Saturday, 26 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

इतर मागासप्रवर्ग - ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतल्या मुलुंड चेकनाक्याजवळ भाजपा आमदार आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांसोबत चक्काजाम आंदोलन केलं. सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होणं हे महाविकास आघाडी सरकारचं अपयश असल्याचं, ते यावेळी म्हणाले. मंत्रालयासमोर भाजप नेते गिरीष महाजन यांच्या नेतृत्वात, कोल्हापूर इथं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुणे इथं पंकजा मुंडे, सांगली इथं आमदार गोपीचंद पडळकर, नंदुरबार आणि शहादा शहरात भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वात, आंदोलन करण्यात आलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं चक्काजाम आंदोलन केलं. जोपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही, असं ते म्हणाले. औरंगाबाद, नवी मुंबई, सोलापूर, सातारा, वर्धा याठिकाणीही भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

****

परमनंट अकाउंट नंबर - पॅन आधार क्रमांकाला जोडण्याची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. आयकर विवरणपत्रावर आणि पॅन नोंदणी करताना आधार क्रमांक आवश्यक असल्याचं अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे. बिनाव्याजाची विवाद से विश्वास तक या योजनेची मुदतही ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

****

विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून, शेतमालास योग्य हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विक्री व्यवस्थापन व्यवस्थेला बळकटी देणार असल्याचं, कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या मोहाडी इथं, शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन राजस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. आगामी काळात गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

लातूरच्या धर्तीवर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वमग्नता उपचार आणि पुनर्वसन केंद्र - ऑटिजम सेंटर उभारण्याचं विचाराधीन असल्याचं, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं उभारण्यात आलेल्या, देशातल्या पहिल्या ऑटिजम सेंटरचं उद्घाटन, काल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी मुंडे बोलत होते. या केंद्रामध्ये स्वमग्नता, बहुविकलांगता, सेलेवर पल्स, बुध्यांक मापन, अति चंचलपणा या सारख्या दिव्यांगत्वावर उपचार करण्यासाठी, तसंच अस्थिव्यंग असलेल्या बालकांना थेरपी देण्यासाठी सर्व अद्ययावत उपकरणं आणि तज्ज्ञ व्यक्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

****

ग्रामीण भागाच्या विकासासाठी १५ व्या वित्त आयोगाचा संपूर्ण निधी ग्रामपंचायतींना विकासात्मक कामं करण्यासाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी केली आहे. ते काल उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. इतर शासकीय फ्रंट वर्कर प्रमाणे मृत्यू पावलेल्या सरपंचांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मदत निधी देण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनं देणार असल्याचं ते म्हणाले. सरकारने या मागण्या मान्य न केल्यास सरपंच परिषदेच्या वतीनं मुंबईत तीव्र आंदोलन करण्यात येणार, असा इशाराही काकडे यांनी यावेळी दिला.

****

नांदेड शहरात पंधरा केंद्रावर कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. नांदेड शहरात आतापर्यंत एक लाख आठ हजार लाभार्थीनी लस घेतली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. शहरातल्या १८ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या शेळगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काल पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं. प्रत्येक नागरिकानं सामाजिक जबाबदारी ओळखून जर वृक्ष लागवड केली, तर वृक्ष लागवडीची मोहीम लोकचळवळ होईल, असं ते म्हणाले.

****

बीड जिल्ह्यात खरीप हंगामात आतापर्यंत ४३ टक्के पेरण्या झाल्या असून, यावर्षी देखील जिल्ह्यात एकदा शेतकऱ्यांनी पुन्हा सोयाबीनला पसंती दिली आहे. जिल्ह्यात लागवडी योग्य सात लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्र असून, यापैकी एक लाख १३ हजार ८५३ हेक्टरवर कापसाची, तर एक लाख २१ हजार १५८ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या साठवण तलावांची कामं तत्काळ मार्गी लावावीत, अशी सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाटबंधारे विभागाला केली आहेत. सिंचनाच्या सुविधा नसलेल्या भागात साठवण तलावासाठी शासनानं मान्यता दिलेली असूनही अनेक प्रकल्प अपूर्ण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

****

No comments: