Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 06 October 2021
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ ऑक्टोबर २०२१
सायंकाळी ६.१०
****
गणेशोत्सव साजरा करताना
आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी
करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या
तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,
पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ
धुवा. तरीही कोविड-१९ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे
इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि
मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२
७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** रेल्वेच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर
** वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचं सक्षमीकरण करण्याचा
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
** राज्यातल्या सहा जिल्हा
परिषदा आणि ३८ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर
आणि
** परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
निर्बंध लागू
****
केंद्र सरकाने रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही
माहिती दिली. सुरक्षा दलातले कर्मचारी वगळता, अराजपत्रित कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा
बोनस दिला जाणार आहे. रेल्वेच्या सुमारे ११ लाख ५६ हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा
लाभ होणार आहे.
देशभरात सात मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं
आज मंजुरी दिली. वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत अधिक माहिती देताना,
पीएम मित्रा योजनेअंतर्गत या टेक्सटाईल पार्कच्या उभारणीसाठी आगामी पाच वर्षांत चार
हजार ४४५ कोटी रुपये खर्च येणार असल्याचं सांगितलं.
****
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचं सक्षमीकरण करण्याचा
निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. संचालनालयाच्या स्तरावर ३३ पदं तसंच क्षेत्रीय
स्तरावर दोन प्रादेशिक कार्यालयं सुरु करण्यासाठी २८ नवीन पदांची निर्मिती करण्याला
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक तसंच शिक्षक समकक्ष संवर्गांना
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतन देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी
दिली.
किमान आधारभूत किंमत योजनेत २०२०-२१ मधील खरीप तसंच रब्बी पणन
हंगामात तांदूळासाठी वाहतूक खर्च देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात
आला.
****
राज्यात धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषद आणि ३८ पंचायत
समित्यांमधल्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी, काल झालेल्या मतदानाची आज मोजणी होऊन काही जागांचे निकाल संध्याकाळपर्यंत
जाहीर झाले. अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या सर्व १४ जागांचे निकाल हाती आले आहेत.
जिल्ह्यात वंचित आघाडीची सत्ता अबाधित असून राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर आणि
भाजपला एकाच जागेवर समाधान मानावं लागलं, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले.
धुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत १५ पैकी ८ जागांवर भाजपची
सरशी झाली, राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागांवर विजय मिळाला तर काँग्रेस आणि शिवसेनेला
प्रत्येकी २ जागांवर विजय मिळाला आहे.
नंदूरबारमधल्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत ११ पैकी ४ जागा भाजपला,
३ शिवसेना, ३ काँग्रेस तर १ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आहे. तर नंदुरबार
पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप ४, शिवसेना ५, काँग्रेस ३, तर राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षानं एक जागा मिळवली आहे.
पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत जवळपास
सर्वच पक्षांना आपल्या जागा पुन्हा मिळवण्यात यश आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि
शिवसेनेचे प्रत्येकी ५ उमेदवार निवडून आले आहेत. भाजपचे ४ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट
पक्षाचा १ उमेदवार निवडून आला. तर कॉग्रेस
आणि बहुजन विकास आघाडीला खातंही उघडता आलेलं नाही. पंचायत समितीत ही शिवसेनेनं बाजी
मारली असून त्यांचे ५ उमेदवार निवडून आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसला २, भाजपला ३,
मनसेला १ आणि बहुजन विकास आघाडीला ३ जागा मिळवण्यात यश आलं आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ पैकी ९ जागा सत्ताधारी कॉंग्रेस
पक्षाने जिंकत नागपूर ग्रामीणमध्ये आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. भाजपनं ३, राष्ट्रवादी
कॉंग्रेस २, शेतकरी कामगार पक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पक्षानं प्रत्येकी १ जागा जिंकली
आहे. नागपूर जिल्ह्यातील ३१ पंचायत समितीच्या गणांपैकी काँग्रेसने २१, भाजप ६, राष्ट्रवादी
काँग्रेस २, तर बहुजन समाज पक्ष आणि गोंडवाना गणतंत्र पक्षानं प्रत्येकी १ जागा जिंकली आहे.
वाशिम जिल्ह्यात सर्व १४ जागाचे निकाल हाती आले. त्यात राष्ट्रवादी
काँग्रेसनं ५, काँग्रेस, भाजपा, आणि वंचित आघाडी प्रत्येकी २, तर शिवसेना आणि जनविकास
आघाडी यांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
****
औरंगाबाद शहरासह परिसरात आज दुपारी ३ वाजेनंतर विजांचा कडकडाट
आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. जिल्हा न्यायालयाच्या आवारातल्या वाहनतळातली
झाडं उन्मळून पडल्यानं, काही चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचं नुकसान झालं. औरंगाबाद
- पुणे महामार्गावरही झाडं उन्मळून पडली.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज दुपारी मेघ गर्जनेसह
जोरदार पाऊस सुरु झाला.
****
कोविडमुळे बंद असलेली धार्मिक स्थळे उद्यापासून खुली करण्यात
येणार आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरातील धार्मिक स्थळांमध्ये आज साफसफाई करण्यात आली.
उद्यापासून नवरात्र उत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे शहरातल्या कर्णपूरा, हरसिद्धी मातामंदिरासह
देवींच्या मंदीरात सजावट करण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असल्यानं
तालुक्यात सर्व धार्मिक स्थळं, शाळा, आठवडी बाजार, अशा गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावण्यात
आले आहेत. यादरम्यान प्रशासनानं सर्वतोपरी खबरदारी घ्यायची असून नागरिकांनी कोरोना
प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी
आज पत्रकार परिषदेत केलं आहे. पुढील दहा दिवस तालुक्यात सर्वांनी खबरदारी घ्यावी. मास्क
घालणे, RTPCR चाचणी आणि जास्तीत जास्त नागरिकांचे
लसीकरण होणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी गोयल यांनी म्हटलं आहे.
****
गोंदिया जिल्ह्यात नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या स्फोटकाचा मोठा
साठा पोलिसांनी हस्तगत केला. गडचिरोली आणि गोंदियाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील
यांच्या मार्गदर्शनात आज ही मोहीम राबवण्यात आली. अंदाजे ६७ डेटोनेटर, २३ जिलेटीन रॉड
आणि वायरसह अन्य विस्फोटक साहित्य पोलीसांनी हस्तगत केलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ नजीक पारस
फाट्याजवळ आज खामगाव- अकोला रस्त्यावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस आणि ट्रकचा
अपघात झाला. या अपघातात बसला मोठी आग लागली. त्यामुळे बसमधले १७ प्रवासी गंभीर जखमी
झाले आहेत.
//********//
No comments:
Post a Comment