Thursday, 1 July 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 July 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ जुलै  २०२१ सायंकाळी ६.१०

****

राज्यात कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** डिजिटल इंडियामुळे नागरीकांच्या जीवनात मोठा बदल झाल्याचं, पंतप्रधानांचं प्रतिपादन; ई नाम प्रणालीसंदर्भात हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी प्रल्हाद बोरघड यांच्याशी साधला संवाद

** कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान    

** उस्मानाबाद जिल्ह्यातले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले शिक्षक उमेश खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर

आणि

** तिसऱ्या अखिल भारतीय डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन मराठी साहित्य संमेलनाचं येत्या रविवारी आयोजन

****

देशात गेल्या सहा वर्षांत डिजिटल इंडियामुळे नागरीकांच्या जीवनात मोठा बदल झाला असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया मोहिमेला आज सहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी, ‘डिजिटल इंडियाच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. देशातल्या सर्वात मोठ्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी वापरण्यात येणारं कोविन ॲप, हे देशाच्या तांत्रिक कौशल्याचं उत्तम उदाहरण असून, अनेक देशांनी या ॲपमध्ये रुची दर्शवली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मेहनत आणि पैशांची बचत, कमी वेळेत अधिक काम तसंच 'किमान शासन-कमाल प्रशासन' म्हणजे डिजिटल इंडिया असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथले शेतकरी प्रल्हाद बोरघड यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधत, ई-नाम प्रणालीमुळे झालेल्या लाभांबाबत माहिती जाणून घेतली. ई-नामच्या माध्यमातून पिकाला किंमतही चांगली मिळते, या ऑनलाइन माध्यमामुळे टाळेबंदी काळातही माल विकण्यात अडचण आली नाही, असं बोरघड यांनी सांगितलं. पंतप्रधानांसोबत झालेल्या संवादाबाबत सांगताना, प्रल्हाद बोरघड म्हणाले...

खूप मनातून आनंद होतोय की, सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एवढा मोठा सन्मान मिळाला. अतिशय मनाला प्रेरणा देणार होतं. आणि येत्या भविष्य काळामध्ये आणखी कसं चांगल काम करता येईल याच्या संदर्भामध्ये आम्हाला एक उर्जा देऊन गेले ते शब्द, आणि पुढे नक्कीच याचा फायदा येत्या भविष्य काळामध्ये शेतकरी वर्गाला आम्ही मिळवून देऊ.

****

शेती व्यवसायातली अनिश्चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कृषी विभागातर्फे राबवण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा आज समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शेतकरी हे महाराष्ट्राचं वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेतले जाणार नाहीत. राज्याचं हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषीदिनानिमित्त शुभेच्छा देतानाच आजच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाचा उल्लेख करत कोविड काळात शेतकरी आणि डॉक्टर यांनी केलेल्या कामाकडे लक्ष वेधत, हे दोन्ही अन्नदाते आणि जीवनदाते असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

रब्बी हंगाम २०२०च्या पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याची भेट मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पुस्तिकेचं यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.

****

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०१७-१८ च्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीच्यामाध्यमातून हा सोहळा घेण्यात आला. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातल्या अवनखेड ग्रामपंचायतीस प्रथम, अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातल्या लोणी बुद्रूक या ग्रामपंचायतीस द्वितीय तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ला तालुक्यातल्या कुशेवाडा या ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. स्वच्छते प्रमाणेच आता कोरोनामुक्त गाव स्पर्धा राज्य शासनाने सुरू केली आहे. गावे स्वच्छ झाली, तर कोरोनालाही आपल्याला हद्दपार करता येईल. सर्वांनी एकत्र येवून दृढनिश्चय करून प्रयत्न केले तर आपला महाराष्ट्र लवकरात लवकर कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे महत्त्व लक्षात घेता या खात्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

संगीत उद्योजक गुलशनकुमार हत्या प्रकरणी अब्दुल रऊफ उर्फ दाउद मर्चंट याला मुंबई उच्च न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातले दोन आरोपी रमेश तौरानी तसंच अब्दुल रशीद या दोघांना सत्र न्यायालयानं मुक्त केलं होतं, मात्र राज्य सरकारनं या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयानं तौरानीच्या सुटकेचा निर्णय योग्य ठरवला, मात्र अब्दुल रशीदला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातल्या कडदोरा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या NCERT च्या वतीने २०१८ चे राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार देशातल्या २५ शिक्षकांना जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन शिक्षकांचा समावेश असून, त्यापैकी मराठवाड्यातून उमेश रघुनाथ खोसे यांना हा बहुमान मिळाला आहे.

****

जीवनात शिक्षणा सोबतच संस्कारही तितकेच महत्त्वाचे आहेत, हे संस्कार आजच्या पिढीला देण्याचे मोलाचे कार्य भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतून होत असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले आहेत. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं उदघाटन आज मुंडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू बिसेन, संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा फक्त उच्चशिक्षित नसून स्वयंपूर्ण असावा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच संस्थेच्या पुढील वाटचालीस मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकीतून शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचं वाटप करण्यात आलं.

****

ग्रामीण भागातील गोर गरीब शेतकऱ्यांना शेतीमध्ये फळबाग बरोबर इतर उत्पन्नाचा लाभ व्हावा म्हणून परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी जिल्ह्यात १ हजार ४०८ सिंचन विहिरींना मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात आता पर्यंत ४२६ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. सिंचन विहिरींच्या कामामध्ये नियमितता यावी म्हणून टाकसाळे दर १५ दिवसाला आढावा घेत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं येत्या रविवारी ४ तारखेला तिसऱ्या अखिल भारतीय डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन ऑनलाइन घेण्यात येणार आहे. कवी डॉ. अमोल बागुल संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार असून केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. रविवारी ४ जुलैला सकाळी ११ वाजता ऑनलाईन समाज माध्यमांवर हे संमेलन होणार आहे. कविसंमेलन आणि परिसंवाद, चर्चासत्रं तसंच विविध साहित्यकृतीच्या पुस्तकांसाठी पुरस्कार असं या साहित्य संमेलनाचं स्वरूप आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या ११६१ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात १० नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार २०५ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या १४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार ८७१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या १७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज एका कोविड बाधिताचा शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ४२७ जण कोविड संसर्गानं दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या आता एक लाख ४६ हजार २०८ झाली असून एक लाख ४२ हजार १३२ जणांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे.

****

कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागातल्या काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यातील बहुतांश रेल्वे गाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत या महिन्यापासून सुरु होणार आहेत. यात नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, रामेश्वरम एक्स्प्रेस आणि विशाखापट्टणम एक्सप्रेस या रेल्वे गाड्या या आठवड्यात सुरु होत आहेत.

//*********//

 

 

No comments: