Monday, 18 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.10.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 October 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

देशात १०० कोटी कोविड प्रतिबंधक लस देण्याचं उद्दीष्ट लवकरच पूर्ण होत आहे. ही उद्दीष्टपूर्ती करण्यामध्ये योगदान देणारे डॉक्टर, परिचारिका आणि इतरांना आकाशवाणीचा सलाम. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्यापही कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळेवर घ्याच,णि इतरांनाही लस घेण्यासाठी मदत करा. आगामी सणासुदीच्या काळात काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट

·      ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

·      राज्यात नवे एक हजार ७१५ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात पाच जणांचा मृत्यू तर नव्या ४० रुग्णांची नोंद

·      आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र निवडताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आल्याचा आरोग्य सेवा संचालकांचा निर्वाळा

·      हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणां कालानुरूप बदल आवश्यक - हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे

·      माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेस प्रवेशाची घोषणा

आणि

·      टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ; आज भारत विरुद्ध इंग्लंड सराव सामना

****

कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं निदर्शनास आलं आहे. कोविड-१९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण करणारी वैद्यकीय यंत्रणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यान्वित आहे. या यंत्रणेनं आजवर दोन तुकड्यांमध्ये चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. तिसऱ्या तुकडीमध्ये एकूण ३४३ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यात ‘डेल्टा व्हेरिअंटचे ५४ टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्हचे ३४ टक्के तर इतर प्रकारांचे १२ टक्के रुग्ण आढळले आहेत. कोविड लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोविड लस घेणं तसंच कोविड प्रतिबंधक निर्देशांचे कठोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा सण उद्या साजरा होणार आहे. यासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ईद ए मिलाद शक्यतो घरातच राहून साजरी करावी, मात्र पोलीस प्रशासनाच्या पूर्व परवानगीनं एका मिरवणुकीत जास्तीत जास्त पाच ट्रक, आणि एका ट्रकावर जास्तीत जास्त पाच लोकांच्या सहभागात मिरवणूक काढता येईल, असं सरकारनं कळवलं आहे. मिरवणुकीत मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचं, तसंच ध्वनी प्रदूषण नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. धार्मिक मार्गदर्शनाचे कार्यक्रम शक्यतो ऑनलाईन आयोजित करावेत, पाणपोईसाठी पूर्वपरवानगी आवश्यक असून, तिथं पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी उपस्थितीत राहू नये, पाण्याच्या सीलबंद बाटल्यांच वाटप करावं, स्वच्छता राखावी, असं याबाबत काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहतील. त्यात शिथिलता दिली जाणार नाही. कोविड परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरं, आरोग्य शिबिरं असे उपक्रम राबवावेत, या उपक्रमांमधे स्वच्छेतेबाबत जनजागृती करावी, असंही याबाबत जारी मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.

****

राज्यात काल एक हजार ७१५ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ९१ हजार, ६९७ झाली आहे. काल २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ७८९ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल दोन हजार ६८० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६ लाख १९ हजार ६७८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २८ हजार ६३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ४० नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन, तर औरंगाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ, बीड आठ, उस्मानाबाद सात, नांदेड पाच, लातूर आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी चार, परभणी दोन, तर हिंगोली जिल्ह्यात एका रुग्ण आढळला.

****

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट 'क' संवर्गातल्या पदभरतीसाठी, उमेदवारांना परीक्षा केंद्र देताना, प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला असल्याचा निर्वाळा, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दिला आहे. उमेदवारानं अर्ज केलेलं पद ज्या नियुक्ती अधिकाऱ्यांच्या अंतर्गत येतं, त्याच विभागातल्या जिल्ह्यात उमेदवारांना परीक्षा केंद्र दिलं गेलं आहे, असं स्पष्टीकरणही त्यांनी या संदर्भातल्या तक्रारींवरून केलं आहे. गट `क` संवर्गातल्या पदभरतीसाठी २४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा होणार असून, सकाळच्या सत्रातल्या परीक्षेसाठीचं केंद्र एका जिल्ह्यात तर दुपारच्या सत्रातल्या परीक्षेसाठीचं केंद्र वेगळ्या जिल्ह्यात दिल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. या संदर्भात भाजपनं आरोग्य विभागाच्या कामकाजावर टीका केली आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेनामी मालमत्तेत, त्यांच्या बहिणी आणि मेव्हण्यांचा हिस्सा असल्याचा आरोप, माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात कागदोपत्री पुरावे आपण सक्तवसुली संचालनालय, उच्च न्यायालय आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडे देणार असल्याचंही, सोमय्या यांनी सांगितलं.

****

भारतीय जनता पक्षाने धाडी घालण्याची नवी संस्कृती सुरू केल्याचा आरोप, माजी खासदार विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पुरावे असतील तर भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई जरूर व्हावी, परंतू, आज छापे घालून खळबळ निर्माण केली जाते. अशा छाप्यांमुळे एखाद्याचं राजकीय जीवन उद्धस्त होऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करावी, असं आंबेडकर यांनी नमूद केलं.

****

हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांमध्ये कालानुरूप बदल करणं आवश्यक असल्याचं मत, प्रसिद्ध हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं काल प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेत ‘बदलत्या हवामानाचे आव्हान’ या विषयावर ते बोलत होते. हजारो वर्षांपासून पृथ्वीवर सूर्यामुळे आणि सूर्यावरील सौर डागांमुळे हवामानामध्ये थंड, गरम किंवा अति पर्जन्य वृष्टी असे बदल वेळोवेळी होत असतात. या बदलामुळे मानवी जीवनावर आणि शेतीवर तथा शहरीकरणावर परिणाम होणार आहेत. अशा होणाऱ्या परिणामांचा वेळेआधीच अभ्यास करून समाजाला अगोदरच सुचित करता येतं, त्यासाठी हवामान अभ्यास चळवळ उभारावी लागेल, असं ते म्हणाले.

****

नांदेड जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी काल पक्षाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेशाची घोषणा केली. खतगावकर हे तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार आणि राज्य सरकारमध्ये मंत्री देखील राहिले आहेत. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, यांच्यासह भारतीय जनता पक्षातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही, काल भाजप सदस्यत्वाचा राजीनाम दिला. खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेचं नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वागत केलं. यामुळे नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाडयातल्या पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

****

विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं १५ वं विद्रोही साहित्य संमेलन, पुढच्या महिन्यात नाशिक इथं भरवण्यात येणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या नाशिक इथं झालेल्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. यापूर्वी मार्च महिन्यात नियोजित हे संमेलन कोविडचा वाढता संसर्ग पाहता पुढे ढकलण्यात आलं होतं.

****

एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन आणि एज्युकेशनल अकादमीद्वारे, औरंगाबाद शहरात आढळणाऱ्या पक्ष्यांच्या नोंदी घेऊन त्यांची माहिती संकलित करण्यासाठी, "अंगणातील पक्षी", हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या घराच्या खिडकीतून, अंगणात दिसणाऱ्या पक्ष्यांच्या नोंदी घ्यायच्या आहेत. हा उपक्रम सर्वांसाठी खुला असून, त्यासाठी erfea2007@gmail.com या संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक आहे. पक्षी कसे ओळखायचे, आणि त्यांच्या नोंदी कशा घ्यायच्या, याचं प्रशिक्षण दिलं जाणार असून, हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात समाजातल्या सर्व घटकांचा सहभाग असायला हवा, आणि ही जनतेची चळवळ व्हायला हवी, असं मत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. नागपूरातल्या स्थानिक संविधान चौकात काल, संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाचं लोकार्पण, गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. देशाचा जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांना कळावा यासाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहननी त्यांनी केलं. यावेळी सामुहिक ध्वज गीत गायनाचाही कार्यक्रम झाला.

****

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला कालपासून ओमान इथं पात्रता फेरीच्या सामन्यांनी सुरुवात झाली. काल झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान ओमानच्या संघानं पापुआ न्यू गयानाचा १० गडी आणि सहा षटकं दोन चेंडू राखून पराभव केला. दुसर्या सामन्यात स्कॉटलँडने बांग्लादेशचा सहा धावांनी पराभव केला. या पात्रता फेरीतून चार संघ गट साखळी फेरीत दाखल होतील.

गट साखळी फेरीच्या सामन्यांना सुरुवात होण्याआधी भारताचा संघ आज इंग्लंड विरोधात, तर २० ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरोधात सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर गट साखळी फेरीत २४ ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत भारताचा सलामीचा सामना होईल. या विश्वचषकाचे सामने ओमानसह दुबई, शारजा आणि अबुधाबी इथं होणार आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव आटोक्यात आला असताना पर्यटनस्थळं सुरू करण्यास राज्य शासनानं परवानगी दिली आहे. पर्यटकांसाठी राज्य पर्यटन विकास महामंडळानं त्यांच्या निवासस्थानांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या असल्याची माहिती, महामंडळाचे विभागीय प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

****

औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या औसा ते तुळजापूर शेतकरी पदयात्रेचं, तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यात स्वागत केलं. भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यावेळी उपस्थित होते. सरकारने शेतकऱ्यांना तोकडी मदत जाहीर करून एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे, अशी टीका आमदार पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे आघाडी सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी, १६ ऑक्टोबर रोजी औसा इथून सुरू झालेली ही पदयात्रा, आज तुळजापूर इथं दाखल होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या सात महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. हदगाव तालुक्यात कापुस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कयाधू नदीला पुर आला. या पुराच्या पाण्यात एका ठिकाणी शेतात बांधून ठेवलेलं सोयाबीन वाहून गेल्याचं वृत्त आहे. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरगाव इथं मासेमारी करायला नदीत उतरलेला एक इसम पुराच्या पाण्यात सुमारे पाच किलोमीटर वाहून गेला, मात्र शेवाळा गावाजवळ काही तरुणांनी त्याला वाचवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या निम्न दूधना सिंचन प्रकल्पाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे या जलाशयाची सहा दारंघडून दुधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

****

मराठवाड्यासह यवतमाळ जिल्ह्यां सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ईसापूर धरण पूर्ण भरलं आहे. धरणाचे १५ पैकी १३ दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून सुमारे ६२९ घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद, उमरखेड, महागाव, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, आणि नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव, हिमायतनगर, माहूर, तसंच किनवट या तालुक्यातल्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 May-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...