Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 June 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात उद्या सोमवारपासून १८ वर्षावरील सर्वांना
कोविड- १९ प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहीम राबवण्याची सरकारनं तयारी केली आहे. सर्व
तरुण श्रोत्यांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले
असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी
घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं,
असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं,
हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११-
२३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** सातव्या
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र
मोदी संबोधित करणार
** वेरूळ लेणीसह देशातील ७५ सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी योगाभ्यास
आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन
** उद्यापासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्याची देशव्यापी
मोहीम
** काँग्रेसनं जरी स्वबळावर
निवडणूक लढवली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवेल- राष्ट्रवादी काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
आणि
** औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद
पाटील यांची मराठा आरक्षणशी संबंधित निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका
सर्वोच्च न्यायालयात दाखल
****
सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या २१ जून रोजी
होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. ‘उत्तम आरोग्यासाठी योग’ यावर्षीच्या योग
दिनाची संकल्पना आहे. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी साडेसहा वाजता या
कार्यक्रमाचं प्रसारण सुरु होईल. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे विद्यार्थी
योगासनांची प्रात्यक्षिकं सादर करतील.
देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्येही उद्या योग दिनाचं
आयोजन केलं जाणार आहे. लोकांना निरोगी जीवनशैली स्वीकारायला आणि घरीच राहून
व्यायाम आणि योग करायला चालना देणं, हे या आयोजनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांनी ४५ मिनिटांच्या एकत्रित योग कार्यक्रमात भाग घ्यावा, असं आवाहन
विद्यापीठ अनुदान आयोगानं केलं आहे. त्यादृष्टीनं विद्यापीठं आणि महाविद्यालयांना
आयोगानं सूचना जारी केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या औरंगाबाद नजिकच्या वेरूळ लेणीसह देशातील एकूण ७५ सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी
योगाभ्यास आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे
‘योग-एक भारतीय वारसा’ या अभियानांतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन केलं
आहे. वेरुळ लेणीसह पुण्याचा आगा खान पॅलेस, मुंबई नजिकची कान्हेरी लेणी आणि नागपूर इथं
जुनं उच्च न्यायालय इमारत या महाराष्ट्रातील राष्ट्रीय महत्त्वाच्या अशा चार स्मारकांच्या ठिकाणी
योग दिन साजरा होईल. वेरुळ लेणी इथं सकाळी सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
जागतिक योग दिना निमित्त उद्या भारतीय टपाल खात्याकडून टपाल
तिकिटांवर विशेष रद्दीकरण शिक्का मारला जाईल.
****
केंद्र सरकारच्या वतीनं उद्यापासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत
कोविड प्रतिबंधक लस देण्याची देशव्यापी मोहीम सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी याच महिन्याच्या ७ तारखेला याबाबत घोषणा केली होती. या लसीकरणासाठीची सर्व तयारी
करण्यात आली असून राज्यांना पुरवठ्यात वाढ केली जात आहे.
****
पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला लस उत्पादनासाठी
अमेरिकेकडून निर्बंध हटवल्यानंतरही अद्याप कच्चा माल मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित नोवावेक्स या
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस उत्पादनाला विलंब होण्याची शक्यता आहे.
****
काँग्रेसनं जरी स्वबळावर निवडणूक लढली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि
शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सांगलीत एका कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलतांना पाटील यांनी सध्या
राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. निवडणुकांसंदर्भात जो काही
निर्णय होईल, तो एकोप्याने घेतला जाईल, असं ते म्हणाले.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी युती करावी
अशा मागणी करणारे पत्र पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेला त्रास थांबावा म्हणून ही युती करावी, असं त्यांनी या पत्रात म्हटलं
आहे. याबरोबरच महाविकास आघाडीतील मित्र पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना पक्ष फोडत असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रात केला आहे.
****
मराठा आरक्षण रद्द ठरवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशा
मागणी करणारी याचिका औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात
दाखल केली आहे. घटनेतील तरतुदीनुसार ५० टक्के
आरक्षणाच्या मर्यादेचा भंग होत
असल्यामुळे न्यायालयानं हे आरक्षण रद्द ठरवलं होतं. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर पुनर्विचार करण्याची
मागणीही पाटील यांनी याचिकेत केली आहे. राज्य सरकारनं मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याआधीच पाटील
यांनी ही याचिका दाखल केली आहे.
****
आंतरराष्ट्रीय योग दिनाची जनजागृती करण्यासाठी औरंगाबादचे
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी
कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. कोरोना जागतिक महामारी च्या काळात
सर्वांना चांगले आरोग्य आणि पर्यावरण संतुलनाची जाणीव झाली आहे. तेंव्हा
प्रत्येकानं स्वतःपासून बदलाची सुरुवात करत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले
पाहिजे. त्यासाठी व्यायाम, योग याबरोबरच सायकल चालवणे देखील आरोग्य आणि पर्यावरण
दृष्ट्या लाभदायी असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यावेळी म्हणाले. या रॅलीत
सहभागी उत्कृष्ट सायकलपटूसाठीचा प्रथम पुरस्कार उमेश मारवाडी यांना तर द्वितीय
पुरस्कार अश्विनी जोशी आणि तृतीय क्रमांक सोनम शर्मा या विजेत्यांना देण्यात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी इथल्या
हिंदवी परमेश्वर चौरे या नऊ वर्षाच्या पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींन योगासनाच्या बाबतीत
गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. आई-वडिलांकडून मिळालेले योगाचे धडे तसंच योगाचं पुस्तक वाचून निरालांबा पूर्ण चक्रासन या योगासनाविषयी तिनं माहिती मिळवली आणि सराव करत साडेपाच मिनीटात
शंभर निरालांबा पुर्ण चक्रासन करून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःच नाव
कोरलं. या विक्रमानंतर आता तिने एशिया स्पर्धे पर्यंत मजल मारून भारतासाठी
योग करण्याचं ध्येय असल्याचं सांगितलं आहे.
****
योगासन प्रशिक्षण सरावापुरतं मर्यादित न ठेवता
जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे असं मत भारतीय योग संस्थानच्या औरंगाबाद आणि सोलापूरचे विभागीय प्रमुख
डॉ. उत्तम काळवणे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादमध्ये आज त्यांना क्रीडा भारती योग पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक मानसिंह पवार उपस्थितीत होते. औरंगाबाद शहरात २०१२ पासून भारतीय योग संस्थानच्या माध्यमातून योग, प्राणायम, ध्यान, मुद्राअभ्यास आणि
शुद्धीक्रिया या क्षेत्राचा प्रचार-प्रसार केला जात आहे. या
माध्यमातून आजवर २५० योगशिक्षक, ४० योग प्रशिक्षण केंद्र आणि तीस ते ३५ हजार विद्यार्थी घडवल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या ह्यू पॉंइंट
परिसरात आज बहुरंगी फुलझाडांचं बीजारोपण महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत
करण्यात आलं. लेणीच्या सौंदर्यात भर पडून त्याद्वारे पर्यटन आणि व्यवसायाला अधिक चालना, स्थानिकांना
रोजगार संधी यादृष्टीनं सातारा जिल्ह्यातील फुलांच्या विस्तीर्ण प्रदेशासाठी
प्रसिद्ध असलेल्या कास पठाराच्या धर्तीवर लेणी परिसरात हा ’झकास पठार’ विकसित केलं जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास ग्रामविकास विभागातर्फे राज्यभर ‘झकास पठार’ हा उपक्रम राबवणार असल्याचं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी नमूद
केलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातील पाच कोरोना विषाणू बाधित रूग्णांचा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- रूग्णालय -घाटीत मृत्यू झाला
आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ३८५ रुग्णांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख ४५ हजार ३७८ झाली असून एक लाख ४०
हजार ९५६ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले.
जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार, ११ झाली आहे.
उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ४५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली.
आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार, ५९१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित
असलेल्या २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात सध्या डेंगूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात
आढळून येत आहेत. असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यात बाल रूग्णांचं प्रमाण
जास्त आहे.
****
No comments:
Post a Comment