून नागपुरातल्या शहीद चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी विदर्भाच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप करत आता आरपारची लढाई सुरू करण्याचा इशारा, समितीच्या काल झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. सहा महिन्यानंतर होणारी नागपूर महानगरपालिकेची निवडणुक विदर्भ राज्य संघर्ष समितीच्या झेंड्याखाली लढवण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत झाला.

****

फ्रान्समध्ये पॅरिस इथं सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतानं काल तीन सुवर्ण पदकं पटकावली. मिश्र दुहेरी गटाच्या अंतिम फेरीत दीपिका कुमारी आणि अतनू दास या जोडीनं नेदरलँडच्या जोडीला पाच - तीन असं हरवलं. तर दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कोमलिका बारी यांच्या महिला रिकर्व टीम नं, मेक्सिकोला पाच -एक असं हरवत, सुवर्ण पदक जिंकलं. वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात भारताच्या अभिषेक वर्मानं अमेरिकेच्या क्रिस शाफचा पराभव करून, सुवर्णपदक पटकावलं.

****

No comments: