Tuesday, 5 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०५ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात आज धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर आणि पालघर जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये शांततेत मतदान सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. या सर्व ठिकाणी उद्या मतमोजणी होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यासंदर्भातलं पत्रक पक्षानं आज जारी केलं.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ९१ कोटीचा टप्पा ओलांडला आहे. कोविड विरोधी लढ्यातली ही आणखी एक महत्त्वाची कामगिरी असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. लसीकरण मोहिमेतल्या देशाच्या कामगिरीबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी समाधान व्यक्त केलं असून, मजबूत राष्ट्र, गतीमान लसीकरण, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

****

२०२१ वर्षाचा औषधविज्ञानातला नोबेल पुरस्कार अमेरिकेचे वैज्ञानिक डेविड ज्युलिअस आणि आर्डेम पाटापौटियन याना विभागून जाहीर झाला आहे. मानवी शरीरातल्या चेतासंस्थेला जाणवणाऱ्या स्पर्शाचं रूपांतर विद्युत प्रवाहात कस होत, ते त्यांनी शोधून काढलं आहे. या संशोधनामुळे मानवी शरीराच्या वेदना कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

****

रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना न्यायालयानं सात ऑक्टोबरपर्यंत अंमली पदार्थ विरोधी पथकाची कोठडी सुनावली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजावर रेव्ह पार्टीत सहभागी होऊन अंमली पदार्थांचा वापर केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. एनसीबीनं आर्यन खानसह सर्वांची ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून केल्या जाणाऱ्या पाणी विसर्गात वाढ करण्यात आली आहे. सध्या धरणाचे अठरा दरवाजे एका फुटानं उघडून सुमारे १८ हजार ८६४ घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 11.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 11 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...