Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 June 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २८ जून २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना
आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल
जरी झाले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी
संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
गावांतल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हेच प्रत्येक गावाचं
लक्ष्य असायला हवं, भीती न बाळगता आणि कोणत्याही अफवांना बळी न पडता लस टोचून घेण्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन.
·
डेल्टा प्लस कोरोना विषाणू संसर्ग आणि तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याच्या
पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून पुन्हा कडक निर्बंध.
·
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी,
उद्या सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात हजर राहण्याचं पुन्हा समन्स.
·
प्राध्यापकांच्या तीन हजार रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच
सुरु करण्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांचं आश्वासन.
·
राज्यात नऊ हजार ९३४ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १४ जणांचा
मृत्यू तर ३३१ बाधित.
आणि
·
मराठवाड्यातल्या अनेक भागात पाऊस; शेतकऱ्यांमध्ये समाधान.
****
गावांतल्या
प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हेच प्रत्येक गावाचं लक्ष्य असायला हवं, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीविषयी भीती न बाळगता आणि
कोणत्याही अफवांना बळी न पडता लस टोचून घेण्याचं, तसंच इतरांनाही लस घेण्यासाठी प्रेरित
करण्याचं आवाहन त्यांनी केलं. पंतप्रधानांनी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून
देशवासियांशी काल संवाद साधला. या कार्यक्रमाचा हा अठ्ठ्यात्तरावा भाग होता.
भारतानं
एकाच दिवसात ८६ लाखापेक्षा अधिक जणांचं लसीकरण केल्याच्या कामगिरीचा उल्लेख करत, आपण
एका दिवसात लाखो लोकांना भारतात बनवलेली लस विनामूल्य देत आहोत, हे नव्या भारताचं सामर्थ्य
असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातही गावांमधले लोक तसंच
आदिवासी बांधवांनी दाखवलेला समंजसपणा आणि सामर्थ्य, हा जगासाठी भविष्यात अभ्यासाचा
विषय ठरेल असं ते म्हणाले.
कोविडमुळे
निधन झालेले भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांच्या आठवणी आणि कार्यालाही त्यांनी
उजाळा दिला. यावेळी पंतप्रधानांनी आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व
करत असलेल्या काही खेळाडूंच्या संघर्षगाथा श्रोत्यांना सांगितल्या. यात तिरंदाजी या
क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या साताऱ्यातल्या प्रवीण जाधव, या
खेळाडूचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
येत्या
१५ ऑगस्टपासून देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष सुरु होणार आहे, हा अमृत-महोत्सव
आपल्या सगळ्यांसाठी मोठी प्रेरणा असेल असं सांगताना पंतप्रधान म्हणाले –
आजादी के ७५ वर्ष का अमृत महोत्सव
हमारे लिये बहोत बडी प्रेरणा है। हम देश के लिये जीना सिखे। आजादी की जंग देश के लिये
मरने वालों की कथा है। आजादी के बाद के समय को हमे देश के लिय जीने वालों की कथा बनाना
है। हमारा मंत्र होना चाहिये इंडिया फर्स्ट। हमारे हर फैसले, हर निर्णय का आधार होना
चाहिये इंडिया फर्स्ट।
****
राज्यात
डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा, या
पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेले निर्बंध आजपासून पुन्हा कडक करण्याचा निर्णय, राज्य
सरकारनं घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या स्तरावरचे निर्बंध
आजपासून लागू झाले आहेत. यानुसार आठवड्यातील शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सर्व व्यवहार
पूर्णपणे बंद राहतील. राज्यातील शाळा, महाविद्यालयं तसंच कोचिंग क्लासेस बंद राहतील,
मात्र ऑनलाईन शिकवणीला परवानगी असेल. राज्यात धरणं, आंदोलनं, मोर्चे, उपोषण यांना पूर्ण
बंदी असेल. सर्व धार्मिक स्थळंही बंदच राहणार आहेत.
याशिवाय
सोमवार ते शुक्रवार दरम्यान सर्व प्रकारची दुकानं, सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतच
खुली राहणार असून, अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता, इतर सर्वांसाठी सायंकाळी
पाच ते सकाळी सात यावेळेत, संपूर्ण संचारबंदी असेल. खासगी कार्यालयं दुपारी चार पर्यंतच
५० टक्के क्षमतेनं, तर सरकारी कार्यालयं अत्यावश्यक सेवा वगळता ५० टक्के क्षमतेनं सुरु
राहतील. मॉल्स तसंच चित्रपटगृहे पूर्णपणे बंद असतील, तर सांस्कृतिक कार्यक्रमांना ५०
टक्के क्षमतेत दुपारी चार पर्यंत परवानगी असेल. उपाहारगृहे दुपारी चार पर्यंत ५० टक्के
क्षमतेनं, त्यानंतर घरपोच सेवा अशाप्रकारे सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १००
टक्के आसनक्षमतेनं सुरु राहील, मात्र उभे राहून प्रवासास मनाई असेल. सकाळी पाच ते नऊ
यावेळेत सार्वजनिक ठिकाणं, मोकळ्या जागांमध्ये व्यायाम, चालणं किंवा सायकल चालविण्यास
परवानगी असेल, तर केशकर्तनालयं, ब्युटीपार्लर दुपारी चार पर्यंत ५० टक्के क्षमतेने
सुरु राहतील. विवाह समारंभांना ५०, तर अंत्यसंस्काराला २० लोकांनाच उपस्थितीची मुभा
देण्यात आली आहे. सर्व उद्योग तसंच बांधकामं कोविडविषयक नियमांचं पालन करुन सुरु राहतील,
असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
राज्याचे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालय-ईडीनं आर्थिक व्यवहारांच्या
चौकशीसाठी, उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचं समन्स बजावलं आहे. याआधी
शनिवारी देशमुख यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं, मात्र त्यांनी वकिलांमार्फत वेळ
मागून घेतला होता.
माजी
पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरूद्ध शंभर कोटीं रुपयांच्या खंडणीची
तक्रार केली होती. या प्रकरणानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये चौकशी सुरू आहे. देशमुख
यांच्या दोन स्वीय सहायकांना ईडीनं अटक केली असून, न्यायालयानं त्यांना एक जुलैपर्यंत
पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
प्राध्यापकांच्या
तीन हजार ६४ रिक्त जागेची भरती प्रकिया लवकरच सुरु करणार असल्याचं आश्वासन, उच्च आणि
तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. पुण्यात गेल्या २१ तारखेपासून नेट-सेट
पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीनं, आपल्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, काल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात
बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, या निर्णयाचं स्वागत करत नेट-सेट पीएचडी
पात्रताधारक संघर्ष समितीनं आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राध्यापक
भरती प्रकियेबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभागांनी आपली कार्यवाही
पूर्ण केली असू्न, वित्त विभागाकडील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थमंत्रालयाकडून
मान्यता घेतल्यानंतर, भरती संदर्भात लवकरच शासन निर्णय काढला जाईल, असं सामंत यांनी
सांगितलं. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मागणीच्या अनुषंगाने, ४८ मिनिटांची
तासिका याप्रमाणे मानधन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
****
राज्यात
काल नऊ हजार ९३४ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण
संख्या ६० लाख ३६ हजार ८२१ झाली आहे. काल १४३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २१ हजार २८६ झाली असून,
मृत्यूदर दोन टक्के झाला आहे. काल आठ हजार ५६२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात
आतापर्यंत ५७ लाख ९० हजार ११३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९५ पूर्णांक ९१ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख २२ हजार २५२ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल ३३१ कोविड बाधितांची नोंद झाली, तर १४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये
औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी चार, जालना दोन, तर उस्मानाबाद, परभणी, नांदेड
आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड
जिल्ह्यात १३१ रुग्ण आढळले. औरंगाबाद ५९, लातूर ४८, परभणी ३६, उस्मानाबाद ३१, जालना
१६, नांदेड सहा, तर हिंगोली जिल्ह्यात चार नवे रुग्ण आढळून आले.
****
नांदेड
जिल्ह्यातला लेंडी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं, ३०० कोटी रूपये अतिरिक्त
देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील
यांनी सांगितलं. ते काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २०२४ मध्ये हा प्रकल्प
पूर्ण केला जाईल, असं ते म्हणाले. पैनगंगा नदीवरील नवीन सहा उच्च पातळी बंधारे, तसंच
माहूर शहरास पाणी पुरवठा करावयाच्यादृष्टीनं, धनोडा उच्च पातळी बंधाऱ्यांचा समावेश
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या सहाव्या सुधारित अंदाजपत्रकात करण्यात येऊन, त्यास मान्यता
देण्याचा निर्णयही घेतला असल्याचं, पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान,
राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचं राज्याच्या सिंचन
विकासात मोलाचं योगदान असून, त्यांच्या नावानं ‘जलभूषण पुरस्कार’ देण्यात येणार असल्याचंही,
पाटील यांनी काल जाहीर केलं. ते म्हणाले –
स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण
यांचं विष्णुपरीला स्मारक करण्याचा सरकारनं यापूर्वीच निर्णय घेतलाय. येणाऱ्या १४ जुलैला
त्यांच्या नावानं जलभूषण पुरस्कार राज्य सरकारकडून वितरीत करण्यात येईल आणि दरवर्षी
हे जलभूषण पुरस्कार डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या नावाने दिला जाईल. त्यांनी
जे काम मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या जलसंपदा विभागांसाठी केलं त्यांची स्मृती
चिरंतन राहावी म्हणून आमच्या विभागानं हा निर्णय घेतलेला आहे.
****
औरंगाबादमध्ये
उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलातून उच्च दर्जाचे गुणवंत खेळाडू निर्माण होतील, यासाठी
प्रशासनानं कालबध्दरित्या, वेगानं क्रीडा संकुलाची निर्मिती करावी, अशा सूचना पालकमंत्री
सुभाष देसाई यांनी केल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीनं चिकलठाणा इथं नियोजित जिल्हा
क्रीडा संकुलाचं भूमीपूजन, काल देसाई यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शासन
क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यावर अधिक भर देत असून, या क्रीडा संकुल निर्मितीसाठी
भरीव प्रमाणात निधी देखील देण्यात येईल, असंही देसाई यांनी सांगितलं.
या
क्रीडा संकुलात विविध खेळाची मैदानं, स्केटिंग, बास्केट बॉल, बहुउद्देशीय सभागृह, जिम्नॅशियम,
योगा, जिम, टेबल टेनिस, बॉक्सिंग, शूटिंग रेंज, धनुर्विद्या, भारोत्तोलन, कुस्ती, बॅडमिंटन
हॉल, सौरऊर्जा प्रकल्प, विद्युतीकरण, मुलांमुलींसाठी वसतीगृह, अशा सर्व सुविधा उपलब्ध
असणार आहेत.
****
कोरोना
विषाणू संसर्गाच्या काळात शाळा बंद असल्यानं ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू झालं. मात्र,
आदिवासी पाड्यांवरच्या, गरीब कुटुंबातल्या मुलांकडे त्यासाठी आवश्यक मोबाईल उपकरण नसल्यानं,
अडचण निर्माण झाली. अशा वेळी नाशिकच्या लायन्स क्लबनं ३६ मोबाईल, सुरगाणा तालुक्यातल्या
आदिवासी पाड्यांना दिले. याविषयी लायन्स क्लबचे, वैद्य विक्रांत जाधव यांनी सांगितलं
–
जे पाडे आहेत ज्याच्यामधे छोटे
मोबाईल वापरले जात होते आणि त्या ठिकाणी कुठलंही शिक्षण होणार नव्हतं. आणि म्हणून आम्ही
ठरवलं की मुलींच्या शिक्षणासाठी विशेष करून प्राधान्य द्यावं आणि याच प्राधान्यातून
आमच्याजवळ ३६ मोबाईलची बँक तयार झाली. आणि हे ३६ मोबाईल त्याच वेळेला जिल्हा परिषदेच्या
सी ई ओ लीना बनसोड यांनी मोबाईल डोनेशन हा उपक्रम बाहेर काढला. त्यांच्यामार्फत आम्ही
पाड्यांपर्यंत पोहोचण्यास यशस्वी झालो. ज्या गरीब मुला नाशिक शहरामधे होत्या नाशिक
जिल्ह्यामधे होत्या त्यांनासुद्धा आम्ही हे मोबाईल दिले.
****
नांदेड
जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या पेठवडज इथं काल कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकरी
मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषीतज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी,
कापूस पिका विषयी पिकांची वाढ, खतांच्या मात्रा, किटकनाशक फवारणी, पिक संगोपन आणि संरक्षण
याच्या नियोजनाविषयी माहिती दिली.
****
मराठवाड्यातल्या
अनेक भागात काल पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल सायंकाळी विजेच्या कडकडटासह जोरदार
पाऊस झाला. पैठण तालुक्यातल्या बोकुड जळगाव इथं वीज अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू
झाला. जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात पावसानं हजेरी लावली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून
पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. औरंगाबाद शहरातही काल सायंकाळी सुमारे
दीड तास जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळे रस्ते जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झालं.
रात्रभर पावसाची संततधार सुरु होती.
बीड
जिल्ह्यात काल माजलगाव, वडवणी, बीड या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. माजलगाव तालुक्यातली
सिंदफना नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीवरील रोषणपुरी बंधारा ९० टक्के भरला आहे.
बीड शहरासह धारूर तालुक्यातील लोणगाव, उमरी, वाघोरा परिसरात जोरदार पाऊस झाला.
नांदेड
जिल्ह्यात नांदेड, अर्धापूर, मुखेड, धर्माबाद, उमरी, हदगाव, हिमायतनगर या भागात पाऊस
झाला. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे.
जालना
शहरासह जिल्ह्यातल्या अंबड, घनसावंगी, भोकरदन, बदनापूर तालुक्यातल्या बहुतांश भागात
काल समाधानकारक पाऊस झाला.
परभणी
जिल्ह्यात सेलू, गंगाखेड, जिंतूर, पूर्णा तालुक्यात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागातही काल दुपारी मुसळधार पाऊस झाला.
****
मराठवाड्यात
आज काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं
वर्तवली आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच
ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
No comments:
Post a Comment