Tuesday, 22 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात आजपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली. तरुणांनी लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व आरोग्य केंद्रांवर आजपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस घेता येणार आहे.

****

राज्यातलं पहिलं बाल कोविड केअर सेंटर काल रत्नागिरीत सुरु झालं. या सेंटरसह महिला रुग्णालयातला कोरोना बालरुग्ण विभाग आणि स्वस्तिक समर्पित बाल कोविड रुग्णालयाचं लोकार्पण काल पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं. रत्नागिरीत मारुती मंदिर परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात १०० खाटांची व्यवस्था असणाऱ्या या बाल कोविड केअर सेंटरमध्ये लहान मुलांना खेळण्याची साधनं, चित्रं आणि व्हिडीओ बघण्याची व्यवस्था आहे.

****

आत्मनिर्भर भारत अंतर्गतच्या पीएम स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी- पीएम स्वनिधी या योजनेअंतर्गत उस्मानाबाद इथं स्थापन करण्यात आलेल्या आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून, अनेक हातगाडीवाले तसंच छोट्या व्यावसायिकांना १० हजार रुपयांचं कर्ज देण्यात आलं आहे. ज्या लाभार्थ्यांनी या कर्जाचा नियमित परतावा केला, अशा लाभार्थ्यांना पुन्हा २० हजार रुपयांचं कर्ज मिळणार आहे, असं जिल्हा मार्गदर्शन केंद्राचे संयोजक सचिन लोंढे यांनी केलं आहे.

****

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काल नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं ऑनलाईन योग साधना मार्गदर्शन शिबीर घेण्यात आलं. तणावमुक्ती, तंदुरुस्ती आणि मन:शांतीसाठी योगा महत्वाचा असून, प्रत्येक व्यक्तीने योग जीवनशैली अंगीकारावी असं आवाहन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातील आष्टूर इथल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३० ते ४४ वर्षे वय असलेल्या तरूणांनी काल रांगा लाऊन लस घेतली. आष्टूरचे सरपंच श्री बाबासाहेब बाबर यांनी लोकांच्या मनातील शंकाच निरसन करून लस घेण्यासाठी प्रेरित केलं.

****

No comments: