Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 December 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १ डिसेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
केंद्र आणि राज्य सरकारनं घरोघरी जाऊन
कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेत आपण
सर्वांनी सहभागी होऊन लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्याव्यात, तसंच ज्यांनी
अद्याप लस घेतली नाही. त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करावं, कोरोना विषाणू
संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही, हे विसरू नका. आपली आणि आसपासच्या सर्वांची
काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा.
कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या
राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
· तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यान मृत शेतकऱ्यांच्या
कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत दिली जाणार नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री
नरेंद्र सिंह तोमर यांचं स्पष्टीकरण.
· संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ, राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित तर
लोकसभेत सध्या सहायक पुर्नप्रजनन तंत्रज्ञान नियमन विधेयकावर चर्चा सुरु
· ओमायक्रॉन विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १५ डिसेंबरपासून नियमित
आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर.
· २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सक्षम पर्याय उपलब्ध करून
देण्यावर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा.
आणि
· मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं विशेष पॅकेज
देण्याची औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची लोकसभेत मागणी.
****
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणलेल्या
तीन कृषी कायद्यांच्या विरोधात वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक
शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या मृतकांच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत दिली
जाणार नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज संसदेत स्पष्ट
केलं. या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होत
आहे, या पार्श्वभूमीवर लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी
हे स्पष्टीकरण दिलं आहे. तब्बल वर्षभर चाललेल्या या आंदोलना दरम्यान, किती
शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, याची कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही, त्यामुळे भरपाई
देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, शेतकरी आंदोलनाचं नेतृत्त्व
करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने ७०० हून अधिक शेतकऱ्यांनी या आंदोलनात जीव
गमावल्याचा दावा केला आहे.
****
शेतकरी आंदोलनामुळं या वर्षी रेल्वेला ३६
कोटी ८७ लाख रूपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
यांनी सांगितलं. ते आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देतांना बोलत होते.
आंदोलनामुळं रेल्वेच्या पंधरा विभागात एक हजार ८७९ रेल्वे स्थगित झाल्यामुळं हे नुकसान
झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज दोन्ही
सभागृहात विरोधकांनी विविध मुद्यांवर गदारोळ केला. दोन्ही सभागृहांमधे आजही,
राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी लावून
धरली. सभागृहात झालेल्या गदारोळामुळं राज्यसभेचं कामकाज तीनवेळा आणि त्यानंतर
दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. तर, लोकसभेचं कामकाज एकदा तहकूब करावं लागलं.
त्यानंतर लोकसभेत सहायक पुर्नप्रजनन
तंत्रज्ञान नियमन विधेयक २०२० वर चर्चा झाली. सध्या ही चर्चा सुरु आहे.
राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर
उपाध्यक्ष हरिवंश यांनी प्रश्नोत्तराचा तास होऊ देण्याचं आवाहन केलं. मात्र
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांचा गोंधळ सुरूच होता.
त्यामुळे कामकाज सुरुवातीला १२ आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
दोन वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर धरण सुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. ते मंजूर
झाल्यानंतर कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी तीन नंतर कामकाज
पुन्हा सुरू झाल्यानंतर केंद्रीय जल मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी धरण
विधेयकावर चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही विरोधकांनी
खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा लावून धरला. सदस्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली.
परिणामी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं.
****
ओमायक्रॉन या कोविड विषाणुच्या नव्या
प्रकाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता १५ डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमान
सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. हवाई वाहतूक
महासंचालनालयानं याबाबतचा एक आदेश आज जारी केला. नवीन तारीख यथावकाश जाहीर केली
जाईल, असं महासंचालनालयानं स्पष्ट केलं आहे.
गेल्या २६ नोव्हेंबर रोजी महासंचालनालयानं
१४ देश वगळून इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची घोषणा
केली होती. मात्र त्यानंतर ओमायक्रॉन विषाणुचा जगातील काही देशात होत असलेला
प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
****
राज्यात टाळेबंदी लावली जाणार नाही, असं
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटल आहे, ते आज जालना इथं बोलत होते. राज्यात
कोविड प्रतिबंधक लसीकरण वेगानं सुरू असून कोविडच्या पहिल्या मात्रेचं ८२ टक्के
तर दुसऱ्या मात्रेचं ४४ टक्के लसीकरण झालं
असल्याचं त्यांनी सांगितलं. साडेसात कोटी लोकांना पहिली मात्रा तर साडेचार कोटी
लोकांना दुसरी मात्रा देण्यात आली असल्याचं सांगून राज्यांतर्गत विमान प्रवास
करणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नसल्याचं ते म्हणाले. मात्र कोविड
जोखीम असलेल्या देशांतून आलेल्यांना RTPCR चाचणी बंधनकारक राहील तसंच त्यांना ७
दिवस विलगीकरणात राहणं बंधंनकारक राहील असं त्यांनी सांगितलं
****
मुंबईच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर
असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये
भारतीय जनता पक्षाला सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी समविचारी पक्षांनी
राष्ट्रीय स्तरावर एकत्रित येण्यासह अन्य काही मुद्यांवर त्यांच्यात चर्चा
झाल्याचं पवार यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना सांगितलं. चर्चा सकारात्मक
झाल्याचं पवार म्हणाले. भाजपाविरोधी असलेल्या कुणालाही एकत्र यायचं असेल, तर
त्यांचं स्वागत आहे. नेतृत्व हा महत्त्वाचा मुद्दा नसल्याचं पवार म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या
कारणामुळे बॅनर्जी यांना भेटू शकले नाहीत. मात्र, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि
आदित्य ठाकरे यांनी काल त्यांची भेट घेऊन चर्चा केली.
****
राज्यात बहुतांश भागातल्या प्राथमिक शाळा
आजपासून सुरु झाल्या. सोलापूर जिल्ह्यात आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत
सोडण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विद्यार्थी, पालक आणि
शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळी आणि
फुलाच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
बीड जिल्ह्यातही जिल्हा परिषद तसंच खाजगी
संस्थेच्या शाळा सुरू झाल्या. शाळेत विद्यार्थांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत
करण्यात आलं. शाळांमध्ये कोविड 19 संबंधी नियम पाळण्यात येत असून, शिक्षण
विभागाच्या वतीनं यावर देखरेख ठेवण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यातही प्राथमिक शाळा सुरू
झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचं तापमान मोजून शाळेत प्रवेश देण्यात आला. नंदुरबार
जिल्ह्यातल्या १ हजार ७३६ शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात खोडसगाव इथल्या
शाळेच्या प्रशासनानं सजवलेल्या बैलगाडीमधून विद्यार्थ्यांना शाळेत आणलं. नागपूर
जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या दोन हजार १४ शाळा सुरु झाल्या. उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या ६३५ शाळा आजपासून सुरू झाल्या. वाशिम जिल्ह्यातल्या ३५० शाळांमध्ये
इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आजपासून सुरू झाले.
अमरावती जिल्ह्यात आज पहिल्याच दिवशी
शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका क्षेत्र,
ठाणे जिल्हा, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात, १५ डिसेंबरपासून
प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर महापालिकेनंही १०
डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचं ठरवलं आहे. तर नांदेड जिल्ह्यात १३
डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत.
****
मराठवाड्यात अतिवृष्टीनं बाधित
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विशेष पॅकेज देण्याची मागणी औरंगाबादचे खासदार
इम्तियाज जलील यांनी आज लोकसभेत केली. नापिकीला कंटाळून मराठवाड्यात गेल्या
वर्षभरात ७५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीचे फक्त पंचनामे करण्यात
आले. मात्र, पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही. राज्य सरकार म्हणते
केंद्र सरकारनं त्यांचा हिस्सा दिलेला नाही त्यामुळे पिक विम्याचे पैसे देता येत
नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामुळे शेतकऱ्यांच्या या आत्महत्या होत
असल्याचा आरोपही खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी केला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातलं बालविवाहाचं
प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बालविवाह मुक्त गाव ही संकल्पना
राबवण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी म्हटलं आहे.
त्या आज उस्मानाबाद इथं आयोजित किशोरवयीन मुलींसाठी संवाद कार्यशाळेत बोलत होत्या.
शाळकरी मुलींचे बालविवाह, आरोग्य, शिक्षण यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी
जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसवण्यात येणार असून पालक- शिक्षक-
संस्थाचालक आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण करण्यात येणार असल्याचं
त्या म्हणाल्या. यावेळी मुलींना बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी जागरूक राहण्याची
शपथ ही देण्यात आली.
****
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या
उपमहापौर पदासाठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगरसेवक अब्दुल गफार अब्दुल सत्तार
यांनी तर स्थायी सभापती पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक किशोर स्वामी यांनी उमेदवारी
अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक एक उमेदवारी अर्ज दाखल झाले
असल्यामुळे बिनविरोध निवड होणे अपेक्षित आहे.
****
सीमा सुरक्षा दल आज आपला ५७ वा स्थापना
दिवस साजरा करत आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. १९६५ साली आजच्या
दिवशी सीमा सुरक्षा दलाची स्थापना झाली होती.
****
No comments:
Post a Comment