आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ जून
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
सातवा
आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभरात उत्साहात साजरा होत आहे. ‘उत्तम आरोग्यासाठी योग’ अशी
यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘योग-एक
भारतीय वारसा’ या अभियानांतर्गत देशभरातल्या एकूण ७५ सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या
ठिकाणी, विशेष कार्यक्रम पार पडले. मुंबईत राजभवन इथं आयोजित केलेल्या योग वर्गात राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी सहभागी झाले होते.
औरंगाबाद
इथं विभागीय क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात योगगुरू सुभाष वेद पाठक यांनी विविध
आसनाबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केलं. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह अधिकारी
आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांना योग दिनाच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. योग मानवतेस भारताची एक अनुपम भेट आहे. योग कोविड-19 संदर्भातही
उपयोगी ठरू शकतो, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने
आपण दररोज योगाभ्यास करून आपले जीवन शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या उज्वल
करण्याचा संकल्प करूया, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
केंद्र
सरकारच्या वतीनं १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्याची देशव्यापी
मोहीम आजपासून सुरु झाली. या लसीकरणासाठीची सर्व तयारी करण्यात आली असून, राज्यांच्या
लस पुरवठ्यात वाढ केली जात आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारला १५ हजार कोटी रुपये
अतिरिक्त खर्च येणार आहे.
****
मराठा
आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिक मध्ये आज राज्यस्तरीय आंदोलन करण्यात येत आहे. खासदार
संभाजी राजे छत्रपती यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होत आहे.
****
पुण्यात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर
गर्दी जमवल्या प्रकरणी, पोलिसांनी दीडशे कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हे नोंदवले आहेत.
शहरात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक निर्बंध असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला, सुमारे पाचशे कार्यकर्ते उपस्थित होते. तसंच यावेळी
नियमांचा भंग झाल्याचं आढळून आल्यानं, हा गुन्हा दाखल करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment