Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 June 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २६ जून २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना
आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल
जरी झाले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लस विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर
निर्बंध शिथिल करण्याच्या नियमात बदल; संपूर्ण राज्याला तिसऱ्या स्तरावरचे निर्बंध
लागू.
·
सर्व दुकानं आणि आस्थापना सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत
सुरु राहणार तर शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद.
·
डेल्टा प्लस या कोरोना विषाणूचा रत्नागिरी जिल्ह्यात देशातला
पहिला मृत्यू.
·
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधल्या
निवासस्थांनावर अंमलबजावणी संचालनालयाचे दुसऱ्यांदा छापे.
·
राज्यात नऊ हजार ६७७ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १८ जणांचा
मृत्यू तर ४१४ कोविड बाधित.
·
नव्या शैक्षणिक धोरणामुळे देशाच्या शैक्षणिक विकासात अमुलाग्र
बदल होऊन उद्योजकीय कौशल्ये विकसीत होणार - शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर अनिल सहस्त्रबुध्दे.
आणि
·
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशनच्या अर्बन मॉबिलिटी इंडिया
स्मार्ट सिटी पुरस्कारांमध्ये औरंगाबाद स्मार्ट सीटी बस देशात प्रथम क्रमांकावर.
****
राज्यात
कोरोना विषाणू संसर्गाचं वाढतं प्रमाण आणि काही जिल्ह्यात डेल्टा आणि डेल्टा प्लस हे
विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर काल राज्य सरकारनं निर्बंध शिथिल करण्याच्या नियमात
बदल केले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकाऱ्यांकडून स्पष्ट आदेशान्वये, जोवर
बंधनं मागे घेतली जात नाहीत तोवर सर्व बंधनं तिसऱ्या स्तरावर ठेवण्यास सांगण्यात आलं
आहे. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी याबाबतची अधिसूचना काल जारी केली.
यापूर्वी
चार जून रोजी जारी केलेल्या नियमावलीनुसार पाच गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची
विभागणी करण्यात आली होती. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात बाधितांचा दर आणि ऑक्सिजन खाटाच्या
प्रमाणानुसार त्या जिल्ह्यांचा गट निश्चित केला जात होता.
खालच्या
स्तराची बंधनं लागू करण्यापूर्वी मागील दोन आठवड्यांतील परिस्थिती विचारात घेण्यास
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यास सांगण्यात आलं आहे. मात्र बाधित रुग्णांच्या संख्येत
दैनंदिन वाढ होत असेल, आणि सध्या लागू असलेल्या बंधनांच्या स्तरापेक्षा वरच्या स्तराची
बंधनं लागू करण्याची गरज भासत असल्यास, दोन आठवड्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्याची
वाट न पाहाता, तातडीनं वरचा स्तर लागू करण्याचे निर्देश, या अधिसूचनेत देण्यात आले
आहेत.
याशिवाय
पात्र नागरिकांपैकी ७० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा, कामाच्या
ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावं, याचबरोबर हवेमधून पसरू शकणाऱ्या विषाणूंच्या
प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची
सक्ती करावी, गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे सर्व कार्यक्रम- घटना टाळाव्यात, प्रतिबंधक
क्षेत्र तयार करताना काळजीपूर्वक आढावा घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. निर्बंध कमी
करण्याबाबत किंवा वाढवण्याबाबत फक्त आरटीपीसीआर चाचण्यांमधून समोर आलेल्या निष्कर्षांनाच
आधारभूत मानण्याचे निर्देशही, या नियमावलीत देण्यात आले आहेत.
तिसऱ्या
टप्प्यातल्या नियमानुसार आता सर्व दुकानं आणि आस्थापना सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत
सुरु राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद
राहतील. मॉल, सिनेमागृह बंद असतील, उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेनं सायंकाळी चार वाजेपर्यंत
सुरु राहतील, सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेनं सुरु राहील, आंतरजिल्हा प्रवासास मुभा
असेल मात्र श्रेणी पाच मधील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पास बंधनकारक करण्यात आला आहे.
औरंगाबादसह मराठवाड्यातले सर्व जिल्हे तिसऱ्या श्रेणीत येतात.
दरम्यान,
डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या नव्या स्वरुपाची लागण झालेल्या रुग्णांपैकी रत्नागिरी
जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. डेल्टा प्लसमुळे झालेला हा देशातला पहिला
मृत्यू असल्याचं, आरोग्य विभागानं कळवलं आहे.
****
माजी
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधल्या निवासस्थांनावर अंमलबजावणी संचालनालयानं
काल दुसऱ्यांदा छापे टाकले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या
१०० कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात, देशमुख यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा
राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काल त्यांच्या नागपूर आणि मुंबईतल्या शासकीय
निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगला तसंच वरळी परिसरातल्या सुखदा या इमारतीमधल्या
घराची झडती घेण्यात आली. या कारवाईबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात आली आहे. यापूर्वीही
काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्या घरावर ईडीनं छापे टाकले होते.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ७८ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
इतर
मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यभर
चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ओबीसी
बांधवांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
****
कोरोना
विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत तीन कोटींहून अधिक डोस देणारं महाराष्ट्र पहिलं
राज्य ठरलं आहे. काल दिवसभरात सुमारे चार लाख ८० हजार नागरिकांना लस देण्यात आली. राज्यात
आतापर्यंत तीन कोटी दोन लाख ७१ हजार ६०६ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
राज्यात
काल नऊ हजार ६७७ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या ६० लाख १७ हजार ३५ झाली आहे. काल १५६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २० हजार ३७० झाली आहे.
काल दहा हजार १३८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ५७ लाख ७२ हजार ७९९ रुग्ण, कोरोना
विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ९३ शतांश टक्के झाला
आहे. सध्या राज्यभरात एक लाख २० हजार ७१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल ४१४ कोविड बाधितांची नोंद झाली, तर १८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये
बीड जिल्ह्यातल्या आठ, जालना चार, औरंगाबाद तीन, तर परभणी, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड
जिल्ह्यात १७६ रुग्ण आढळले. औरंगाबाद ६६, लातूर ५०, उस्मानाबाद ४६, परभणी ३६, जालना
२३, नांदेड आठ, तर हिंगोली जिल्ह्यात सहा नवे रुग्ण आढळले.
****
नव्या
शैक्षणिक धोरणामुळे देशाच्या शैक्षणिक विकासात अमुलाग्र बदल होऊन उद्योजकीय कौशल्ये
विकसीत होणार आहेत, असं मत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषद- एआयसीटीईचे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ
डॉक्टर अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ, आँनलाईन पध्दतीनं काल पार पडला, त्यावेळी प्रमुख
पाहुणे म्हणून ते बोलत होते. कुलपती भगतसिंह कोश्यारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
होते. समाज माध्यमं आणि माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानस्नेही
होऊन, स्वत: सोबतच समाज आणि देशाचा विकास साधावा, असं आवाहन डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी
यावेळी केलं. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू आणि बंगाली या पाच भाषांमधून १४ तंत्रशिक्षण
संस्थेत, व्यावसायिक शिक्षण यंदापासून सुरु होत असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं.
या समारंभात ४२२ पीएचडी संशोधकांसह, ८१ हजार ७३६ पदव्यांचं वितरण करण्यात आलं.
****
जालना
जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात हवेतून ऑक्सिजन शोषूण घेणाऱ्या आणि त्यावर प्रकिया करुन
शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या, पीएसए प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असल्याची
माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात
आलेल्या पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ, काल टोपे यांच्या हस्ते करण्यात
आला, त्यावेळी ते बोलत हेाते. जिल्हा आरटीपीसीआर प्रयोगशाळेत नव्याने उभारण्यात आलेल्या
स्वयंचलित रसायनशास्त्र विश्लेषक आणि महिला रुग्णालयातल्या कर्करोग बाह्यरुग्ण विभाग
आणि उपचार केंद्राचा शुभारंभही, यावेळी करण्यात आला. जालना जिल्ह्यात अनेक स्टील उद्योगांनी
ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी केली असून, जिल्हा हा ऑक्सिजन निर्मितीमध्ये
स्वयंपूर्ण झाल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
****
हिंगोली
शहरातल्या सर्व नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्ग चाचणी तसंच लसीकरण करून घेण्याचं आवाहन,
हिंगोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केलं आहे –
सर्व
नागरिकांना मी आवाहन करतो की, त्यांनी लसीकरण करून घ्यावं फ्री ऑफ कॉस्ट लसीकरण आहे.
कोविशिल्ड सगळीकडे ॲव्हॅलेबल आहे. तसेच आरोग्य विभागाच्या सर्व्हेनुसार डेल्टा प्लस
व्हेरियंटचा सर्वाधिक धोका असलेले सात जिल्हे जे आहेत त्याच्यामधे आपला हिंगोली जिल्हा
आहे. तर शहरातील सर्व व्यापारी, त्यांच्याकडे असलेले कर्मचारी यांनी रॅपिड अँटीजन टेस्ट
३० तारखेपर्यंत करून घ्यावी असं मी सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करेल. ३० तारखेपर्यंत
जो रॅपिड अँटीजन करणार नाही त्याला आम्ही दुकान उघडण्याची परवानगी देणार नाही.
****
केंद्र
सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशनद्वारे औरंगाबाद स्मार्ट सीटी बसनं अर्बन मॉबिलिटीमध्ये
इंडिया स्मार्ट सिटी पुरस्कारांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय गृहनिर्माण
आणि शहरी कार्य विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी काल स्मार्ट सिटीज मिशनचे संचालक
कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रमात ही घोषणा केली. याशिवाय अन्य पुरस्कारही
यावेळी घोषित करण्यात आले.
****
ग्रामीण
भागातल्या महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांना बचत गटाच्या माध्यमातून
रोजगार उपलब्ध करुन देणं आवश्यक असल्याचं, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी
म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये उमेद प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. उमेदच्या
माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी विविध प्रकल्प राबवावे, यामुळे महिला अधिक सक्षम
होतील असंही ते म्हणाले.
****
कोरोना
विषाणू प्रतिबंधक लस मिळणं हा सर्वांचाच मूलभूत अधिकार असल्याचं, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी
कौस्तुभ दिवेगावकर यांनी म्हटलं आहे. तालुक्यातल्या आळणी इथं स्वाधार मतीमंद मुलींचं
वसतीगृह, आणि वरुडा इथल्या पारधी वस्तीवर विशेष लसीकरण सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं,
त्यावेळी ते बोलत होते. आजपर्यंत या विषाणूवर रामबाण औषध निघालेलं नाही, त्यामुळे कोविड
प्रतिबंधात्मक लस हीच कोरोना थोपवण्यासाठी एकमेव प्रभावी माध्यम असल्याचं, ते म्हणाले.
****
फळपीक
विमा योजनेअंतर्गत मागील वर्षीच्या मृग बहरात नुकसान झालेल्या डाळिंब आणि मोसंबी या
पिकांचा विमा तत्काळ मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी काल जालना जिल्हा कृषी अधिकारी
कार्यालयासमोर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान,
जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा करून, फळपीक विम्यासाठी
वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असून, लवकरच विमा रक्कम मंजूर होईल, असं शेतकरी संघटनेच्या
पदाधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं.
****
आपल्या
विविध प्रलंबित मागण्यांसाठी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या परिचारिका कालपासून
बेमुदत संपावर गेल्या आहेत. २१ आणि २२ जून दरम्यान या परिचारिकांनी सकाळी आठ ते १०
वाजेपर्यंत दोन तास कामबंद आंदोलन केलं होतं. त्या पाठोपाठ २३ आणि २४ जून रोजी दिवसभर
कामबंद आंदोलन केलं, मात्र यावर काहीही तोडगा न निघाल्यानं, कालपासून त्यांनी बेमुदत
कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या उमरगा नगर पालिकेच्या नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना गैरव्यवहार प्रकरणी
अध्यक्ष पदावरून दूर करून, पुढील सहा वर्षाच्या कालावधी साठी पालिका सदस्य होण्यास
किंवा इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास अपात्र का ठरवू नये, अशी कारणे दाखवा नोटीस, राज्याच्या अपर सचिव प्रभावती पाटील यांनी
बजावली आहे. टोपगे यांनी नगराध्यक्ष पदावर असतानाही गैरवर्तन, अनियमितता आणि कर्तव्यात
कसूर केल्याची तक्रार १४ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्योकडे केली होती. त्यानुसार नेमलेल्या
चौकशी समितीनं आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. या आरोपांमध्ये तथ्य आढळून आल्यानं
नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
****
बीड,
शिरूर कासार तालुक्यात सिंदफणा, आणि गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदी पात्रालगतच्या
गावांमधून, नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्यानं या भागात कालपासून
येत्या १५ जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीनं वरील आदेशाचं
उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी
कळवलं आहे.
****
गेल्या
चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात
तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच
ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे
वेधशाळेनं व्यक्त केली आहे. याकाळात विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह
मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment