Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 July 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जुलै २०२१ दुपारी १.०० वा.
****
राज्यात
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात पूरग्रस्त भागात मदतकार्य सुरु आहे. मदत आणि
पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागातून सुमारे ९० हजार लोकांना
सुखरूपपणे बाहेर काढलं आहे. राज्यात पूरामुळे एकूण ७६ नागरिकांचा मृत्यू झाला असून,
७५ जनावरं दगावली आहेत, ३८ जण जखमी झाले आहेत, तर ३० जण बेपत्ता आहेत. राष्ट्रीय आपत्ती
निवारण दल - एनडीआरएफ, नौदल, हवाई दलाच्या पथकामार्फत बचावकार्य सुरु आहे.
दरम्यान,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज महाड परिसरात पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी राज्यातल्या पूर परिस्थितीबाबत
चर्चा केली. राज्यात झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपतींनी दु:ख व्यक्त केलं. पूरग्रस्त
भागात सुरु असलेल्या मदत कार्याविषयी राज्यपालांनी राष्ट्रपतींना माहिती दिली.
****
देशात आतापर्यंत
कोविड प्रतिबंधक लसीच्या ४२ कोटी ७८ लाख ८२ हजार २६१ मात्रा वितरीत करण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या ३९ हजार ९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५४६ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी १३ लाख ३२
हजार १५९ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख २० हजार १६ रुग्णांचा मृत्यू झाला
आहे. काल ३५ हजार ८७ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी पाच लाख तीन हजार १६६
रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार लाख आठ हजार ९७७ रुग्णांवर उपचार सुरु
आहेत.
****
प्रसिद्ध
कवी सतीश काळसेकर यांचं आज पहाटे रायगड जिल्ह्यातल्या पेण इथं हृदयविकाराच्या झटक्यानं
निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. त्यांचे वाचणाऱ्याची रोजनिशी, इंद्रियोपनिषद, साक्षात,
विलंबित हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. २०१३ साली त्यांना वाचणाऱ्याची रोजनिशी या
काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ७९ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
भारतीय पोस्ट
बँकेनं आधार कार्डमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठीच्या नव्या योजनेचं लोकार्पण
केलं. ही सुविधा भारतीय पोस्ट बँकेच्या ६५० शाखांवर उपलब्ध असेल. ज्यांच्याकडे आधार
कार्ड आहे त्यांना आता घरबसल्या आपल्या पोस्टमनकडून त्यात आपला भ्रमणध्वनी क्रमांक
अपडेट करून घेता येणार आहे, असं महाराष्ट्राचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच सी अगरवाल
यांनी सांगितलं.
****
कोरोना महामारीच्या
पार्श्वभूमीवर यंदा बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय राज्याच्या
शिक्षण विभागाने घेतला आहे. गेल्या वर्षी ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादांमुळे अभ्यासक्रमात
कपात करण्यात आली होती.
****
मध्य रेल्वे
मधल्या इगतपुरी-कसारा-कल्याण घाटांमध्ये पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे तसंच दरड
कोसळल्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई – अदिलाबाद नंदीग्राम
एक्स्प्रेस, नांदेड - मुंबई राज्यराणी विशेष रेल्वे, नांदेड - मुंबई तपोवन एक्सप्रेस
आणि नांदेड - पनवेल विशेष रेल्वे २७ जुलै पर्यंत रद्द करण्यात आल्या असून, परतीच्या
प्रवासातल्या या गाड्या २८ जुलैपर्यंत रद्द केल्या असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं
आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या
सेलू इथले उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल आणि पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव
चव्हाण यांना दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. एका अपघाताच्या प्रकरणात
व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिप प्रकरणी त्यांनी तक्रारदाराकडून दोन कोटी रुपयांची मागणी
केली होती. तडजोडीअंती ती एक कोटी ५० लाख इतकी ठरली. त्यापैकी दहा लाख रुपये घेताना
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली.
****
टोक्यो ऑलिम्पिक
मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं.
या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलंच पदक आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानू यांचं अभिनंदन केलं आहे.
हॉकीमध्ये
भारतीय संघानं अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंड संघाचा तीन - दोन असा पराभव केला. भारतीय
महिला हॉकी संघाचा आज पहिला सामना होणार आहे.
तिरंदाजीमध्ये
मिश्र सामन्यात उपान्त्यपूर्व फेरीत दीपिकाकुमारी आणि प्रवीण जाधव यांच्या संघाचा दक्षिण
कोरियाकडून दोन - सहा असा पराभव झाला.
टेबल टेनिसच्या
मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या शरथ कमल आणि मनिका बत्रा यांचा चीनच्या खेळाडूकडून
पराभव झाला.
नेमबाजीमध्ये
सौरभ चौधरी १० मीटर एयर पिस्टल प्रकारात सातव्या स्थानावर राहीला. तर दहा मीटर एअर
रायफल स्पर्धेत मात्र भारतीय महिला नेमबाजांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment