Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 June 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जून २०२१
दुपारी १.०० वा.
****
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय - ईडीने कारवाई
केली असून, नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. काल रात्रीच ईडीचं पथक
मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी
संबंधित दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. अनिल देशमुख
यांनी महिना १०० कोटी रुपयांचा हप्ता किंवा खंडणी गोळा करण्याची सूचना निलंबित पोलीस
अधिकारी सचिन वाझेंसह अन्य अधिकाऱ्यांना दिली होती. तसंच पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया,
नियमित कामकाजातही देशमुख यांचा हस्तक्षेप वाढला होता, असे आरोप करणारं पत्र मुंबईचे
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांना लिहिलं होतं. त्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय आणि ईडीनं देशमुख
यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
****
भारतात कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरण वेगानं सुरू असून, आतापर्यंत ३० कोटी ७९ लाख ४८ हजार ७४४ जणांना कोरोना प्रतिबंधक
लस देण्यात आली आहे. काल दिवसभरात पहिली आणि दुसरी मात्रा मिळून ६० लाख ७३ हजार ९१२
जणांचं लसीकरण करण्यात आलं.
****
दरम्यान, देशात काल नव्या
५१ हजार ६६७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर एक हजार ३२९ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी एक लाख ३४ हजार ४४५ झाली
असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ९३ हजार ३१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल
६४ हजार ५२७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत दोन कोटी ९१ लाख २८ हजार २६७ रुग्ण, कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९६ पूर्णांक ६६ शतांश टक्के इतका आहे. देशात
सध्या सहा लाख १२ हजार ८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नैसर्गिक वायु निर्मिती क्षेत्रातील
प्रसिद्ध गेल इंडिया तसचं ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनी, राज्यात सुमारे १६ हजार
५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई
यांच्या प्रमुख उपस्थितीत काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. काल झालेल्या या करारात गेल
इंडिया कंपनी ही रायगड जिल्ह्यातल्या उसर इथं प्रकल्पाचा विस्तार करणार असून, सुमारे
आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पात एलपीजी निर्मिती आणि वितरण,
एलएनजी वायु पुनर्भरण, पेट्रोकेमिकल, आदींची निर्मिती केली जाणार आहे. तर ऑस्ट्रेलियातली
वितारा एनर्जी लिमिटेड कंपनी यवतमाळ जिल्ह्यात प्रकल्प सुरू करणार आहे. यात जैवइंधन
निर्मितीसोबत हॅट्रोजन, रिन्यूएबल डिझल, एव्हीएशन फ्युअल, बायो सीएनजी, इथेनॉल निर्मिती,
आदी क्षेत्रात काम करणार आहे. या माध्यमातून पर्यावरण पूरक, आणि सर्वांसाठी किफायतशीर
उत्पादनं निर्माण केली जाणार असून, राज्याच्या औद्योगिक प्रगतीस हातभार लागेल, असा
विश्वास उद्योगमंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
****
बँकींग नियमन कायद्यातल्या
सुधारणांमुळे सहकारी बॅंकांवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका
दाखल करण्याचा निर्णय, या संबंधित समितीनं घेतला असल्याची माहिती, सहकार आणि पणन मंत्री
बाळासाहेब पाटील यांनी दिली. या सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन समितीची काल मुंबईत
बैठक झाली, त्यानंतर ते बोलत होते. नागरी सहकारी बँकांच्या वतीनं, महाराष्ट्र नागरी
सहकारी बँक फेडरेशन, या सुधारणांना आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल करणार आहे. बँकींग
अधिनियमांतल्या बदलांमुळे राज्य शासनाचे काही अधिकार अधिक्रमित होत असल्यानं, याबाबत
योग्य ते कायदेशीर पाऊल राज्य शासनामार्फतही तातडीनं उचलण्यात येईल, असं पाटील यांनी
सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
रविवारी २७ जून रोजी आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ७८ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
नांदेड जिल्ह्यात माहूर,
हिमायतनगर, मुदखेड आणि ऊमरी या भागात कालरात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे
ऊगवलेल्या पिकांना थोडा आधार मिळाला आहे. जिल्ह्यात खरीपाच्या आतापर्यंत ५० टक्के पेरण्या
पूर्ण झाल्या असून, पावसाने दडी दिल्यामुळे काही भागात पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज निर्माण झाली
आहे.
****
जालना - मुंबई- जालना जनशताब्दी
विशेष जलद रेल्वे तिच्या निर्धारित वेळेवर पुन्हा सुरु होत आहे. ही गाडी उद्यापासून
जालना इथून धावणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
भारतीय नेमबाज सौरभ चौधरीनं
क्रोएशिया इथं सुरु असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत दहा मीटर एअर
पिस्टल प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे. भारताचा दुसरा नेमबाज या स्पर्धेत पाचव्या
स्थानावर राहीला.
****
No comments:
Post a Comment