Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 October 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ ऑक्टोबर
२०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात
१०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दिष्टपूर्ती करण्यामध्ये
योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना 'आकाशवाणीचा सलाम'. कोरोना विषाणू संसर्गाचा
धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर
घ्याच, आणि इतरांनाही लस घेण्यासाठी
मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या.
मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात आणि चेहरा वारंवार
स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६
१२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशात आतापर्यंत ९७ कोटी २३ लाखांहून अधिक नागरिकांचं कोविड लसीकरण
** औरंगाबाद इथल्या एमजीएम संस्थेकडून कृषीतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे आणि चित्रकार मुरली लाहोटी यांना महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
** लातूर इथं घरगुती वापराच्या
गॅसचं वितरण करणाऱ्या पाईपलाईन प्रकल्पाचं भूमिपूजन
आणि
** भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक
म्हणून माजी कर्णधार राहुल द्रविड यांची नियुक्ती
****
देशव्यापी कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत लसीच्या ९७
कोटी २३ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरणाच्या काल २७३ व्या दिवशी
देशात सुमारे आठ लाख ३६ हजार मात्रा देण्यात आल्या, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. केंद्रानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक
लसीच्या १०१ कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध करुन दिल्या
आहेत. राज्यांजवळ सध्या ११ कोटी १२ लाखहून अधिक लसी पोहचवण्यात आल्या असून,
सरकार पूर्ण देशभरात लसीकरण अभियान वेगानं राबवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
दरम्यान, कोविड प्रतिबंधात्मक
लसीकरणाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेलं गीत आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि
पेट्रोलिअम मंत्री हरदीप सिंह यांनी आज प्रसिद्ध केलं. प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास
खेर यांनी गीत गायलं आहे. हे फक्त शासकीय अभियान नसून एक जन-आंदोलन असल्याचं पुरी यांनी
यावेळी नमूद केलं.
****
राज्यात नेहरु युवा केंद्र संघटनेतर्फे मोठ्या प्रमाणात स्वच्छ
भारत अभियान चालवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत या महिन्याच्या अखेरपर्यंत पाच लाख
१७ हजार किलोहून अधिक कचरा एकत्र केला जाणार आहे. गेल्या १ तारखेपासून सुरु झालेल्या
या अभियानात महाराष्ट्र आणि गोव्यातल्या ३७ जिल्ह्यांमधले नागरिक सहभागी झाले आहेत.
अभियाना अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या तीन जणांची निवड
केली जाणार आहे. निवड झालेल्यांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतपधान आणि ऑलिम्पिक
खेळाडूंना भेटण्याची संधी दिली जाणार आहे.
****
माजी पंतप्रधान मनमोहन
सिंग यांना डेंग्यूची लागण झाल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्सकडून सांगण्यात
आलं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सिंग यांना गेल्या तीन दिवसांपासून एम्समध्ये दाखल
करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २४ ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८२ वा
भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार 'एक आठ शून्य शून्य
एक एक सात आठ शून्य शून्य' या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नमो
ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
देशाला उद्योजकांची मोठ्या
प्रमाणात गरज असतांना, आपल्याकडे मात्र उद्योजक तयार करणारी महाविद्यालयं नाहीत, अशी खंत केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. नागपूरच्या वनराई
फाउंडेशनच्यावतीने कमानी ट्यूब्जच्या अध्यक्ष पद्मश्री कल्पना सरोज यांना
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी गडकरी बोलत होते. पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं
स्वरुप आहे.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा
गांधी मिशन संस्थेने महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कारांची घोषणा केली आहे. कृषी आणि जलसंधारणाच्या बाबतीत भरीव योगदान देणारे विजयअण्णा बोराडे
आणि जगविख्यात चित्रकार मुरली लाहोटी यांची या पुरस्कारांसाठी निवड
करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह आणि ५०
हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. महात्मा गांधी मराठवाडा भूषण समितीचे अध्यक्ष प्रताप बोराडे
यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक आणि सामाजिक
क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मूळच्या मराठवाड्यातल्या दोन व्यक्तींना दरवर्षी
हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं बोराडे यांनी सांगितलं. ज्येष्ठ
समाजसेवक गिरीष गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत परवा सकाळी
११ वाजता संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
****
पाईपलाईन द्वारे गॅस मिळण्याच्या व्यवस्थेमुळे लातूर शहरातल्या
उद्योगांना चालना मिळेल, असा विश्वास, जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त
केला आहे. ते आज लातूर महानगरपालिके अंतर्गत अशोक गॅस एजन्सीच्या सीएनजी पाईपलाईनचं
भूमिपूजन झाल्यानंतर बोलत होते. पाईपलाईनद्वारे घरगुती गॅसची सुविधा असलेलं लातूर हे
मराठवाड्यातलं पहिलं शहर ठरणार असल्याबद्दल देशमुख यांनी महापालिकेचं अभिनंदन केलं.
औसा तालुक्यात इंधनावर आधारीत नवीन औद्योगिक वसाहत स्थापण्याचा प्रयत्न केला जाणार
असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
****
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून माजी
कर्णधार राहुल द्रविड यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयनं नियुक्ती केली आहे.
सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-२० जागतिक चषक स्पर्धेनंतर संपणार
आहे. त्यानंतर द्रविड पदभार स्विकारणार आहेत. याशिवाय पारस म्हांब्रे यांची गोलंदाजी
प्रशिक्षक म्हणून तर विक्रम राठोड यांची संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून निवड
मंडळानं कायम ठेवली आहे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या बदलीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे.
****
धुळे शहरातील तब्बल १५० हून अधिक वर्षांची
परंपरा असलेला भगवान बालाजींचा रथोत्सव आज भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी एकादशीला हा
रथोत्सव साजरा केला जातो. कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर यंदाही रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. परंपरा म्हणून, मंदिरापासून फक्त पाच पावले ओढून रथोत्सव साजरा झाला.
****
ओडिशाच्या किनाऱ्याकडून आलेल्या वाऱ्यांमुळे आणखी तीन दिवस विदर्भात अनेक ठिकाणी
पावसाची शक्यता तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक
सरींचा अंदाज हवामान
विभागानं वर्तवला आहे.
//********//
No comments:
Post a Comment