Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 June 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जून २०२१
दुपारी १.०० वा.
****
एक राष्ट्र एक रेशन कार्ड
योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांना दिले आहेत. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं, कोविडचा
फटका बसलेल्या निर्वासित मजुरांच्या कल्याणासाठी, काही सूचना दिल्या आहेत. जोपर्यंत
कोरोना महामारी संपत नाही, तोपर्यंत मजुरांना अन्नधान्य पुरवावं, तसंच कम्युनिटी किचन
सुरु ठेवावं, असं न्यायालयानं सांगितलं आहे. कामगारांची नोंदणी करण्यासाठी राज्य आणि
केंद्रांकडून तात्काळ सर्व कंत्रादरांची नोंदणी झाली पाहिजे, आणि ही कामं ३१ जुलैपर्यंत
पूर्ण करण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्याचे माजी गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनालय - ईडीला पत्र लिहून, प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन
जबाब नोंदवून घेण्याची विनंती केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं देशमुख यांना
आज चौकशीसाठी हजर होण्यासंदर्भात समन्स बजावलं होतं. कोविडमुळे ऑडिओ किंवा व्हिज्युअल
माध्यमातून आपला जबाब नोंदवणार असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं आहे. ईडीने त्याच्यांसंदर्भात
दाखल केलेल्या अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवालाची प्रत दिल्यानंतर, त्यांनी मागितलेली
सर्व माहिती आणि कागदपत्रे सादर करणार असल्याचं, देशमुख म्हणाले.
****
मराठवाड्याला आवश्यक असलेलं
मात्र इतर राज्यांत वाहून जाणारं ३० दशलक्ष घनफूट पाणी साठवण्यासाठी, उपाययोजना करणार
असल्याचं, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज हिंगोली इथं वार्ताहरांशी
बोलत होते. मराठवाड्यातली धरणे जुनी असून, कालव्यांची पाणीवहन क्षमताही घटली आहे. सिद्धेश्वरचा
जसा एडीबी बँकेकडे ४५० कोटींचा प्रस्ताव पाठवला, तसा जायकवाडीचाही जागतिक बँकेकडे पाठवण्यात
येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यात जलसिंचनाचे
नवे स्त्रोत निर्माण करण्यासह, असलेल्या स्त्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर करून सिंचन
दुपटीने करण्यासाठी, इस्त्रायलच्या धर्तीवर पाणी वापराचं अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा
प्रयत्न असून, त्यासाठी इस्त्रायलमधल्या तज्ज्ञांशी ऑनलाईन बैठकाही झाल्या असल्याचं,
पाटील यांनी सांगितलं.
****
नांदेड शहराला पाणी पुरवठा
करणाऱ्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात, धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या दिग्रस
बंधारा तथा पूर्णा नदीमधून चालू पाण्याच्या विसर्गामुळे, प्रकल्पात येणारी पाण्याची
आवक तसंच सततचा पाऊस लक्षात घेता, आज विष्णुपुरी बंधाऱ्याच्या एका दरवाजातून, १६ हजार
६३५ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं, पाणी सोडण्यात आलं. विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या
बाजूस असणाऱ्या सर्व गावांतल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन, पूर नियंत्रण अधिकाऱ्यांनी
केलं आहे.
****
राज्यात ठिकठीकाणी शेतकरी
वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करत असून, त्यांच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी राज्यात
प्रयोगशील शेतकऱ्यांची, 'रिसोर्स बॅंक' तयार करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठांनी त्यांच्या
या प्रयोगांची दखल घेवून त्यांना मार्गदर्शन करावं, असं प्रतिपादन, कृषीमंत्री दादा
भुसे यांनी केलं आहे. ते काल अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या महात्मा फुले कृषि
विद्यापीठात, आढावा बैठकीत बोलत होते. विद्यापीठांनी जास्तीत जास्त मुलभूत बियाणांचं
उत्पादन वाढवावं, उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादनाला चालना द्यावी, तसचं शेतकऱ्यांना कमी
दरात उच्च प्रतीचं बियाण मिळवून देणं गरजेचं असल्याचं, भुसे यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यातल्या मंठा
इथल्या पंचायत समिती अंतर्गत, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाचा व्यवस्थापक
तुकाराम छबुराव कुऱ्हाडे याला, तीन हजार पाचशे रुपयांची लाच घेतांना काल अटक करण्यात
आली. एफटीए आणि प्रवासभत्ता मंजूर करून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा
तालुक्यातल्या डोंगरगाव इथले कृषी सहाय्यक आनंद शिरूळे यांनी सन २०२० - २१ मध्ये, शासनाच्या
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करून, ३२ पूर्णांक दहा हेक्टर क्षेत्रावर फळबाग यशस्वी केली, तसंच शेतकऱ्यांना त्यांच्या
उत्पादनात वाढीसाठी मार्गदर्शन केलं. याबद्दल कृषी विभागाच्या वतीने कृषीमंत्री दादा
भुसे यांच्या हस्ते शिरुळे यांना, पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा
बळी ठरलेल्या कुटुंबाना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कालपासून पाच जुलैपर्यंत
एक कालबद्ध उपक्रम हाती घेतला आहे. यात महसूल विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी, जिल्हाधिकारी
डॉ.विपीन ईटनकर यांच्या सूचनेनुसार, संबंधित कुटुंबांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी
त्यांच्याकडून अर्ज भरून घेत आहेत. संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा
योजनेतील अंत्योदय, शेतकरी सन्मान योजना यासह शासनाच्या विविध योजनांचा यात समावेश
असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment