Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 July 2021
Time 7.10AM to 7.20AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४
जुलै
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे.
तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत
करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना
करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी
आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या
राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
राज्यात अतिवृष्टी आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये ५८ जणांचा मृत्यू; मृतांच्या
संख्येत वाढ होण्याची भीती; रत्नागिरी रायगडसह सर्व ठिकाणी बचावकार्याला वेग.
·
मराठवाड्यात हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान.
·
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही स्थगित.
·
राज्यात नवे सहा हजार ७५३ कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार रुग्णांचा मृत्यू तर
नव्या ३२७ बाधितांची नोंद.
·
किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी -
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश.
आणि
·
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचं उद्घाटन; तर श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिकेत
भारताचा, दोन - एकने विजय
****
राज्यात अतिवृष्टी आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये ५८ जणांचा मृत्यू झाला असून,
मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. रायगड जिल्ह्यात तळई गावांत काल दरड कोसळून
झालेल्या दुर्घटनेतील ३८ जणांचे मृतदेह, बचाव पथक आणि स्थानिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात
आले. अजून ३० ते ४० जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे.
पोलादपूर तालुक्यात गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी इथं दरड कोसळून पाच जणांचा
मृत्यू झाला, या दुर्घटनेत आठ ते दहा घरांचं नुकसान झालं असून, काही घरं दरडीसोबत वाहून
गेली. केवनाळे इथंही सहा जणांचा मृत्यू झाला, या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं तिघांचा महापुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाला
असून, त्यापैकी एकाची ओळख पटलेली नाही, असं जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात
आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी जमीन खचून झालेल्या दुर्घटनेत, ३१ जण मातीखाली
गाडले गेल्याची भीती जिल्हा प्रशासनानं वर्तवली आहे. आतापर्यंत तीन जणांचा जमीन खचून
मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. वाई तालुक्यात देवरुखकरवाडी,
ढोकावळे आणि मिरगाव इथं जमीन खचून काही घरं मातीखाली दबली आहेत, जावळी तालुक्यात रेंगडी
इथं दोघांचा, तर वाई तालुक्यातल्या जोर इथं दोघांचा पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाला,
पुरात वाहून गेलेल्या रेंगडी इथल्या दोघांचा शोध अद्याप सुरू आहे.
राज्यात पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती
व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी दुःख व्यक्त केलं आहे. रायगड जिल्ह्यात
दरड कोसळल्याने मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून
दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
राज्यशासनानं, दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी
पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी
आहोत, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. या दुर्घटनांमधील
जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.
दरम्यान, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसंच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे
निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आढावा
घेतला. प्रशासन आणि नागरिक यांनी समन्वयानं काम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे
यांनी दिले.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल-एनडीआरफच्या १४ तुकड्या, तटरक्षक दलाच्या दोन, तसंच
नौदलाच्या दोन तुकड्यांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू असल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिली.
****
महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथकं आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने
सुरुवात झाली आहे. रस्ते मोकळे करण्याचं काम सुरू असून, पूरग्रस्तांसाठी खाद्य तसंच
पेयपदार्थ एसटीद्वारे पोहोचवण्यात येत आहेत. आरोग्य यंत्रणाही सज्ज असल्याची माहिती
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. महाडमध्ये सुमारे दोन हजार जणांना सुरक्षित स्थळी
हलवण्यात आलं आहे.
****
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागात सेनादलांच्या सहभागाने मदतकार्याला
वेग आला आहे. चिपळूण परिसरात अडकलेल्या ५०० जणांना सुखरुप सोडवण्यात आलं. खेड परिसरात
दरड कोसळल्यानं, आठ कुटुंब अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रीय आपत्ती
प्रतिसाद दल - एनडीआरएफचं दहा जणांचं पथक मदत साहित्यानिशी रत्नागिरीला पोहोचलं आहे.
पश्चिम नौदलाची पाच पथकं चिपळूणला, तर दोन पथकं महाडला मदतकार्यासाठी रवाना झाली आहेत.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या २०३ कुटुंबातील ८०५ व्यक्तींना स्थलांतरित करण्यात
आलं आहे. सर्वाधिक ४२५ जण दोडामार्ग तालुक्यातले आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं
पाणी शिरल्यानं खबरदारीची उपाययोजना म्हणून हे स्थलांतर करण्यात आलं आहे.
****
कोल्हापूर - पन्हाळा रस्त्यावर अडकलेल्या २२ जणांची सुटका करण्यात आली. हवाईदलाची
Mi-17 हेलिकॉप्टर्स मदतकार्यात सहभागी झाली असून, हेलिकॉप्टर्सनी सायंकाळपर्यंत दोन
जणांची सुटका केली होती.
****
सातारा जिल्ह्यातही ७५५ नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.
कोयना धरणातून सध्या ५२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत
आहे.
****
सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांना अचानक आलेल्या पुरामुळे
नदीची पातळी ४४ फुटा पर्यंत गेली आहे. नदीची पातळी आणखी बारा फूट पाणी वाढण्याचा इशारा
प्रशासनाने दिला आहे.
****
मराठवाड्यात कालही अनेक भागात जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्याच्या औंढा
नागनाथ तालुक्यात रामेश्वर ते दौडगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं, तीन
गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून, हजारो
हेक्टर शेतातली पिकं पाण्याखाली आली आहेत. या भागात सोयाबीन, हळदीसह बहुतांश पिकं पुराच्या
प्रवाहामुळे खरडून गेली आहेत.
परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने नऊ तालुक्यातल्या
खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टर क्षेत्रावरील
सोयाबीन, कापूस, तूर या नगदी पिकांसह अन्य खरीप पिकं तसंच फळबागांचं नुकसान झाल्याची
माहिती जिल्हा प्रसासनाने दिली आहे. जिंतूर तालुक्यात कोरवाडी इथं शेततळे फुटून ५०
टक्के शेतीवरची पिकं नष्ट झाली आहेत. सेलू तालुक्यात भोसी इथं बंधारा फुटल्याने १००
हेक्टरपेक्षा जास्त शेतीवरची पिकं पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे गुरुवारपर्यंत
जिल्ह्यात ३१३ पाळीव पशू दगावल्याची प्रशासकीय नोंद आहे.
औरंगाबाद तसंच नांदेड जिल्ह्यात कालही पावसाची संततधार सुरू होती. नांदेड जिल्ह्यात
धर्माबाद तालुक्यातल्या जरिकोट, धर्माबाद, करखेली, कुंडलवाडी आणि बिलोली या पाच महसूल
मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. चार दिवसापासून सतत होत असलेल्या पावसामुळे सखल भागातील
पिक पाण्याखाली गेली आहेत.
नांदेड जिल्ह्यातल्या मध्यम प्रकल्पात सुमारे ६० टक्के, नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात
७१ टक्के, तर ८८ लघु प्रकल्पात, ५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यातून
तेलंगणा राज्यात, एक हजार २९१ दशलक्ष घनमीटर पाणी वाहून गेलं आहे, डॉ. शंकरराव चव्हाण
विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा काल बंद करण्यात आला, तर तीन दरवाजातून, एक हजार ५३
घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
नाशिक जिल्ह्यातलं गंगापूर धरण ५८ टक्के भरलं आहे. निफाड तालुक्यातल्या नांदूर
मधमेश्वर बंधाऱ्यातून साडे सहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू
आहे.
****
पेगॅसससह अन्य प्रकरणावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही
सभागृहांचं कामकाज कालही स्थगित करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधकांनी
घोषणाबाजी सुरू केली. सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी, तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू
सेन यांना सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी, पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित
काळासाठी निलंबित केलं. खासदार शंतनू सेन यांनी, सभापतींच्या सूचनेनंतरही सदनाबाहेर
जाण्यास दिलेला नकार, आणि तृणमूल काँग्रेसच्या अन्य सदस्यांचा गदारोळ यामुळे राज्यसभेचं
कामकाज आधी तीन वेळा त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं
लोकसभेतही कामकाज सुरु होताच विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे
कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर संपूर्ण दिवसासाठी स्थगित करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ७९ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यात काल सहा हजार ७५३ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ५१ हजार ८१० झाली आहे. काल १६७ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३१ हजार
२०५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ०९ शतांश टक्के झाला आहे. काल पाच हजार ९७९ रुग्ण
या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ६० लाख २२ हजार ४८५ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ३३ दशांश टक्के झाला आहे.
सध्या राज्यभरात ९४ हजार ७६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३२७ कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन, तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १८३ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ७२,
औरंगाबाद ३१, लातूर २७, जालना तसंच नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी पाच, तर हिंगोली जिल्ह्यात
चार नवे रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून यंत्रणांनी कोविड चाचण्या वाढवण्यावर अधिक
भर देण्याची सूचना, औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी, केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड उपाय योजनांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी आवश्यक नियोजन काटकोरपणे करावं, म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचीही
प्राधान्याने काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही पांडेय यांनी यावेळी केल्या.
****
राज्यातल्या किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार
करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. काल मुंबईत
झालेल्या आढावा बैठकीत देशमुख यांनी, गड किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करताना, गड किल्ल्यांच्या
ठिकाणी आवश्यक त्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. पुराभिलेख संचालनालयाकडे
असलेला ऐतिहासिक वारसा डिजिटल स्वरुपात जतन करण्याच्या कामाला गती देण्याची सूचनाही
देशमुख यांनी केली.
****
जलजीवन मिशन अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबवण्यात
येत आहे. या अभियानातंर्गत जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळ
जोडणी द्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
****
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचं पारंपरिक पद्धतीनं काल सायंकाळी उद्घाटन झालं. जपानच्या
टोक्यो शहरात सुरू असलेल्या या उद्धाटन सोहळ्याच्या संचलनात, भारताच्या हॉकी संघाचा
कर्णधार मनप्रीत सिंग, आणि मुष्टियोद्धा मेरी कोम यांनी भारतीय पथकाचं नेतृत्व केलं.
कोरोना विषाणू साथीमुळे वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या, आणि सध्या प्रेक्षकांविना
होत असलेल्या या ऑलिम्पिक स्पर्धेचं, डीडी स्पोर्ट्स या वाहिनीवर रोज पहाटे पाच ते
संध्याकाळी सात या वेळेत थेट प्रसारण होणार आहे.
****
टोक्यो ऑलिम्पिक मध्ये सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चिअरअप इंडीया
या मोहिमेंतर्गत काल सकाळी औरंगाबाद शहरात सायकल फेरी काढण्यात आली. माहिती आणि प्रसारण
मंत्रालयाचं औरंगाबाद विभागीय कार्यालय आणि औरंगाबाद इथल्या सायकलिस्ट संस्थेच्या वतीने
काढण्यात आलेल्या या फेरीबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या औरंगाबाद विभागाचे
व्यवस्थापक संतोष देशमुख यांनी या अधिक माहिती दिली. ते म्हणाले –
ही जी रॅली आहे, याचा मुख्य उद्देश म्हणजे आपले जे भारतीय खेळाडू जे टोकिया
२०२१ करता गेलेले आहेत, त्यांचं मनोबल वाढवणं, त्यांना शुभेच्छा देणं आणि प्रत्येक
इंडिव्हिज्युअल चा सहभाग त्याच्यामधे होणं, या करता आम्ही ही सायकल रॅली ब्युरोच्या
वतीनं आम्ही ऑर्गनाईज केली. ह्या रॅलीच्या माध्यमातनं असा भारत सरकारच्या वतीनं एक
प्रयत्न आहे की मोठ्या प्रमाणात जनजागरण व्हावं आणि लोकांचा त्याच्यामधे सहभाग व्हावा
हे अभियान खूप मोठं व्हावं. या अभियानाचा एक स्लोगन आहे “आय चिअर फॉर इंडिया”.
****
श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं, दोन - एकने जिंकली. काल
या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना श्रीलंकेनं तीन गडी राखून जिंकला. पावसाच्या व्यत्ययामुळे
सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं दिलेलं
२२६ धावांचं आव्हान, श्रीलंकेच्या संघानं ३९ षटकातच पूर्ण केलं. श्रीलंकेचा फलंदाज
अविष्का फर्नांडो सामनावीर, तर भारताचा सूर्यकुमार यादव मालिकावीर ठरला.
****
No comments:
Post a Comment