Friday, 31 December 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात आज मध्यरात्रीपासून पुन्हा निर्बंध, विवाह सोहळा, तसंच राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी फक्त ५० लोकांना तर अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी, सर्व पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू

·      राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेले १९८ नवे रुग्ण, पिंपरी- चिंचवडमध्ये २८ डिसेंबरला मृत्यू पावलेल्या रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याचं स्पष्ट

·      ** राज्यात कोविड संसर्गाचे नवे पाच हजार ३५८ रुग्ण, मराठवाड्यात एकाचा मृत्यू तर ५३ बाधित

·      साहित्यिक किरण गुरव, संजीव वेर्णेकर,  प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांना, यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

·      कृषी विद्यापीठांच्या  विविध पिकांचे संशोधित नऊ वाण, १५ कृषी औजारांसह १९५ शिफारसींना मान्यता

आणि

·      दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा ११३ धावांनी विजय, दुबईत १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

***

राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं वाढतं प्रमाण आणि ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग यामुळे पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातला आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला. हे सर्व निर्बंध आज मध्यरात्रीपासून लागू होतील.

खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातल्या विवाह सोहळ्यांमध्ये केवळ ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल. सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल, तसंच अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत. मावळत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरे किंवा पर्यटनस्थळी चौपाट्या किंवा समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व चौपाट्या बंद केल्या जाणार आहेत. सर्व पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य कृती दलाच्या या बैठकीत रुग्णसंख्या वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. गर्दी नको या मुद्यांवर सर्वांचं एकमत असून, आणखी निर्बंधाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. 

****


राज्यात  ओमायक्रॉनची बाधा झालेले १९८ नव्या रुग्णांची काल नोंद झाली. या रुग्णांमध्ये १९० मुंबईतले, ठाण्यातले चार आणि सातारा, नांदेड, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवडमधला प्रत्येकी एक रुग्ण आहे. यामुळे राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या ४५० झाली आहे, त्यापैकी १२५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.

दरम्यान, राज्यात एका ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या मृत्यूची काल नोंद झाली. पिंपरी- चिंचवडमध्ये २८ डिसेंबरला मृत्यू झालेल्या ५२ वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉनची लागण झाली होती, असं गुरुवारी स्पष्ट झालं. नायजेरियातून प्रवास करून आलेल्या या रुग्णाला १३ वर्षे मधुमेहाचा त्रास होता़ पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तो उपचार घेत होता.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे पाच हजार ३५८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ७० हजार ७५४ झाली आहे. काल २२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ५१८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार १९३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख सात हजार ३३० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १८ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ५३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद आणि उस्मानाबद जिल्ह्यात प्रत्येकी १६ रुग्ण आढळले. लातूर आठ, परभणी सात, जालना चार, तर बीड जिल्ह्यात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली. नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाच्या रूग्ण संख्येत होत असलेली वाढ, ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचं जाणवतं असल्यामुळे याला रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात नागरिकांनी दक्ष राहून पथ्य पाळावीत, असं आवाहन, पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. तिसऱ्या लाटेचा कमीत कमी परिणाम राहण्याच्या दृष्टीनं जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचं काटेकोर पालन करणं आवयश्यक असल्याचं ते म्हणाले. या संसर्ग प्रादूर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी लातूर जिल्ह्यात लसीकरण मोहिम गतीमान करणं गरजेचं असून, ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी तत्काळ घ्यावी असं आवाहनही देशमुख यांनी केलं आहे.

****

ओमायक्रॉन विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्र्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी केलं आहे. आरोग्याच्या दृष्टीनं खबरदारी म्हणून एकत्र न येता यावर्षी नववर्षाचं स्वागत घरीच राहून करण्याचं अआवाहन, त्यांनी केलं.

औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनीही नव वर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं आवाहन केलं आहे.

****

यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी या लघु कथा संग्रहासाठी किरण गुरव यांना, तर ‘रक्तचंदन या काव्य संग्रहासाठी संजीव वेर्णेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘काळे करडे स्ट्रोक्स या मराठी कादंबरीसाठी प्रणव सखदेव यांना, तर ‘काव्य परमल या कोकणी काव्यसंग्रहासाठी, श्रद्धा गरज यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. बाल साहित्याच्या क्षेत्रात ‘जोकर बनला किंगमेकर या कादंबरीसाठी संजय वाघ यांना, तर कोकणीमध्ये सुमेधा देसाई यांना लघुकथा संग्रहासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरच्या हल्ल्याच्या गुन्ह्यातले आरोपी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे तसंच अन्य एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज, सिंधूदुर्ग जिल्हा न्यायालयानं काल फेटाळला. या अर्जावर दोन्ही बाजुंकडून दोन दिवस सुनावणी सुरू होती. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याबाबत विचार सुरु असल्याचं, राणे यांच्या वकिलानं काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

****

राज्य सरकारच्या मराठी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत डॉ. श्रीपाद जोशी, पंडित विद्यासागर, डॉ. सुहास पळशीकर, डॉ. केशव देशमुख, डॉ. चिन्मय धारुरकर, पी. विठ्ठल, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. वंदना महाजन आदींचा समावेश आहे. राजभाषा मराठीचं धोरण ठरवण्यासाठी ही समिती काम करेल.

****

सध्या शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप केला जात आहे, त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरण्याची भीती वाटत असल्याचं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय पांढरीपांडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं विद्यापीठ विकास मंच आयोजित विद्यापीठ स्वायत्तता वाचवा अभियाना अंतर्गत, महाविकास आघाडी सरकारच्या विद्यापीठ सुधारणा कायदा २०१६ संदर्भात, गोलमेज परिषदेचं आयोजन काल करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. गुणवत्तेपेक्षा संख्यात्मक गोष्टींना अधिक महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेचं मोठं नुकसान होत असल्याचं, ते म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारनं विद्यापीठ कायद्यामध्ये, कुलगुरूच्या निवडीमध्ये राजकिय हस्तक्षेप वाढवणारा कायदा केल्याच्या निषेधार्थ काल औरंगाबादमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.

****

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि पुण्याच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या वतीनं काल परभणी इथं ४९वी कृषी संशोधन आणि  विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीत चारही कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या विविध पिकांचे नऊ वाण, १५ कृषी औजारांसह १९५ शिफारसींना मान्यता देण्यात आली. जागतिक पातळीवर उपयुक्त असं कृषी संशोधन राज्यातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावा, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी केलं. 

****


औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड - कन्नड मार्गावर वऱ्हाडाला घेऊन निघालेल्या पिकअप वाहन आणि ट्रॅक्टर यांच्या भीषण अपघातात मंगरुळ इथल्या एकाच कुटुंबातल्या सहा जणांचा मृत्यू झाला. काल पहाटे हा अपघात झाला. यात १४ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

उस्मानाबाद शहराच्या उत्पन्नात वाढ करण्यासह केन्द्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून शहराच्या विकासासाठी काम केल्याचं, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितलं. नगर पालिकेच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कार्याचा आढावा यावेळी घेतला.

***

भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना ११३ धावांनी जिंकला. सेंच्युरीयन इथं काल पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ ३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, केवळ १९१ धावांवर बाद झाला. चार बाद ९४ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाचे फलंदाज भारतीय माऱ्यासमोर झटपट बाद झाले. जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्र्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शतकवीर के. एल. राहूलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भारतानं तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत या विजयानं एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला दुसरा कसोटी सामना तीन ते सात जानेवारी दरम्यान जोहान्सबर्ग इथं होणार आहे.

****

दुबईत शारजा इथं १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांग्लादेशावर १०३ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात बांग्लादेशानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. शेख रशीद  ९० धावांची तडाखेबंद खेळी केल्यामुळं भारतानं बांग्लादेशासमोर विजयासाठी २४४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

****

No comments: