Monday, 21 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.06.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 June 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

योगाचा प्रचार प्रसार करण्यासाठी एम-योग ॲप सुरु करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज दिलेल्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली. भारतानं संयुक्त राष्ट्रांबरोबर हे ॲप विकसित केलं असून, यावर योगाभ्यासाशी संबंधित अनेक भाषांमधले व्हिडिओ दाखवले जाणार आहेत. यामुळे भारताच्या एक विश्व एक स्वास्थ्य या सिद्धांताला पुढे घेऊन जाण्यास मदत मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले.

****

दरम्यान, सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभरात उत्साहात साजरा होत आहे.उत्तम आरोग्यासाठी योग’ अशी यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे योग-एक भारतीय वारसाया अभियानांतर्गत देशभरातल्या एकूण ७५ सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी, योगाभ्यास आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. याअंतर्गत औरंगाबाद नजिकची वेरूळ लेणी, पुण्याचा आगा खान पॅलेस, मुंबई नजिकची कान्हेरी लेणी आणि नेहरू विज्ञान केंद्र, तसंच नागपूर इथं जुन्या उच्च न्यायालयाच्या इमारतीतही योगाभ्यास घेण्यात आला. नागपूर इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी योगाभ्यासात सहभागी होत नागरीकांना आंतरराष्ट्रीय योद दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

धुळे इथं योग शिक्षक अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास घेण्यात आला. माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यावेळी उपस्थित होते.

****

केंद्र सरकारनं १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेतली आहे; मात्र महाराष्ट्रात राज्य सरकारनं ३० ते ४५ वर्षे वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोविन अॅपवर १८ वर्षांपुढील नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली, तरी ३० वर्षांपुढील नागरिकांनाच प्रथम लस देण्यात येणार आहे. लस जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्यास १८ वर्षांपुढील नागरिकांनाही लस देण्यात येणार असल्याची माहिती, राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली.

दरम्यान, दोन कोटी ७७ लाख नागरिकांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे. राज्यात आतापर्यंत दोन कोटी २२ लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

****

देशात काल नव्या ५३ हजार २५६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर एक हजार ४२२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या दोन कोटी ९९ लाख ३५ हजार २२१ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत तीन लाख ८८ हजार १३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. काल ७८ हजार १९० रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत दोन कोटी ८८ लाख ४४ हजार १९९ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या सात लाख दोन हजार ८८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २८ कोटी ३६ हजार ८९८ नागरिकांचा लसीकरण झालं आहे. 

****

देशातल्या दिव्यांगांमध्ये खेळाबद्दलची आवड आणि दिव्यांगांनी पॅराऑलिम्पिकमध्ये केलेली उत्तम कामगिरी लक्षात घेत देशाच्या विविध भागात पाच ‘दिव्यांग क्रीडा केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण खात्याचे मंत्री थावरचंद गहलोत यांनी ही माहिती दिली.

****

राज्यातल्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाला दिला आहे. राज्यातल्या इच्छुक व्यावसायिक, उद्योजक आणि संस्था यांनी ९० टक्के कर्ज आणि तीन टक्के व्याज सवलतीच्या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे.  पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोगशाळा या उद्योगांसाठी हा निधी मिळाला असून, या विविध उद्योगांसाठी ९० टक्के कर्ज आणि तीन टक्के व्याज सवलतीची योजना शासनाने जाहीर केली असल्याचं केदार यांनी सांगितलं.

****

बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यातल्या किनगांव इथं जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी अधिकाऱ्यांनी छापा घातला. विलास कृषी केंद्र संचालक ज्ञानेश्वर किसन नागरे हे अंकुर सोयाबिन कंपनीचे जे.एस ३३५ या वाणाची जादा भावाने विक्री करत असल्याचा कच्चे बिल देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.  

****

इंग्लंडमध्ये साऊथहँप्टन इथं भारत आणि न्युझीलंडदरम्यान सुरू असलेल्या विश्व क्रिकेट कसोटी अजिंक्यपदाच्या सामन्याच्या कालच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवण्यात आला तेव्हा न्युझीलंडची धावसंख्या दोन बाद १०१ अशी होती. भारताच्या पहिल्या डावातील २१७ या धावसंख्येला उत्तर देताना न्युझीलंडनं सामन्यावर पकड निर्माण केली आहे.

****

No comments: