Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 June 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड - १९ शी
संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** गावांतल्या
प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हेच प्रत्येक गावाचं लक्ष्य असायला हवं- पंतप्रधान नरेंद्र
मोदी
** राज्यात डेल्टा
प्लस या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर
उद्यापासून तिसऱ्या स्तरावरचे निर्बंध लागू होणार; शनिवार आणि रविवारी सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार
** माजी गृहमंत्री
अनिल देशमुख यांना आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी मंगळवारी सक्त वसुली संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित
राहण्याचं समन्स
आणि
** प्राध्यापकांच्या तीन हजार रिक्त
जागेची भरती प्रकिया लवकरच सुरु करण्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांचं आश्वासन
****
गावांतल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हेच प्रत्येक
गावाचं लक्ष्य असायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोना
विषाणू प्रतिबंधक लसीविषयी भिती न बाळगता आणि कोणत्याही अफवांना बळी न पडता लस
टोचून घेण्याचं तसंच इतरांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करण्याचं आवाहन
पंतप्रधानांनी आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधताना देशातल्या नागरिकांना केलं आहे. या कार्यक्रमाचा हा अठ्ठ्यात्तरावा भाग
होता.
भारतानं एकाच दिवसात ८६ लाखापेक्षा अधिक जणांचं लसीकरण
केल्याच्या कामगिरीचा उल्लेख करत, आपण एका दिवसात लाखो लोकांना भारतात बनवलेली लस विनामूल्य
देत आहोत, हे नव्या भारताचं सामर्थ्य असल्याचं ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाच्या
संकटातही गावांमधले लोक तसंच आदिवासी बांधवांनी दाखवलेला समंजसपणा आणि सामर्थ्य हा
जगासाठी भविष्यात अभ्यासाचा विषय ठरेल असं ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाशी झुंज
अपयशी ठरलेल्या, मात्र बाधित असतानाही रुग्णालयातूनच देशात ऑक्सिजन निर्मिती
आणि पुरवठा सुरळीत राहण्यासाठी अखेरपर्यंत काम केलेल्या डॉ. गुरुप्रसाद मोहपात्रा
यांचा उल्लेख त्यांनी केला. १ जुलै रोजी साजरा होत असलेल्या राष्ट्रीय डॉक्टर
दिनानिमित्त शुभेच्छा देत कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाबद्दल
देशभरातल्या डॉक्टरांचे पंतप्रधानांनी आभार मानले.
कोविडमुळे निधन झालेले भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग
यांच्या आठवणी आणि कार्यालाही त्यांनी उजाळा दिला. यावेळी पंतप्रधानांनी आगामी टोकियो
ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या काही खेळाडूंच्या संघर्षगाथा
श्रोत्यांना सांगितल्या. यात तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व
करत असलेल्या साताऱ्यातल्या प्रवीण जाधव या खेळाडूचाही त्यांनी आवर्जून उल्लेख
केला.
येत्या १५ ऑगस्टपासून देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी
वर्ष सुरु होणार आहे, हा अमृत-महोत्सव आपल्या सगळ्यांसाठी मोठी प्रेरणा असेल.
येत्या काळात इंडिया फर्स्ट हाच आपला मंत्र असायला हवा, आणि हा मंत्रच
आपल्या प्रत्येक निर्णयाचा आधार असायला हवा, असंही पंतप्रधान म्हणाले.
****
देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत विनामूल्य
आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही श्रेणीच्या माध्यमातून भारत सरकारनं आतापर्यंत राज्य सरकार आणि
केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या ३१ कोटी ५१ लाख ४३ हजार ४९० मात्रा पुरवल्या आहेत.
याव्यतिरिक्त येत्या ३ दिवसात लसीच्या २० लाख ४८ हजार ९६० मात्रा राज्य तसंच
केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होणार आहेत.
****
राज्यात डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा
धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर उद्यापासून सध्या लागू असलेले निर्बंध पुन्हा कठोर करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे. त्यामुळे
तिसऱ्या स्तरावरचे निर्बंध उद्या सोमवारपासून लागू होणार आहेत. यानुसार आठवड्यातील
शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. राज्यातील शाळा, महाविद्यालयं तसंच
कोचिंग क्लासेस बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिकवणीला परवानगी असेल. राज्यात धरणं, आंदोलनं, मोर्चे, उपोषण यांना पुर्ण
बंदी असेल. सर्व धार्मिक स्थळंही बंदच राहणार आहेत.
याशिवाय सोमवार ते शुक्रवार दरम्यान सर्व प्रकारची दुकानं
सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंतच खुली राहणार असून अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांचा
अपवाद वगळता इतर सर्वांसाठी सायंकाळी पाच ते सकाळी ७ यावेळेत संपूर्ण संचारबंदी
असेल. खासगी कार्यालये दुपारी ४ पर्यंतच ५० टक्के क्षमतेनं तर सरकारी कार्यालयं
अत्यावश्यक सेवा वगळता ५० टक्के क्षमतेनं सुरु राहतील. मॉल्स तसंच चित्रपटगृहे
पूर्णपणे बंद असतील तर सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेत दुपारी ४ पर्यंत
परवानगी असेल. उपाहारगृहे दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेनं त्यानंतर घरपोच सेवा
अशाप्रकारे सुरू राहील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १०० टक्के आसनक्षमतेने सुरु
राहील मात्र उभे राहून प्रवासास मनाई असेल. सकाळी ५ ते ९ यावेळेत सार्वजनिक ठिकाणं, मोकळ्या
जागांमध्ये व्यायाम, चालणे किंवा सायकल चालविण्यास परवानगी असेल तर केशकर्तनालयं, ब्युटीपार्लर
दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. विवाह समारंभांना ५०, तर
अंत्यसंस्काराला २० लोकांनाच उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. सर्व उद्योग
तसंच बांधकामे कोविडविषयक नियमांचं पालन करुन सुरु राहतील, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्त वसुली
संचालनालय-ईडीनं आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी परवा मंगळवारी सकाळी ११ वाजता
उपस्थित राहण्याचं समन्स आज बजावलं. याआधी
शनिवारी देशमुख यांना चौकशीला बोलावण्यात आलं होतं, मात्र त्यांनी
वकिलांमार्फत वेळ मागून घेतला होता.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरूद्ध
शंभर कोटीं रुपयांच्या खंडणीची तक्रार केली होती. या प्रकरणानंतर उच्च
न्यायालयाच्या आदेशान्वये चौकशी सुरू आहे. काल देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांना
ईडीनं अटक केली असून न्यायालयानं त्यांना १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
प्राध्यापकांच्या तीन हजार ६४ रिक्त जागेची
भरती प्रकिया लवकरच सुरु करणार असल्याचं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय
सामंत यांनी दिलं आहे. पुण्यात गेल्या २१
तारखेपासून नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीनं आपल्या विविध
मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सामंत
यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी
सामंत बोलत होते. दरम्यान, या निर्णयाचं स्वागत करत नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष
समितीनं आपलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राध्यापक भरती प्रकियेबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण
विभाग, सामान्य प्रशासन विभागांनी आपली कार्यवाही पुर्ण केली असू्न
वित्त विभागाकडील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्थमंत्रालयाकडून मान्यता
घेतल्यानंतर भरती संदर्भात लवकरच शासन निर्णय काढला जाईल असं सामंत यांनी
सांगितलं.
तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मागणीच्या
अनुषंगाने ४८ मिनीटांची तासिका याप्रमाणे मानधन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात
आला.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात दोन कोरोना विषाणू बाधित
रुग्णांचा मृत्यू झाला तर १६ नवीन रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात आज १३१ कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
नाशिक इथले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी शहर संघचालक
नारायण शंकर तथा नानासाहेब गर्गे यांचं आज निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते.
गोळवलकर गुरुजी यांनी नानासाहेब यांची नियुक्ती नाशिक शहर संघचालक म्हणून केल्यावर
त्यांनी पंचवीस वर्षे ही जबाबदारी सांभाळली होती. कर सल्लागार असलेल्या
नानासाहेबांचा लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ आणि दीपक मंडळ
यांच्या स्थापनेत मोठा सहभाग होता.
****
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातल्या पेठवडज इथं आज
कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कृषीतज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी कापूस पिका विषयी पिकांची वाढ, खतांच्या मात्रा, किटकनाशक फवारणी, पिक संगोपन आणि
संरक्षण याच्या नियोजनाविषयी माहिती दिली.
****
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग- एनसीबीनं चौकशी
केल्यानंतर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची रवानगी मकोका
न्यायालयाच्या कोठडीत झाली आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभाग, त्याची अमली
पदार्थ प्रकरणातल्या सहभागाबद्दल चौकशी करत असून पूर्ण तपासाअंती त्याला अटक
करायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल, असं एनसीबीचे
नैऋत्य विभागाचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी सांगितलं.
****
भारताचा जलतरणपटू साजन प्रकाश हा टोकीयो ऑलिम्पिक
स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. रोम मधील सेटे कोली चषक स्पर्धेत दोनशे मीटर बटरफ्लाय
प्रकारात साजन यानं ऑलिम्पिकसाठी आवश्यक निकषांपेक्षा कमी म्हणजेच एक
मिनीट-छप्पन्न पूर्णांक ३८ सेकंदात हे अंतर पार केलं आहे.
//*********//
No comments:
Post a Comment