Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले
तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी
संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ३३ कोटींचा टप्पा पार
** ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप तसंच वंचित आघाडीचा
आंदोलनाचा इशारा
** जालना इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्रासाठी
१६५ कोटी रुपये निधी
आणि
** इंधन, खाद्यतेल तसंच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ रद्द करण्यासाठी
भाकपचं पंतप्रधानांना निवेदन
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणाने ३३ कोटींचा टप्पा पार केला
आहे. आतापर्यंत ४४ लाख ३३ हजार ८५३ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून, लसीच्या एकूण ३३
कोटी २८ लाख ५४ हजार ५२७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना
कोविड लसीच्या ३२ कोटी १३ लाख ७५ हजार ८२० मात्रा उपलब्ध करून दिल्या आहेत. यापैकी
३१ कोटी ४० लाख ७५ हजार ६५४ मात्रा वापरल्या गेल्या आहेत. राज्य-केंद्रशासित प्रदेशांकडे
सध्या ७३ लाखांपेक्षा जास्त मात्रा शिल्लक असून, २४ लाख ६५ हजार ९८०मात्रा पुढील ३
दिवसात राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
कृषी संजीवनी मोहिमेचा उद्या एक जुलै रोजी कृषी दिनी समारोप
होणार आहे. २१ जूनपासून सुरु झालेल्या या मोहिमेत सुमारे ४० हजार गावांमध्ये विविध
उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये सुमारे ६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवल्याची माहिती
कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. या समारोप सत्रात पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा
सत्कार केला जाणार आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात उद्या दुपारी साडे बारा वाजता
हा कार्यक्रम होणार असून, कृषी विभागाच्या युट्यूब चॅनलवरुन या कार्यक्रमाचं प्रसारण
होणार असल्याचं कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांमध्ये जुजबी बदल करून,
या कायद्यांमधील बहुतांशी तरतुदी राज्यात नव्या कायद्याच्या रूपाने लागू करण्याचे प्रयत्न
महाराष्ट्र सरकारने सुरू केले आहेत, या कायद्याला किसान सभेचा विरोध असल्याचं, किसान
सभेचे डॉ अजित नवले यांनी सांगितलं आहे. ते आज अहमदनगर इथं बोलत होते. शेतकऱ्यांना,
शेतकरी संघटनांना तसंच किसान सभेला विश्वासात न घेता संशयास्पद घाई करून, हे तीन केंद्रीय
कृषी कायदे लागू करण्याचे प्रयत्न केले तर किसान सभा राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर
उतरेल, असा इशारा डॉ नवले यांनी दिला. यासंदर्भात महाविकास आघाडीचे वर्तन अत्यंत निषेधार्ह
आणि संशयास्पद असल्याची टीका नवले यांनी केली.
****
महाविकास आघाडी सरकार आल्यापासून समाजा- समाजमध्ये तेढ वाढवण्याचा
प्रयत्न होत असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ते आज सोलापूर इथं
पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा
सादर करण्यास सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केले नाही. इतर मागासवर्गीय -
ओबीसींना दिलेले संवैधानिक अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न होत आहेत, ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा
प्रयत्न होत असल्याची टीका पडळकर यांनी केली.
****
सर्वोच्च न्यायालयानं वारंवार मुदत देऊनही ओबीसी समाजाबाबतचा
इम्पिरिकल डेटा महाविकास आघाडी सरकारला सादर करता आला नाही. त्यामुळेच ओबीसी समाजाचं
राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप आमदार अतुल सावे यांनी केला आहे. सावे यांनी औरंगाबाद
इथं जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. अपयश झाकण्यासाठी
आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे खोटारडेपणा करीत केंद्र सरकारवर
दोषारोप करत असल्याचं सावे यांनी म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका
पुढे ढकलण्यासाठी आघाडी सरकारने तातडीने हालचाली कराव्या, अन्यथा या समाजाच्या असंतोषाला
तोंड देण्यासाठी राज्य सरकारने तयार रहावं, असा इशाराही आमदार सावे यांनी दिला आहे.
****
राज्य सरकारनं ओबीसींचा इम्पिरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडी मराठवाड्यात
रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित आघाडीचे मराठवाडा विभाग प्रवक्ते
डॉ. धर्मराज चव्हाण यांनी दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.
ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या नावाखाली उभे केले जात असलेले आरक्षणाचे लढे म्हणजे,
जनतेची दिशाभूल करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी आखलेला डाव असल्याची टीका चव्हाण
यांनी केली. न्यायमूर्ती रोहिणी आयोग स्वीकारण्यात यावा आणि ओबीसींचे त्रिस्तरीय वर्गीकरण
करण्याची मागणीही धर्मराज चव्हाण यांनी केली आहे.
****
राज्यात नांदेडसह ५ ठिकाणी उर्दू घर निर्मितीचं काम सुरू आहे.
या उर्दू घरांची कामे लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून त्यांच्या
व्यवस्थापनासंदर्भातही धोरण निश्चित करण्यात आलं असल्याची माहिती या विभागाचे मंत्री
नवाब मलिक यांनी दिली. नांदेड इथल्या उर्दू घरासाठी ८कोटी १६ लाख रुपये निधी मंजूर
करण्यात आला आहे. या घराचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच त्याचं लोकार्पण करण्यात
येईल. राज्यात सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने उर्दू घरे महत्त्वपूर्ण
भूमिका बजावतील, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.
****
प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राज कौशल यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या
तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ४९ वर्षांचे होते. राज कौशल
यांनी अभिनेता म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात केली होती. प्यार में कभी
कभी, अँथनी कौन है, शादी का लड्डू या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केले. अभिनेत्री
मंदिरा बेदी यांचे ते पती होत.
****
ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना न्युमोनिया झाल्यानं,
त्यांना मुंबईत हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शाह यांची प्रकृती स्थिर
असून, त्यांना उद्या रुग्णालयातून सुटी दिली जाईल, अशी शक्यता त्यांचे व्यवस्थापक जयराज
पाटील यांनी वर्तवली आहे.
****
जालना इथल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्रात पायाभूत
सुविधा उभारणीसाठी राज्यशासनाकडून १६५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली़. जालना शहरातल्या
रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपक्रेंद्रास आज भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर
ते बोलत होते. या उपकेंद्रासाठी मंजूर २०३ एकर जमिनीचे रेखांकन करुन ही जमीन ताब्यात
घ्यावी, तसंच पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन
सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले़
****
वाढती बेरोजगारी, महागाई आणि जनतेची उपासमार या विरोधात भारतीय
कम्युनिस्ट पक्ष तसंच देशभरातल्या सर्व डाव्या पक्षांनी १६ ते ३० जून दरम्यान देशभर
पंधरा दिवस आंदोलन केलं, या आंदोलनाचा आज समारोप झाला. आंदोलक पक्ष संघटनांच्या वतीनं
आपल्या विविध मागण्यांचं निवेदन पंतप्रधान तसंच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं. भारतीय
कम्युनिस्ट पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात, पेट्रोल-डिझेलच्या
किमती तात्काळ कमी कराव्या, खते बी-बियाणे अवजारे आणि शेती विषयक औषधे यांच्या किमतीत
झालेली वाढ रद्द करावी, सर्व जीवनावश्यक वस्तू, खाद्यतेले आणि धान्याच्या वाढलेल्या
किंमती कमी कराव्यात, कराचा भरणा करत नसलेल्या सर्व कष्टकरी कुटुंबांना दरमहा साडे
सात हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटात आत्तापर्यंत ४१
हजार नागरिकांना कोविड लसीचा किमान पहिला डोस देण्यात आला आहे. साठ वर्षाच्या पुढील
६६% नागरिकांना लसीचा किमान एक डोस तर दुर्धर आजार असणाऱ्या ७० टक्के नागरिकांना लसीकरण
करण्यात आलं आहे. असे सर्व मिळून जिल्ह्यात दोन लाख ९६ हजार नागरिकांना कोविड लसीची
पहिली मात्रा देण्यात आली आहे.
//*********//
No comments:
Post a Comment