Friday, 25 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले, तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्यामुळे घाईघाईने व्यवहार खुले न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन.

·      २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्क वगळता अन्य शुल्कात २५ टक्के सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

·      ग्रामपंचायतींना पथदिव्यांची तसंच पाणीपुरवठा योजनांची देयकं पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून देण्यास मान्यता.

·      कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातून जून २०२३ पर्यंत उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याला पाणी उपलब्ध होणार.

·      राज्यात नऊ हजार ८४४ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात आठ जणांचा मृत्यू तर ४८७ बाधित.

आणि

·      इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षा जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा निर्णय.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम असून, आपल्या शहर अथवा जिल्ह्यातल्या संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वेगानं वाढत असलेल्या हिंगोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या सात जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसह डेल्टा प्लस या विषाणूचा देखील धोका असून, पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन आणि अतिदक्षता खाटा लागतील, तसंच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील, याविषयी आरोग्य विभागानं सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली, तसंच फिरत्या प्रयोगशाळा पुरवण्याची विनंती केली.

****

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या काही मोठ्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. राज्य शासनाच्या ऑक्सिजन स्वावलंबन योजनेचा लाभ घेत ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तातडीच्या उपाययोजना करत, राज्यात त्यांची ऑक्सिजन निर्मिती तसंच साठवणूक क्षमता येत्या तीन ते चार आठवड्यात वाढवावी, अशी सूचना त्यांनी केली.

सातारा जिल्ह्यातल्या मल्हारपेठ पोलीस ठाणे अणि पोलीस वसाहत इमारतीचं ‘ऑनलाईन’ भूमिपूजनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्राचं पोलीस दल हे देशातलं सर्वोत्तम पोलीस दल असून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता आणि मनोबल वाढवावं असं आवाहन, त्यांनी केलं.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्क वगळता अन्य शुल्कात २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबई इथं राज्यातल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संस्थांचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या कोविड काळात विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित नसल्यानं ग्रंथालय, जिमखाना अशा शैक्षणिक सुविधांचा वापर केला नाही, त्यामुळे शासकीय आणि शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना, शिकवणी शुल्का व्यतिरिक्त इतर शुल्कात १६ हजार २५० रुपयांची, म्हणजेच २५ टक्के सुट देण्यात आली असल्याचं, सामंत यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या ग्रामपंचायतींना त्यांची पथदिव्यांची तसंच पाणीपुरवठा योजनांची देयकं पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. राज्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीमुळे, ग्रामीण भागात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी देयके अदा न झाल्यानं बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्र्वभूमीवर या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार असून, देयकांच्या पूर्ततेअभावी कोणत्याही गावात पथदिव्यांची वीज किंवा पाणीपुरवठा योजना खंडीत होणार नसल्याचं, मुश्रीफ यांनी सांगितलं.

****

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला परवानगी देण्यात आली असून, जून २०२३ पर्यंत उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या लाभक्षेत्राला पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. उस्मानाबाद इथं जिल्ह्यातल्या पाटबंधारे विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या योजनेचा लाभ उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठही तालुक्यांना होणार असून, बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यास उपसा सिंचन प्रकल्प-तीन मध्ये एक पूर्णांक ६८ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होणार आहे. यातून आष्टी तालुक्यातलं आठ हजार १४७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. या सिंचन प्रकल्पासाठी पुढील दोन वर्षात लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असं ते म्हणाले.

दरम्यान, तुळजापूर इथं काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद उपक्रमास जयंत पाटील यांनी सुरुवात केली. त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, राज्य सरकार मराठवाड्याला कृष्णा खोऱ्यातलं काही पाणी, वैनगंगेपासून नळगंगेपर्यंत जाणाऱ्या पाण्याचा काही भाग, आणि पश्चिमेकडच्या अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातलं वळण बंधाऱ्यातून काही पाणी देऊन, इथली पाण्याची तूट भरून काढणार असल्याचं, ते म्हणाले.

****

दहावीत ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या अनुसूचित जातीतल्या आर्थिक दुर्बल घटकांतल्या विद्यार्थ्यांना, पुढील व्यावसायिक उच्च शिक्षणासाठी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था-बार्टी मार्फत, व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी, अकरावी आणि बारावी या दोन वर्षात प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचं अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रूपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या मेथा गावानं, कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला गावात शिरकाव करू दिला नाही. गावच्या उच्चशिक्षित सरपंच सारिका अणेकर यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन, या विषाणू संसर्गाशी लढा दिला. गावातला एकही नागरिक बाधित झालेला नाही. नियमांचं काटेकोर पालन आणि जनजागृतीवर आपण  भर दिल्याचं त्यांनी सांगितलं. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –

२१५० लोकसंख्येच्या मेथा गावात ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक घरी कोरोना जनजागृतीचे आणि कोरोनाची भयावह परिणामांची माहिती देणारे फलक लावले गेले. गावात अन्‍ घरात वावरताना मास्क वापराची सवय अंगी भिनवली. गावाबाहेरच्यांना गावबंदी केली. फेरीवाल्यांनाही गावात प्रवेश दिला नाही. दर दोन-तीन दिवसांनी घरोघरी तपासणी केली. २८ जणांचे व्ही. आर. टी. पथक डोळ्यात तेल घालून लक्ष ठेऊन होते. जनजागृती आणि नियम पालनाची ही अनोखी शक्कल मोठी उपयुक्त ठरली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत गावात एकही रुग्ण आढळला नाही. कोरोना प्रतिबंधाचा हा ‘मेथा पॅटर्न’ लक्षवेधी ठरला आहे.

आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.

****

राज्यात काल नऊ हजार ८४४ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६० लाख सात हजार ४३१ झाली आहे. काल १७० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १९ हजार ८५९ झाली असून, मृत्यूदर दोन दशांश टक्के झाला आहे. काल नऊ हजार ३७१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५७ लाख ६२ हजार ६६१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ९३ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख २१ हजार ७६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ४८७ कोविड बाधितांची नोंद झाली, तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या चार, औरंगाबाद दोन, तर परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात १५१ रुग्ण आढळले. औरंगाबाद ११५, उस्मानाबाद ८०, परभणी ५१, लातूर ४०, जालना २४, नांदेड २०, तर हिंगोली जिल्ह्यात सहा नवे रुग्ण आढळले.

****

राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षा - सीईटी, जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानं घेतला आहे. ही परीक्षा पूर्णत: ऐच्छिक असून, राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया राबवताना, विद्यार्थ्यांना सीईटी मधल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सीईटी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना, दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल, असं मंडळानं सांगितलं आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्य समितीच्या काल झालेल्या समारोप कार्यक्रमात सचिन वाझे याच्या पत्रातील वसुलीच्या आरोपांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. समारोप सत्रात बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडी सरकारमधले घोटाळे बाहेर काढणार असल्याचं, सांगितलं. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, विधीमंडळ अधिवेशन, कोरोनामुळे झालेले मृत्यू अशा अनेक विषयांवर फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे काल मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना मागण्यांचं निवेदन दिलं. पीएचडीच्या ऑनलाईन प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी, पीएचडी आणि एम फिलचे राहिलेले प्रबंध सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात यावी, मुला मुलींची सर्व वसतीगृहं सुरू करण्यात यावी, कमवा आणि शिका योजना तात्काळ सुरु करावी, आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

****

जालना - मुंबई- जालना जनशताब्दी विशेष जलद रेल्वे तिच्या निर्धारित वेळेवर पुन्हा सुरु होत आहे. ही गाडी आज मुंबई इथल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन सुटणार असून, उद्यापासून जालना इथून धावणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे. प्रवासी संख्या घटल्यानं ही गाडी गेल्या काही दिवसांपासून रद्द करण्यात आली होती.

****

परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातले अधिकारी, कर्मचारी आणि वृक्षप्रेमी नागरिकांचा सहभाग वाढवावा म्हणून ‘हरित गाव माझं दायित्व' हे अभियान पाच जून ते ३१ ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –

परभणी जिल्ह्यात हरित ग्राम सामाजिक दायित्व ही संकल्पना मूळ धरत आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळ म्हणाले, “गाव तेथे घन वन, स्मृती उद्यानाची निर्मिती, नदीकाठी बांबू लागवड करणे तसेच नाले, कॅनॉलच्या साईड, यामधे बांबूची लागवड करणे. स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या बिया गोळा करून वृक्ष लागवड करणे. कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी एकमेकांना वृक्ष भेट देणे, शेतकऱ्यांच्या शेताच्या बांध्यावर आणि शेतात वृक्ष लागवड करणे. तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम वृक्ष लागवडीसाठी परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यात राबवण्यात येत आहेत.” वृक्ष लागवड करणे हे नागरिकांच्या सहभागामुळे भविष्यात पर्यावरणाचा समतोल निश्चितच राखला जाईल.

आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर

****

परभणी शहराला जलवाहिनी दुरुस्तीमुळे आजपासून तीन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. येलदरी इथून शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथं महामार्गाच्या कामादरम्यान फुटल्यामुळे, पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं असल्याचं शहर अभियंता वसीम पठाण यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथल्या परिवहन महामंडळाच्या बस आगारातील वाहन परीक्षक सुर्यकांत दहिफळे याला काल पाच हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आलं. तक्रारदार हा बसचालक असून, तो आजारी असल्यानं धावपळीची ड्युटी न लावता त्याला डिझेल पंपावर ड्युटी देण्यासाठी दहिफळे यानं १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

****

अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असल्यानं पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नसल्याचा अंदाज, पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. याच काळात कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातल्या चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

****

No comments: