Wednesday, 1 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.09.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 September 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

गरजु लोकांसाठी पोषण परवडणारं आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असावं, असं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृति इराणी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानमध्ये आज राष्ट्रीय पोषण माह ची सुरुवात केल्यानंतर त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गरोदर आणि स्तन्यदा मातांच्या बँक खात्यात आतापर्यंत आठ हजार ८०० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचं, इराणी यांनी सांगितलं. बालकं, किशोरवयीन मुली, गरोदर आणि स्तन्यदा मातांना योग्य पोषण देण्याबाबत जनजागृती करण्यासाठी, सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून पाळला जातो.

आजपासून आपण राष्ट्रीय पोषण सप्ताहाची सुरुवात करत असून, संतुलित आणि पौष्टिक आहार हा दीर्घ आणि निरोगी जीवनाचा मार्ग असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

****

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पन्नात २० पूर्णंक एक दशांश टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती दिली. ही वाढ गेल्या तिमाहीच्या तुलनेत एक पूर्णांक सहा टक्के एवढी आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात वाढ होत आहे, तसंच ग्रामीण भागात या मागणीत सातत्यानं वाढ होत आहे. विजेचा वापर १७ ते १८ टक्क्यांनी वाढला असून, देशातल्या पेट्रोलचा वापर आणि गाड्यांची विक्री यांचा स्तर आता कोविड पूर्व पातळीपर्यंत पोहोचला असल्याचं सुब्रम्हण्यम यांनी नमूद केलं. बँकिंग क्षेत्र अधिक बळकट झालं असून, बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेनं ६५ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशात एक कोटी ३३ लाख १८ हजार ७१८ नागरीकांना लस देण्यात आली. देशात आतापर्यंत या लसीच्या ६५ कोटी ४१ लाख १३ हजार ५०८ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या ४१ हजार ९६५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी २८ लाख दहा हजार ८४५ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ३९ हजार २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३३ हजार ९६४ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी १९ लाख ९३ हजार ६४४ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख ७८ हजार १८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

काळा पैसा वैध केल्याप्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब काल सक्तवसुली संचालनालयापुढं हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हजर राहू शकत नाही, असं पत्र परब यांनी ईडीला पाठवलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातल्या प्रकरणी चौकशीत अनिल परब यांचंही नाव समोर आलं होतं, त्यानंतर त्यांची चौकशी करण्याची मागणी, राज्यातल्या भाजपा नेत्यांनी केली होती. याबाबत ईडीनं त्यांना काल चौकशीसाठी हजर होण्यास सांगितलं होतं.

****

बीड जिल्ह्यात केज विधानसभा मतदार संघातून जाणारे रखडलेले राष्ट्रीय महामार्ग तसंच राज्य महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावे, तसंच अन्य काही महामार्गास जोडणार्या महत्वाच्या मार्गांना मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे. त्यांनी काल दिल्लीत केंद्रीय दळणवळण, रस्ते महामार्ग मंत्री नीतिन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी मुंदडा यांनी मतदारसंघातल्या सर्व परिस्थितीची गडकरी यांना माहिती दिली. हे महामार्ग लवकरात लवकर झाले तर मतदारसंघाचा कायापालट होऊन स्थलांतर थांबेल, स्थानिक व्यवसायास बाजारपेठ उपलब्ध होईल, आणि शेतमालास चांगला भाव मिळेल, असं मुंदडा यांनी सांगितलं.

****

तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर इथले सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिवंगत जीवनराव घुगे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते अणदूर मधल्या जिल्हा परिषदेच्या सहा शाळांना प्रत्येकी ५० राष्ट्र पुरुषांच्या जीवन चरित्राची पुस्तकं भेट देण्यात आली. या पुस्तकांच्या माध्यमातून राष्ट्र पुरुषांच्या आठवणी त्यांचं जीवनचरित्र विद्यार्थ्यांमध्ये रूजतील, यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होईल, असं मत आमदार पाटील यांनी व्यक्त केलं.

****

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त औरंगाबाद इथल्या कृष्णगुंज बासरी गुरुकुलाच्या वतीनं स्वरस्पर्श ऑनलाईन राष्ट्रीय बासरी वादन स्पर्धा घेण्यात आली. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत औरंगाबादसह कर्नाटक, पंजाब, दिल्ली आदी राज्यांमधल्या बासरीवादकांनी सहभाग नोंदवला. युवा गटात बंगळुरूचा गौतम हेब्बर, शिशु गटात औरंगाबादचा अथर्व केचे, तर प्रारंभिक गटात बीडच्या ओंकार देशपांडेने पहिला क्रमांक पटकावला.

****

No comments: