Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01
September 2021
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ सप्टेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
** शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातल्या ४८८ शासकीय शाळा 'आदर्श शाळा' म्हणून विकसित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
** ओबीसी आरक्षण न देता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेतल्यास तीव्र
आंदोलन- विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
** राज्य सरकारच्या लसीकरण धोरणावर भाजप नेत्यांची टीका
आणि
** यंदाचा ‘बी. रघुनाथ स्मृती पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक किरण येले यांच्या ‘तिसरा
डुळा’ या कथासंग्रहाला जाहीर
****
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातल्या ४८८ शासकीय शाळा 'आदर्श शाळा' म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली
ही बैठक झाली. शाळांमधील भौतिक सुविधा तसंच
शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करून आदर्श शाळांची निर्मिती केली जाईल. स्वतंत्र शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीतल्या वर्ग खोल्या, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, ICT लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय
यासारख्या सुविधांचा यात समावेश असेल. शैक्षणिक
गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याचा
प्रयत्न करण्यात येईल. पाठ्यपुस्तकांशिवायही अनेक बाबी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील, ग्रंथालयामध्ये पूरक
वाचनाची पुस्तकं आणि संदर्भ ग्रंथ, इनसायक्लोपिडिया उपलब्ध
असतील. स्वअध्ययनासोबतच गट अध्ययनासारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रमही
याअंतर्गत राबवले जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या ४८८ “आदर्श शाळां” च्या विकासासाठी ४९४ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
****
सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालयं आणि
अतिविशेषोपचार रुग्णालयं स्थापन करून वैद्यकीय सुविधात वाढ
करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आयोजित करण्यास आज
झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत हा अमृत महोत्सव राज्यात आयोजित करण्यात येईल. यासाठी विविध समित्या देखिल स्थापन करण्यात येत
आहेत. या संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने आज एका
सादरीकरणाद्धारे माहिती दिली.
****
पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात
भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
****
इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज या संयुक्त
राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत आज
पर्यावरण विभागाने सादरीकरण मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण
केलं. राज्यात या वातावरण बदलाचे किती गंभीर परिणाम होतील याविषयी यावेळी माहिती देण्यात आली.
****
ओबीसी आरक्षण न देता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणूका घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांनी दिला आहे, ते आज नवी मुंबईत सानपाडा इथं माथाडी भवनात एक हजार माथाडी
कामगारांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते. आम्ही
कायद्याचा अभ्यास करून फॉर्म्युला देखील सांगितला आहे, मात्र सरकारच्या मनात काय आहे,
ते सरकारनं सांगावं असं फडणवीस म्हणाले. आमची भूमिका ठाम असून, सरकारनं निवडणुका घेण्याचा
प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. दरम्यान माथाडी
चळवळ संपूर्ण भारतात न्यायची आहे त्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्याचं आश्वासनही
त्यांनी दिलं.
****
केंद्र शासनानं सुरू केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
केंद्र शासनानं आजपासून येत्या ७ तारखेपर्यंत विशेष सप्ताहाचं आयोजन केलं आहे. योजनेचा
लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत
राज्यात २३ लाख ९२ हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना एक
हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधीचं वितरण करण्यात आलं आहे. माता अणि बालमृत्यु दर
कमी करणं आणि माता आणि बालकांचं आरोग्य सुधारणं हा या योजनेचा उद्देश आहे
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं देशात तब्बल ६५ कोटी १५ लाख
लोकसंख्येच्या लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठला आहे. मात्र, राज्य सरकारच्या लसीकरणाबाबतच्या
धोरण लकव्यामुळे लस मिळवण्यासाठी राज्यातील जनतेची केविलवाणी धडपड सुरू असल्याची टीका
भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी केली आहे. भारतासारख्या गरीब देशात ऑगस्टपूर्वी
६० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला जाणार नाही, असा अपप्रचार काही आंतरराष्ट्रीय वाहिन्यांवरून
सुरू होता. मात्र, तब्बल ६५ कोटी १२ लाख लोकांचं लसीकरण पूर्ण करून सरकारने या अपप्रचाराला
चोख चपराक लगावली असल्याचं आमदार सावे यांनी म्हटलं आहे. राज्यातील सर्व नागरिकांना
वेळेवर लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनीही राज्य सरकारच्या लसीकरण धोरणावर टीका
केली आहे.
****
यंदाचा ‘बी. रघुनाथ स्मृती पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक किरण येले यांच्या ‘तिसरा डुळा’
या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे. कवी, कथाकार, पटकथा, गीतकार आणि स्तंभ लेखक असलेले
किरण येले यांचे ‘चौथ्यांच्या कविता’, ‘बाईच्या कविता’ हे दोन कविता संग्रह तसेच ‘मोराची
बायको’ हा कथा संग्रह, ‘प्लॅटफॉर्म नं.9’ हे नाटक प्रकाशीत आहेत. ‘एक चाल सोंगटीची’,
‘चित्ता’ व ‘15 ऑगस्ट’ या चित्रपटांसाठी त्यांनी कथा तसंच पटकथा लेखन केले आहे. ‘शुभंकरोती’,
‘मन उधाण वाऱ्याचे, ‘लक्ष्य’, ‘अस्मिता’, ‘सावित्री ज्योती’, ‘नवे लक्ष्य’ आदी मालिकांसाठीही
त्यांनी लेखन योगदान दिले आहे. बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनी म्हणजेच ७ सप्टेंबर
रोजी प्रसिद्ध लेखिका कवयित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात पुरस्कार
वितरण होणार आहे.
****
शेतकऱ्यांसाठी आंनदोत्सवाचा असणारा पोळा सण येत्या सोमवारी सहा सप्टेंबरला साजरा
होणार आहे. पोळ्यासाठी बाजारपेठ सजली असून शेतकरी बैलांचा साज खरेदी करत आहेत. औरंगाबाद
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्यानं बळीराजा सुखावला आहे.
दरम्यान, सिल्लोड तालुक्यातल्या सारोळा पीर इथं गैबनशहावली बाबा दर्गावर औरंगाबाद,
जालना, बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक आपल्या बैलांसह दर्शनासाठी
येत असतात. मात्र, कोविड संसर्गाच्या अनुषंगानं राज्य शासनाच्या आदेशानुसार भाविकांनी
दर्शनासाठी येवू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात मागच्या चार दिवसात कमी अधिक पाऊस सुरू असला तरी
बीड, नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना जिल्ह्याला अतिवृष्टीचा फार मोठा फटका बसला आहे.
६७ मंडळात अतिवृष्टीमुळे उभ्या पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी हताश झाला आहे. सरकारने
कागदोपत्री घोडे नाचवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तत्काळ आर्थिक मदत करावी
अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात एक
निवेदन राम कुलकर्णी यांनी जारी केलं. किमान हेक्टरी ५० हजार रुपये मदत दिली तरच, या
संकटातून शेतकरी बाहेर पडेल असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
//********//
No comments:
Post a Comment