Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 June 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जून २०२१
दुपारी १.०० वा.
****
देशात आतापर्यंत २८ कोटी
८७ लाख ६६ हजार २०१ नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं. दरम्यान, भारतानं
काल एकाच दिवसात कोरोना प्रतिबंधक लसीच्या सुमारे ८६ लाखांहून अधिक मात्रा देण्याचा
विक्रम नोंदवला. केंद्र सरकारनं कालपासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत लसीकरण सुरू
केलं आहे. विक्रमी लसीकरण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला
आहे.
****
देशात कोरोना विषाणूच्या
सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक
४९ शतांश टक्के झाला आहे. देशात काल ४२ हजार ६०९ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, तर एक हजार १६७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर काल ८१ हजार ८३९
रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत दोन कोटी ८९ लाखांहून अधिक रुग्ण कोरोना विषाणू मुक्त
झाले असून, सध्या सहा लाख ६२ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
यावर्षीची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. पहलगाम आणि बालतालच्या मार्गाने २८
जून रोजी सुरू होणारी यात्रा २२ ऑगस्ट पर्यंत चालणार होती. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल
मनोज सिन्हा यांनी श्री अमरनाथ देवस्थान मंडळाशी चर्चा केल्यानंतर यात्रा रद्द करण्याचा
निर्णय जाहीर केला. मात्र भाविकांना ऑनलाइन पद्धतीनं दर्शन आणि आरतीचा लाभ घेता येईल
आणि अमरनाथाची पूजा अर्चा पारंपरिक पद्धतीने केली जाईल, असं ट्वीट सिन्हा यांनी केलं
आहे.
****
भारती एअरटेल आणि टाटा समूहाने
भारतात फाईव-जी नेटवर्क सोल्यूशन तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, आता परदेशी
किंवा चीनी ऐवजी स्वदेशी फाईव्ह-जी नेटवर्क उपलब्ध होणार आहे. ही फाईव जी उत्पादने
आणि सोल्यूशन्स जागतिक मानके लक्षात ठेवून बनवली जात आहेत. यामुळे भारताला नाविन्यपूर्ण
आणि निर्मितीचं ठिकाण बनण्यास मदत होईल, असं भारत आणि दक्षिण आशियातील भारती एअरटेलचे
मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल यांनी सांगितलं.
****
राज्याच्या ग्रामीण भागात
आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची प्रगतीपथावर असणारी बांधकामे पूर्णत्वाला न्यावीत,
त्यानंतर नवीन आरोग्य संस्थाना मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जावा,
अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या
लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याची तयारी आणि करावयाच्या उपाययोजना, याचा काल मुख्यमंत्र्यांनी
आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील आरोग्य सेवा-सुविधा तसंच प्राणवायू
उत्पादन निर्मिती आणि साठवणूक क्षमता, यांचीही त्यांनी माहिती घेतली. नियोजन आयोगाच्या
शिफारशीनुसार आरोग्य सेवांसाठी स्थूल राज्य उत्पन्नाच्या किमान पाच टक्के निधी उपलब्ध
करून देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीत दिल्या.
****
राज्यात म्यूकरमायकोसिसच्या
रुग्णांची संख्या सात हजार ९९८ झाली असून, आतापर्यंत या आजाराने ७२९ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. सध्या राज्यात चार हजार ३९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागपूर मध्ये सर्वाधिक
एक हजार २९६, पुण्यात एक हजार १८७ तर औरंगाबादमध्ये म्यूकरमायकोसिसचे ९४० रुग्ण आहेत.
****
आशा कार्यकर्त्या आणि गटप्रवर्तक
युनियनच्यावतीनं राज्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या मागण्यांकडे
लक्ष वेधण्यासाठी काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार
घोषणाबाजी करण्यात आली. १५ जूनपासून बेमुदत संप सुरू असून, राज्यातल्या ७० हजार आशा
कार्यकर्त्या आणि गटप्रवर्तक संपावर गेल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर
इथं सोनाजी सरवदे यांच्या शेतात कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान
मार्गदर्शन आणि बीबीएफ यंत्रद्वारे सोयाबीन पेरणीचं प्रात्यक्षिक काल दाखवण्यात आलं.
खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी
कृषी विभागामार्फत हे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे.
****
नांदेड इथल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या
विद्युत विभागात पुण्याच्या जेफरान इंडिया प्राइवेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने सुमारे
५० हजार रुपये किंमतीचा थ्री फेज व्हिएफडी ड्राईव्ह विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क उपलब्ध
करुन देण्यात आलं आहे. हे उपकरण अद्यावत असून, याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी उद्योगात
वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी होणार आहे. या ड्राईव्हचे उद्घाटन
संस्थेचे प्राचार्य डॉ.जी.व्ही.गर्जे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
भारताचा गोळाफेक पटू ताजिंदर
पाल सिंह तूर हा टोकियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
पतियाळा इथं झालेल्या इंडियन ग्रँन्ड प्रिक्स स्पर्धेत त्यानं काल २१.४९ मीटर दूर अंतरापर्यंत
गोळा फेकला, यामुळे ताजिंदर पालनं फक्त राष्ट्रीयच नाही, तर आशियायी विक्रमही मोडला.
****
No comments:
Post a Comment