आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ जून २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात
डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा, या
पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेले निर्बंध आजपासून पुन्हा कडक करण्यात आले आहेत. आजपासून
सोमवार ते शुक्रवार दरम्यान सर्व प्रकारची दुकानं, सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतच
खुली राहणार असून, शनिवार आणि रविवारी संपूर्ण बंद पाळण्यात येणार आहे. याशिवाय अत्यावश्यक
सेवेतल्या कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता, इतर सर्वांसाठी सायंकाळी पाच ते सकाळी सात यावेळेत,
संपूर्ण संचारबंदी असेल.
****
माजी
पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांच्या शंभराच्या जयंतीमिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या
नायडू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. नरसिंह राव हे कर्त्तव्यदक्ष प्रशासक, द्रष्टे
आणि देशातल्या आर्थिक सुधारणांचे निर्विवाद आणि अग्रणी मार्गदर्शक होते, असं नायडू
यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नरसिंह राव यांना
आंदरांजली वाहिली आहे.
****
देशात
आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या ३२ कोटी ३६ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
आहेत. काल दिवसभरात लसींच्या १७ लाख २१ हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्याचं केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
नागरी
सहकारी बँकांवरील राजकीय व्यक्तींच्या नियुक्तीबद्दल रिझर्व्ह बँकेने घेतलेला निर्णय
आपल्याला स्वीकारला पाहिजे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी
व्यक्त केलं आहे. काल बारामती इथं पत्रकारांशी बोलताना पवार यांनी, रिझर्व्ह बँकेनं
घेतलेल्या कोणत्याही धोरणात्मक निर्णयाची पूर्ण माहिती घेणं आवश्यक असल्याचं नमूद केलं.
****
धुळे
जिल्ह्यातल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एक निरीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात
आलं आहे. शिरपूर तालुक्यातल्या अजंदे शिवारात, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईच्या
पथकानं छापा घालून, जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता, या पार्श्वभूमीवर
ही कारवाई करण्यात आली.
****
अहमदनगर
महापौर निवडीसाठी बुधवारी ३० जून रोजी ऑनलाईन सभा होत असून, नामर्निदेशनपत्र दाखल करण्यासाठी
अंतिम मुदत २९ जूनपर्यंत आहे. महापौरपदासाठी प्रथमच ऑनलाईन मतदान होणार आहे.
****
No comments:
Post a Comment