Tuesday, 29 June 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जून २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** गणेशोत्सवासाठी राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी; यंदाही मिरवणुकांना बंदी

** तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपये निधी मंजूर

** औरंगाबाद नजिक वाळूज महागनर प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाची सिडको प्रशासन आणि औरंगाबाद महानगरपालिकेला नोटीस

आणि

** जालना जिल्ह्यात आज दिवसभरात चार कोविडग्रस्तांचा मृत्यू

****

आगामी गणेशोत्सवासाठी राज्यशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींची उंची चार फूट तर घरगुती गणेश मूर्तींची उंची दोन फुटांपर्यंत असण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरगुती गणेश मूर्ती धातू अथवा संगमरवरी असण्याला प्राधान्य द्यावं, असं सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना गणपती आगमन तसंच विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. घरगुती गणपतींचं विसर्जन शक्यतो घरीच करावं, लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाच्या कृत्रीम तलाव परिसरात जाऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव काळात भाविकांची गर्दी होणार नाही, याकडे लक्ष द्यावं, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबीरांसारखे आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत, ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

****

कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम, महिला आणि बाल विकास विभाग शासन हाती घेत आहे. यासाठी आज महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दोन सामंजस्य करार करण्यात आले. कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांचं शालेय शुल्क, त्यांना शिक्षणाकरिता लागणारे टॅब, लॅपटॅाप अशा गोष्टी उपलब्ध करुन दिल्या जाणार असून यासाठी प्रोजेक्ट मुंबई या संस्थेसोबत सामजंस्य करार करण्यात आला.

****

तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांना मदतीचं वाटप करण्यासाठी १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपये निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये १६ तसंच १७ मे २०२१ रोजी "तौक्ते" चक्रीवादळामुळे नुकसान झालं होतं. सर्वाधिक नुकसान झालेल्या कोकण विभागासाठी १५२ कोटी ४८ लाख २८ हजार, नाशिक विभागासाठी १० कोटी ९७ लाख ६७ हजार, अमरावती विभागासाठी ३ कोटी ५७ लाख ३७ हजार, पुणे विभागासाठी ३ कोटी २४ लाख २५ हजार, औरंगाबाद विभागासाठी ९० हजार, तर नागपूर विभागासाठी ४४ लाख २६ हजार रुपये, याप्रमाणे एकूण १७० कोटी ७२ लाख ७३ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

****

विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव इथल्या 'आनंद सागर' च्या धर्तीवर पंढरपूर इथंही भव्य उद्यान उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. पंढरपूर शहरातली विकास कामं आणि श्री विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामांच्या ऑनलाईन आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पालखी मार्ग, प्रदक्षिणा मार्ग, दर्शन रांगेचा स्कायवॉक, चंद्रभागा नदीवरचे घाट, सार्वजनिक स्वच्छतागृहं, यासह विविध विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.

****

राज्यात शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केलं. ते आज हिंगोली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २४ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या संवाद दौऱ्याच्या या दुसऱ्या टप्प्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली हे चार जिल्हे आणि यातील २३ मतदारसंघाचा आढावा घेतल्याचं पाटील यांनी सांगितलं. कोविड प्रार्दुभाव कमी होईल त्यावेळी परभणी जिल्हयातून ही यात्रा पुन्हा सुरू करणार असल्याचं, पाटील यांनी स्पष्ट केलं.

****

औरंगाबाद नजिक वाळूज महागनर प्रकल्प रद्द करण्याबाबत सिडकोनं केलेला ठराव रद्दबातल करण्यासाठी दाखल याचिकेच्या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयानं सिडको प्रशासन आणि औरंगाबाद महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा ठराव करून, सिडको प्रशासनानं हा भाग औरंगाबाद महानगरपालिकेकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्र दिलं आहे. हा प्रकल्प रद्द झाला तर या ठिकाणी होणारा विकास थांबेल, त्यामुळे प्रकल्प रद्द करु नये. या भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम नसल्यामुळे तसंच नगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत, सिडकोनं वाळूज महानगरचा अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणं गरजेचं असल्याचं सांगत, स्थानिक नागरिक नागेश कुठारे आणि इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सिडकोला या भागात भौतिक सुविधा पुरवण्याबाबत आदेश देण्यात यावे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.

****

     नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिनंदन केलं आहे. क्रोएशियाच्या ओसिजेक इथं सुरु असलेल्या स्पर्धेत राहीने महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी संपूर्ण क्रीडा जगताकरिता ही अतिशय उत्साहवर्धक घटना असल्याचं राज्यपाल म्हणाले. आगामी वाटचालीसाठी राज्यपालांनी राही सरनोबतला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, भारताने स्त्रीशक्तीला श्रेष्ठत्व प्रदान केल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. कोश्यारी यांनी आज श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू इथल्या परिसराला भेट देऊन विभागप्रमुख तसंच प्राचार्यांशी संवाद साधला, त्यावेळी हे मत व्यक्त केलं. या विद्यापीठाने आगामी २५ वर्षांत आपलं स्वरूप कसं असावं, याचा विकास आराखडा तयार करून विद्यापीठाचा नावलौकिक जगात कसा वाढवता येईल, यादृष्टीनं विचार करावा अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे.

****

बीड जिल्ह्यात आज १७० नवे कोविडग्रस्त आढळले. यापैकी सर्वाधिक ६४ रुग्ण आष्टी तालुक्यात आढळले. बीड १९, गेवराई १८, पाटोदा १४, शिरूर तसंच वडवणी तालुक्यात प्रत्येकी १२, केज ११, माजलगाव ७, अंबाजोगाई ८, धारुर ३, तर परळी तालुक्यात आज २ नवे रुग्ण आढळले.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या १ हजार १५३ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ११ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार १८१ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार ८५४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा आज सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु होत्या. त्यानंतर व्यापाऱ्यांनी नियमांचं पालन करत सर्व बाजारपेठा बंद केल्या. पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुपारी साडे तीन वाजेपासूनच व्यापाऱ्यांना आस्थापना बंद करण्यासंबंधी सूचना दिल्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सांयकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी आणि त्यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद असणार आहेत.

****

वैश्विक समस्यांच्या बाबतीत भारतानं नेहमीच दिशादर्शक भूमिका घेतली आहे, कोविड प्रादुर्भावामुळे उदभवलेल्या सद्यस्थितीतही भारतानं सभ्यता, मानवता आणि संवदेनशीलतेचं दर्शन घडवलं, असं प्रतिपादन बिहारमधल्या मोतीहारी इथल्या महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजीवकुमार शर्मा यांनी केलं आहे. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनारमध्ये बीजभाषणात डॉ शर्मा बोलत होते. नैनीताल इथल्या कुमाऊं विद्यापीठाचे डॉ मधुरेंद्र कुमार, दिल्ली विद्यापीठातले डॉ प्रकाश सिंग, यांच्यासह सुमारे ३६० जणांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला, तर ९० संशोधकांनी आपले शोधनिबंध यावेळी सादर केले.

//*************//

No comments: