Wednesday, 30 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजनेची येत्या ३१ जुलैपर्यंत अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व राज्य सरकारांना निर्देश.

·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १९ जुलैपासून प्रारंभ.

·      आगामी गणेशोत्सवासाठी राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी; गणपती आगमन तसंच विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई.

·      कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी महिला आणि बाल विकास विभागानं घेतली तर पदवी-पदव्युत्तर शिक्षणाचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

·      राज्यात आठ हजार ८५ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात १५ जणांचा मृत्यू तर ३८४ बाधित.

·      बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या इरफान शेखला उत्तरप्रदेश दहशतवादी विरोधी पथकाकडून अटक.

आणि

·      मराठवाड्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अठरा कामं, कमकुवत कंत्राटदार आणि एजन्सीधारकांमुळे अपूर्ण - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण.

****

‘एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेची अंमलबजावणी येत्या ३१ जुलै पर्यंत करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. तसंच कोविड-19 ची साथ सुरु आहे तोपर्यंत स्थलांतरित मजुरांना अन्नाचा पुरवठा सुरु ठेवावा, कम्युनिटी किचनही सुरु ठेवावं, असंही न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे स्थलांतरीत कामगारांच्या सोयी-सुविधांसंदर्भात संबंधित राज्य सरकारांनी उत्तम नियोजन करण्याच्या सूचनाही न्यायालयानं दिल्या आहेत.

****

संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान घेण्याची शिफारस संसदीय कामकाज समितीनं केली आहे. अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यासाठी समितीनं गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती. या अधिवेशनादरम्यान अनेक विधेयकं सादर करण्यात येणार आहेत.

****

आगामी गणेशोत्सवासाठी राज्यशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींची उंची चार फूट, तर घरगुती गणेश मूर्तींची उंची दोन फुटांपर्यंत असण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरगुती गणेश मूर्ती धातू अथवा संगमरवरी असण्याला प्राधान्य द्यावं, असं सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना गणपती आगमन तसंच विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. घरगुती गणपतींचं विसर्जन शक्यतो घरीच करावं, लहान मुलं तसंच ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनाच्या कृत्रिम तलाव परिसरात जाऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव काळात भाविकांची गर्दी होणार नाही, याकडे लक्ष द्यावं, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरांसारखे आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत, ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

****

कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम, महिला आणि बाल विकास विभाग हाती घेत आहे. यासाठी काल महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दोन सामंजस्य करार करण्यात आले. कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांचं शालेय शुल्क, त्यांना शिक्षणाकरता लागणारे टॅब, लॅपटॅाप अशा गोष्टी उपलब्ध करुन दिल्या जाणार असून, यासाठी प्रोजेक्ट मुंबई या संस्थेसोबत सामजंस्य करार करण्यात आला. यशोमती ठाकूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली, त्या म्हणाल्या –

जी लेकरं आहेत ज्यांनी आपले आईवडील गमावलेले आहेत, त्या लेकरांच्या पुढच्या तीन वर्षांच्या फीसची व्यवस्था आम्ही करतो आहोत शैक्षणिक. त्याच्यासोबतच या बाळांना सायकॉलॉजिकली मदत कशी करता येईल, याचं देखील आम्ही बघतो आहे. त्यांना टेक्नॉलॉजिकली लॅपटॉप असो किंवा अँड्राईड फोन्स असो, किंवा यायला जायला सायक्लस जर लागल्या, तर सायकल्स असो, याची व्यवस्था आम्ही करणार आहोत.

****

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या मुलांचं पदवी/पदव्युत्तर शिक्षण पुर्ण होईपर्यंतचं संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत ही घोषणा केली. विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क आणि विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही, परंतू इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन, उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही, त्या बाबींसाठी आकारण्यात येणारं शुल्क पुर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा आणि ग्रंथालय शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल, असंही सामंत यांनी सांगितलं.

****

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. संसद आणि विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

****

राज्यात काल आठ हजार ८५ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६० लाख ५१ हजार ६३३ झाली आहे. काल २३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २१ हजार ८०४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक एक दशांश टक्के झाला आहे. काल आठ हजार ६२३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५८ लाख नऊ हजार ५४८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख १७ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३८४ कोविड बाधितांची नोंद झाली, तर १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातल्या सहा, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, लातूर दोन, तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा मृतांमधे समावेश आहे.

बीड जिल्ह्यात १७० रुग्ण आढळले. औरंगाबाद ९१, उस्मानाबाद ५३, लातूर २९, परभणी २५, जालना ११, तर हिंगोली जिल्ह्यात पाच नवे रुग्ण आढळून आले. नांदेड जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यात काल प्रथमच एकही कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला नाही, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात शासनानं जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केलं. ते काल हिंगोली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २४ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या संवाद दौऱ्याच्या या दुसऱ्या टप्प्यात, उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली हे चार जिल्हे, आणि यातील २३ मतदारसंघाचा आढावा घेतल्याचं, त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जलसंपदा मंत्री पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा हिंगोली वरून वसमतकडे येत असतांना, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही काळ अडवला. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाच्या मागणीचं निवेदन जयंत पाटील यांच्याकडे सादर केल्याचं, आमच्या वार्तारानं कळवलं आहे.

****

बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणी उत्तरप्रदेश दहशतवादी विरोधी पथकानं बीड जिल्ह्यातल्या इरफान शेख नावाच्या तरुणाला दिल्लीतून अटक केली. परळी तालुक्यातल्या शिरसाळा इथला रहिवासी असलेला इरफान हा केंद्रीय महिला आणि बालकल्याण विभागात मुकबधीर मुलांसाठी सांकेतिक संवाद दुभाषा म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूकबधीर लोकांना पैशाचं अमिष दाखवून, धर्मांतरण करण्यात येत होतं. या धर्मांतरणासाठी आयएसआय या पाकिस्तानी संघटनेकडून पैसा पुरवला जात असल्याचं, समोर आलं आहे.

****

औरंगाबाद नजिक वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याबाबत, सिडकोनं केलेला ठराव रद्दबातल करण्यासाठी दाखल याचिकेच्या अनुषंगानं, मुंबई उच्च न्यायालयानं, सिडको प्रशासन आणि औरंगाबाद महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा ठराव करून, सिडको प्रशासनानं हा भाग औरंगाबाद महानगरपालिकेकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्र दिलं आहे.

****

वैश्विक समस्यांच्या बाबतीत भारतानं नेहमीच दिशादर्शक भूमिका घेतली आहे, कोविड प्रादुर्भावामुळे उदभवलेल्या सद्यस्थितीतही भारतानं सभ्यता, मानवता आणि संवदेनशीलतेचं दर्शन घडवलं, असं प्रतिपादन बिहारमधल्या मोतीहारी इथल्या महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरु, डॉ संजीवकुमार शर्मा यांनी केलं आहे. औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनारमध्ये, बीजभाषणात डॉ.शर्मा बोलत होते. नैनीताल इथल्या कुमाऊं विद्यापीठाचे डॉ.मधुरेंद्र कुमार, दिल्ली विद्यापीठातले डॉ.प्रकाश सिंग यांच्यासह सुमारे ३६० जणांनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला, तर ९० संशोधकांनी आपले शोधनिबंध यावेळी सादर केले.

****

मराठवाड्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची २४ पैकी अठरा कामं, कमकुवत कंत्राटदार आणि एजन्सीधारकांमुळे अपूर्ण राहिली आहेत, असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर आपण मराठवाड्यातल्या या चोवीस कामांबाबत चर्चा केली असून, काही एजन्सी धारकांच्या कामांबद्दल आक्षेप नोंदवले आहेत, केंद्र आणि राज्य सरकारकडून या रस्त्यांच्या कामांच्या पूर्ततेबाबत लवकरच निश्चितच मार्ग काढला जाईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

दरम्यान, परभणी तालुक्यातल्या तीर्थक्षेत्र त्रिधारा पाटीपासून ते उखळद-पिंपरी देशमुख -मिरखेल, या १४ किलोमीटर मार्गाच्या कामाचा आणि परभणी इथल्या सावली या शासकीय विश्रामगृहाच्या दुसऱ्या मजल्याच्या कामाचा प्रारंभ, काल चव्हाण यांच्या हस्ते झाला.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठा काल सायंकाळी चार वाजता बंद झाल्या. व्यापाऱ्यांनी कोविड नियमांचं पालन करत सर्व बाजारपेठा बंद केल्या. पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून दुपारी साडे तीन वाजेपासूनच व्यापाऱ्यांना आस्थापना बंद करण्यासंबंधी सूचना दिल्या जात होत्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात सांयकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी, आणि त्यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू असून, शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद असणार आहेत.

दरम्यान, औरंगाबाद शहरातल्या सर्व पेट्रोलपंपांवर सर्वसामान्य नागरिकांना, सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंतच इंधन मिळेल, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना मात्र त्यानंतरही इंधन पुरवठा सुरू राहणार असल्याचं, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोविड प्रतिबंधाक लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. आज नांदेड शहरात १२ तर ग्रामीण भागात ९० अशा एकूण १०२ केंद्रातून लस देण्यात येणार आहे. कोविशिल्ड ही लस पहिला आणि दुसरा तर कोव्हॅक्सिन लसीचा फक्त दुसरा डोस देण्यात येणार असून, पात्र व्यक्तींनी लसीकरण करुन घेण्याचं आवाहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल एकूण आठ हजार ८१ जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातल्या सात हजार ४९२ जणांनी, तर शहरात ५८९ जणांनी लस घेतली. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख २६ हजार ७११ जणांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालं असल्याचं, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

****

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा योजनांचं वीज बील थकल्यामुळे, महावितरण कंपनीने नांदेड महापालिकेचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा योजनांची, एकूण ५४ कोटी सहा लाख रूपयांची थकबाकी महानगरपालिकेकडे आहे, महावितरणची आर्थिक परिस्थिती खालावल्याने थकबाकी वसूल करण्याशिवाय पर्याय नसल्याचं, महावितरणनं म्हटलं आहे. वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत शहराला पाणी पुरवठा होऊ शकणार नसल्याचं, महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी बंधाऱ्याच्या एका दरवाजातून, १६ हजार ६३५ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं, पाणी काल सोडण्यात आलं. धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या दिग्रस बंधारा तथा पूर्णा नदी मधून चालू पाण्याच्या विसर्गामुळे, प्रकल्पात येणारी पाण्याची आवक तसंच सततचा पाऊस लक्षात घेता, पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं.

****

राज्यात मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढचे तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

****

No comments: