Saturday, 24 July 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.07.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ जुलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

आजच्या धम्मचक्र दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन परिसरात बोधी वृक्षाचं रोपण केलं. यानिमित्त केलेल्या संबोधनात राष्ट्रपतींनी, जगाने बुद्धाच्या मानवता आणि प्रेमाचा संदेश जाणून घेतला पाहिजे, असं नमूद केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धम्मचक्र दिवसानिमित्त देशवासियांनी केलेल्या संबोधनात गौतम बुद्धाच्या तत्वाचं महत्व विषद करुन सांगितलं. कोरोना महामारीच्या काळात गौतम बुद्धांचे विचार समर्पकच, असल्याचं ते म्हणाले.

****

वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एनईईटी आणि इतर सामान्य प्रवेश परीक्षा स्थगित करण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे. पदव्युत्तर पदवी धारकांसाठीची नीट परीक्षा ११ सप्टेंबरला, तर पदवीधारकांसाठीची नीट परीक्षा १२ सप्टेंबरला होईल, असं आरोग्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री भारती पवार यांनी सांगितलं.

****

प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांचं आज पहाटे ठाणे इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. त्यांचे वाचणाऱ्याची रोजनिशी, इंद्रियोपनिषद, साक्षात, विलंबित हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. २०१३ साली त्यांना ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज ठाणे इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

****

अश्लील फिल्मच्या निर्मितीप्रकरणी अटकेत असलेला निर्माता राज कुंद्रा याच्या पोलिस कोठडीत २७ जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे. काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. 

****

नांदेड शहरालगतच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन्ही दरवाजे आज सकाळी बंद करण्यात आले. प्रकल्पात सध्या ६६ पूर्णांक ६९ टक्के इतका पाणीसाठा आहे.

****

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारतीय संघानं अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंड संघाचा तीन - दोन असा पराभव केला.

मिश्र तिरंदाजीमध्ये दीपिकाकुमारी आणि प्रवीण जाधव यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी चीनी स्पर्धकांचा त्यांनी पाच - तीन असा पराभव केला. दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत मात्र भारतीय महिला नेमबाजांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

No comments: