Tuesday, 21 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.09.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 September 2021

Time 1.00 to 1.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत मुंबई इथं आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय 'वाणिज्य उत्सव' परिषदेचं उद्घाटन, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज झालं. उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यावेळी उपस्थित होत्या. स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये राज्यातली निर्यात संधी, पायाभूत सुविधा, बॅंकींग आणि वित्तीय सहकार्य याशिवाय विविध विषयावर चर्चासत्रे घेण्यात येणार आहे.

****

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ८१ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल ९६ लाख ४६ हजार ७७८ नागरीकांना लस देण्यात आली. देशात आतापर्यंत या लसीच्या ८१ कोटी ८५ लाख १३ हजार ८२७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या २६ हजार ११५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २५२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ३५ लाख चार हजार ५३४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ४५ हजार ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ३४ हजार ४६९ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी २७ लाख ४९ हजार ५७४ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या तीन लाख नऊ हजार ५७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

त्र्यंबकेश्वर सारख्या तीर्थस्थळांच्या ठिकाणी नदीमध्ये सांडपाणी सोडलं जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादानं, महाराष्ट्र सरकारला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड नाशिकच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जमा करण्यासही राज्य सरकारला सांगितलं आहे. या दंडाच्या पैशांचा वापर त्र्यंबकेश्वर इथं नदीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी केला जाणार आहे. गोदावरी नदीला येऊन मिळणाऱ्या त्र्यंबकेश्वर नदीमध्ये सांडपाणी सोडणं बंद करण्यात त्र्यंबकेश्वर नगर पालिकेला अपयश आलं असल्याचं, राष्ट्रीय हरित लवादानं १६ सप्टेंबरला नमूद केलं होतं.

****

जालना जिल्ह्यात अधिकाधिक कोविड लसीकरण व्हावं या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या मिशन कवचकुंडल अभियानास गती देण्याचे निर्देश, आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल आढावा बैठकीत ते बोलत होते. मिशन कवचकुंडल अभियानात जिल्ह्यात दरदिवशी २५ हजार, याप्रमाणे चार दिवसांमध्ये एक लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं असून, लसीकरणाचा वेग असाच कायम ठेवण्यासाठी, गाव पातळीवर अधिकाधिक जनजागृती करण्याच्या सूचना, टोपे यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात आतापर्यंत नऊ लाख ७० हजार ८५१ नागरिकांनी कोविड लस घेतली असून, ४२ टक्के नागरिकांच लसीकरण पूर्ण झालं आहे.

****

राष्ट्रीय महिला आयोगानं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी क्षमता बांधणी आणि व्यक्तिमत्त्व विकसनाचा देशव्यापी कार्यक्रम सुरु केला आहे. आयोगातर्फे केंद्रीय आणि राज्यस्तरीय विद्यापीठांशी याबाबत सहकार्य करार करण्यात येणार असून, रोजगाराभिमुखता वाढविण्यासाठी तर्कशुद्ध, सहज स्वाभाविक तारतम्य वाढवणारा, संवाद कौशल्य आणि परस्पर संबंध दृढ करणारा असा हा अभ्यासक्रम असणार आहे.

****

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या अंकुशनगर इथल्या अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं दिला जाणारा सर्वाधिक उस उत्पादक गौरव पुरस्कार, अंबड तालुक्यातल्या कोठाळा इथले शेतकरी मुरलीधर उगले यांना, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. उगले यांनी गळीत हंगामात शुन्य पूर्णांक ४० हेक्टर आर क्षेत्रामध्ये उसाचं सर्वाधिक ८५ पूर्णांक ८९२ मेट्रीक टन उत्पादन घेतल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८१ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम इथल्या महात्मा गांधी आयुविज्ञान संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर, आंध्रप्रदेशमध्ये वैद्यकीय महाविद्यालय साकारलं जाणार आहे. या निमित्तानं आंध्रप्रदेशातल्या पुट्टापार्थी इथल्या सत्यसाई सेवा समितीच्या अधिकारी आणि पदाधिकार्यांनी महात्मा गांधी आयुविज्ञान संस्थेला भेट देवून वैद्यकीय महाविद्यालयासह कस्तुरबा रुग्णालयाची पाहणी केली.

****

पोषण माह अंतर्गत वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी कार्यकर्त्या घरोघरी भेट देऊन लहान मुलं, गरोदर आणि स्तनदा मातांना पोषणासंबंधी माहिती देत आहेत. राज्यातही पोषण माह निमित्त विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.

****

No comments: