Wednesday, 1 September 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.09.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 September 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस; नांदेड जिल्ह्यात तीन जण तर बीड जिल्ह्यात एकजण पुरात वाहून गेला.

·      औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड औट्रम घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत.

·      सरकार सणांविरूद्ध नव्हे तर कोरोना विषाणूच्या विरोधात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण.

·      राज्यात चार हजार १९६ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात तीन जणांचा मृत्यू तर २०० बाधित.

·      औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे माजी आमदार आर. एम. वाणी यांचं निधन.

आणि

·      टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडीत भारताच्या मरिअप्पन थंगावेलूला रौप्य तर शरतकुमारला कांस्यपदक, नेमबाजीत सिंघराज अधानालाही कांस्य पदक.

****

राज्यात अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्यात ३१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

नांदेड जिल्ह्यात काल तीन जणांचा पुरात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. कंधार तालुक्यात गगनबीड इथला २६ वर्ष वयाचा तरूण उमेश मदेबैनवाड हा मोटारसायकलसह पुरात वाहून गेला. मुखेड तालुक्यातल्या ऊंदरी-पट्टी देगाव इथला १५ वर्षे वयाचा कमलाकर गडाळे हा मुलगा, काल सकाळी गावाजवळच्या नाल्यात अचानक पाण्याचा लोंढा आल्यानं वाहून गेला. लोहा तालुक्यात कोष्ठवाडी इथला ३२ वर्षीय तरूण ज्ञानेश्वर वाघमोडे हा सोमवारी शेतात जनावरे चारण्यासाठी गेला असता, नदीच्या पुरात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह काल सापडला.

जिल्ह्यात काल माळाकोळी, चांडाळा, खानापूर, मुखेड, कुरूळा, लोहा आणि जांब या सात महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या भागातील नदी नाल्यांना पूर आल्यानं, पिकांचं मोठं नुकसान झालं.

दरम्यान, काल नांदेड शहरालगतच्या डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून ९४२ घनमीटर प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्यात पहाटे सुरू झालेला मुसळधार पाऊस सकाळी दहावाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतरही दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या औट्रम घाटात तेरा ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यानं धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. घाटातील दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. घाटात अडकलेली सुमारे ८० वाहनं काल सायंकाळपर्यंत बाहेर काढण्यात आली. संपूर्ण घाटरस्ता सुरळीत करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. कन्नड तालुक्यातल्या शिवना, गडदगड, गांधारी या नद्यांना पूर आला आहे.

 

जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल पहाटे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही भागातल्या नदी नाल्यांना मोठा पूर आला. आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी मंडळात १२१ पूर्णांक तीन दशांश मिलीमीटर पाऊस झाला, त्यामुळे या भागातलं उसाचं पीक आडवं झालं. कपाशी, मक्याचं पीकही पाण्याखाली गेलं आहे. भोकरदन तालुक्यातही नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे जैनपूर, कोठारा इथल्या शनिमंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. घनसावंगी तालुक्यातल्या मंगरुळ इथला पाझर तलाव फुटल्यानं तलावातलं पाणी परिसरातल्या उसासह अन्य पिकांमध्ये शिरलं, त्यामुळे सुमारे ३०० एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातल्या मंठा, परतूर, अंबड, जालना तालुक्यांतही दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस झाला.

****

परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातल्या हदगाव, कासापुरी मंडळात काल पहाटे तीन ते सकाळी नऊ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. हदगाव मंडळात १३० पूर्णांक आठ मिलीमीटर, तर कासापुरी मंडळात, १०६ पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस झाल्यानं शेतातील खरीपाची पिकं पाण्याखाली गेली, तर हदगाव बुद्रुक मध्ये घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं.

पाथरी तालुक्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी गावनिहाय पंचनामे करून कार्यालयास सादर करण्याचे निर्देश तहसीलदारांनी बजावले आहेत.

****

बीड जिल्ह्यात सोमवारी रात्रभर पाऊस सुरु होता. त्यामुळे जिल्ह्यातले नदी, नाले, ओढे, लघू-मध्यम प्रकल्प हे दुथडी भरून वाहत आहेत. परळी, बीड, गेवराई आणि माजलगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. जिल्ह्यातल्या मुरंबी तलावात मासे पकडण्यासाठी गेलेले जळगाव इथले तीन तरुण पाण्यात वाहून गेले. त्यापैकी दोघांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं असून, एक जण बेपत्ता आहे.

****

जळगाव जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला. चाळीसगाव मधल्या डोंगरी नदीसह अनेक नद्यांना पूर आला असून, तालुक्यातल्या ३३ गावांना या पुराचा फटका बसला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकण विभागात काल जोरदार पाऊस झाला.

****

हवामान

बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात लक्षणीय बदल झाला आहे. त्यामुळे आजही मुंबईसह राज्यातल्या अनेक भागात मान्सूनचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभगानं सांगितलं. आज संपूर्ण कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित राज्याला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

****

राज्य सरकार कोणत्याही सणांविरूद्ध नाही तर कोरोना विषाणूच्या विरोधात असल्याचं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. काल ठाणे इथं एका प्राणवायू प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोविडच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत, त्याचं पालन करावंच लागेल, असं त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारनं देखील सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली असून, राज्य सरकारला काळजी घेण्यास सांगितलं आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं.

****

राज्यात काल चार हजार १९६ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ६४ हजार ८७६ झाली आहे. काल १०४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३७ हजार ३१३ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल चार हजार ६८८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख ७१ हजार ८०० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक शून्य तीन शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५१ हजार ८३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल २०० नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात ९४ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ४९, औरंगाबाद ३२, लातूर १८, परभणी तीन, नांदेड दोन, तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे शिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी यांचं आज पहाटे दिड वाजता निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. १९९९, २००४ आणि २००९ असे तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यापूर्वी त्यांनी वैजापूर नगरपालिकेचे दोन वेळा नगराध्यक्षपद भूषवले होते. सुरूवातीला काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून जवळपास ५० वर्ष ते राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता वैजापूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

****

औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सवात “ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा” आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये रांगोळी, निबंध आणि सेल्फी विथ ट्री, चित्रकला, एकपात्री नाटक, उत्कृष्ट सामाजिक संदेश देणारे गणपती सजावट देखावा, अशा श्रेणींमध्ये ऑनलाईन जिल्हास्तरीय स्पर्धेत, नागरिकांना सहभाग नोंदवता येणार आहे. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर याद्वारे घरीच राहुन स्वत:तील असलेल्या कलागुणांना वाव देवुन, सार्वजनिक स्तरावर नागरिकांना कलागुणांची प्रभावी मांडणी करता येणार असल्याचं, जिल्हा पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी म्हटलं आहे.

****

टोकियो पॅरालिम्पिक मध्ये काल उंच उडी स्पर्धेत भारताच्या मरिअप्पन थंगावेलू यानं रौप्य पदक जिंकलं, तर शरतकुमार यानं याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. त्यापूर्वी काल सकाळी नेमबाजीत भारताच्या सिंघराज अधाना याने पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत नऊ पदकं जिंकली आहेत. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पदकविजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. मरियप्पननं सलग दुसऱ्या पॅराऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून अनेक अर्थांनी इतिहास रचला आहे, अशा शब्दांत अनुराग ठाकूर यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.

****

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली नव्हती. या निर्णयाच्या निषेधार्थ काल मुंबईत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात दादर इथं आणि मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली. निर्बंधांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधे सहा गुन्हे दाखल झाले आहेत.

****

No comments: