Sunday, 27 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 June 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

कोरोना प्रतिबंधक लसीविषयी भिती न बाळगता आणि कोणत्याही अफवांना बळी न पडता लस टोचून घेण्याचं तसंच इतरांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीच्या मन की बातया कार्यक्रमातून देशवासियांशी आज त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. हा या कार्यक्रमाचा ७८ वा भाग होता. मध्य प्रदेशातील एक ग्रामस्थ राजेश हिरावे यांच्यासोबत पंतप्रधानांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला. व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजमुळे आपण घाबरलो आणि लस घेतली नाही, असं ते म्हणाले. याला उत्तर देताना मोदी यांनी नागरिकांमधील लसीची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आपला आणि आपल्या आईच्या अनुभव सांगितला. नागरिकांमध्ये गैरसज आणि अफवा पसरवू नका. मी आणि माझ्या आईनेही लस घेतल्याचं ते म्हणाले. ज्या काही अफवा पसरल्या आहेत त्यात कुठलेही तथ्य नाही. आपल्या देशातील २० कोटींहून अधिक नागरिकांनी लसीचे डोस घेतले आहेत. यामुळे लसीबाबत गैरसमज करू नका आणि लस टोचून घ्या, असं आवाहन त्यांना यावेळी केलं. जपानच्या टोकीयो इथं प्रस्तावित आगामी ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर 'रोड टू टोकियो' या मोहिमे अंतर्गत देशाची ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी आणि त्यात सहभागी खेळाडूंच्या समर्थना जनतेला आवाहन करत खेळाडूंच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी यावेळी चर्चा केली. ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीसाठी पात्र ठरलेल्या, राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या एका छोट्या गावातला  प्रवीण जाधव बद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. मोल- मजुरी करणाऱ्या आईवडीलंच्या  कुटुंबातला प्रवीण कठिण संघर्षानंतर इथपर्यंत पोहोचल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

देशभरात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणांतर्गत प्राप्त आकडेवारीनुसार आता जवळपास  ३२ कोटी, १७ लाख नागरिकांना लसीची  मात्रा देण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत ६४ लाख, २५ हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या २४ तासांत ५० हजार चाळीस नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. सक्रीय रुग्णांचा दर आता एक शतांश ९४ टक्क्यांवर आला आहे. गेल्या ४५ दिवसांपासून नवे रुग्ण आढळण्यापेक्षा या संसर्गातून मुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देशात कोविड मुक्तीचा दर आता ९६ शतांश ७५ टक्के झाला आहे. तर, साप्ताहिक संसर्ग दर अडीच टक्क्यांहून थोडा जास्त असून तो दैनंदिन संसर्ग दराच्या जवळ आहे.    

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल एकूण २९ हजार ९३१ जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील ११ हजार ७८३ जणांनी तर शहरात १८ हजार १४८ जणांनी लस घेतली असल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सात लाख ८८ हजार ८२५ जणांचं कोविड लसीकरण झालं आहे. यामध्ये  ग्रामीण भागातल्या एकुण तीन लाख ६० हजार ५१७ आणि शहरातल्या चार लाख २८ हजार ३०८ जणांचं लसीकरण झालं आहे.

****

जम्मूच्या विमानतळ परिसरात काल रात्री दोन स्फोट झाले आहेत. या स्फोटांत दोन जण जखमी झाले असून त्यांना सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा परिसर उच्च सुरक्षा अंतर्गत येतो. पाच मिनिटांच्या अंतरानं दोन स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. या ठिकाणी भारतीय हवाई दलाचे स्टेशन मुख्यालय आणि जम्मूचे मुख्य विमानतळही आहे.

****

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्त वसुली संचालनालय - ईडीनं आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी परवा मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचं समन्स आज बजावलं. याआधी शनिवारी देशमुख यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं, मात्र त्यांनी वकिलांमार्फत वेळ मागून घेतला होता. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरूद्ध शंभर कोटीं रुपयांच्या खंडणीची तक्रार केली होती. या प्रकरणानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये चौकशी सुरू आहे. काल देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांना ईडीनं अटक केली असून न्यायालयानं त्यांना १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

****

भारतीय महिला नेमबाज मनु भाकर आणि पुरुष नेमबाज सौरभ चौधरी यांनी आंतराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत काल रौप्य पदक पटकावलं आहे. क्रोएशियातल्या ओसीजेक इथं आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या विश्व चषक स्पर्धेत या दोघांचा समावेश असलेल्या संघानं दहा मीटर एअर पिस्टल संमिश्र  प्रकारात हे यश मिळवलं. १२-१६ अशा  चार गुणांच्या फरकामुळं ते सुवर्णपदकापासून वंचित राहिले. भारतानं या स्पर्धेत  आतापर्यंत  दोन कांस्य पदकंही मिळवली आहेत. तर दूसरीकडे, भारताचा भाला फेकपटू निरज चोप्रा यानं फिनलँड मधील कुआरटेन स्पर्धेत काल कांस्य पदक पटकावलं. निरज यानं हे यश मिळवतांना ८६ पूर्णांक एकोणऐंशी मीटर अंतरावर भाला फेकल्याची नोंद झाली.

//***************//

No comments: