Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 December 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा.
****
राज्यात
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी
चिंता व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. दोन दिवसांत मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातल्या निर्बंधांबाबत चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले.
कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा उपाय असून, त्यावर अधिक भर दिला पाहिजे,
असं सांगून टोपे यांनी, लसीकरणासाठी स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन काम करावं, असं
आवाहन केलं. १५ ते १८ वर्षे वयाच्या मुलांचं लसीकरण शाळेत जाऊन करण्याबाबत शक्यतेची
तपासणी करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
केंद्रीय
आरोग्य मंत्रालयाच्या पथकानं महाराष्ट्र सरकारला कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण वाढवण्याचे
निर्देश दिले आहेत. ओमायक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानं राज्यात
अनेक ठिकाणी पाहणी केली, त्यानंतर काढलेल्या निष्कर्षावरुन लसीकरणाबाबत सूचना करण्यात
आल्या आहेत. लसीकरणामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग कमी करता येऊ शकतो, यावर या पथकानं भर
दिला आहे.
****
देशात कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १४३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात
६४ लाख ६१ हजार ३२१ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १४३ कोटी १५
लाख ३५ हजार ६४१ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या नऊ हजार १९५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३०२ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल सात हजार ३४७ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन
कोटी ४२ लाख ५१ हजार २९२ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ७७ हजार दोन रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
भारताचं
सकल देशांतर्गत उत्पादन वित्त वर्ष २०२२ ते २०२३ दरम्यान नऊ टक्के वाढीचा दर राखेल,
असा अंदाज, आय सी आर ए या पत मानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे. कोविड-19 च्या ओमायक्रॉन
या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेबाबत साशंकता निर्माण झाली आहे, अशा
स्थितीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील वित्त वर्षातील आर्थिक विस्तार अधिक
अर्थपूर्ण आणि टिकाऊ राहील, अशी अपेक्षा, संस्थेच्या मुख्य अर्थ तज्ञ अदिती नायर यांनी
व्यक्त केली आहे.
****
गेल्या २७
डिसेंबरपर्यंत नवीन ई-फायलिंग पोर्टलवर आतापर्यंत चार कोटी ६७ लाखांच्या वर नागरिकांनी
आयकर विवरणपत्र भरलं असल्याची माहिती आयकर विभागानं दिली आहे. गेल्या सोमवारी १५ लाख
४९ हजार नागरिकांनी आपलं विवरणपत्र भरलं आहे. ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत असल्यानं ही
संख्या वाढण्याची शक्यता आहे.
****
प्राप्तिकर
विभागाने राज्यात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातल्या दोन व्यावसायिक गटांवर गेल्या आठवड्यात
शोध आणि जप्तीची कारवाई केली. हे गट नागरी बांधकाम आणि जमीन विकासाच्या व्यवसायात गुंतलेले
आहेत. नंदुरबार, धुळे आणि नाशिकमध्ये पसरलेल्या २५ हून अधिक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात
आली. या मोहिमेदरम्यान अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, सुटी कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे
सापडले आहेत. करचोरी, जमिनीचे गैरव्यहार, बेहिशेबी मालमत्ता, या संशयामुळे ही कारवाई
करण्यात आली. या शोध मोहिमेत आतापर्यंत पाच कोटी रुपयांहून अधिक रुपयांची बेहिशेबी
रोकड आणि पाच कोटी रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद
जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या जुन्या
टॉवरवर चढत, संभाजी भोसले या व्यक्तीने काल आंदोलन केलं. औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल
सावे यांनी कोट्यावधीचा घोटाळा केला आहे, यासंदर्भात गेल्या ४२ दिवसांपासून जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर भोसले हे उपोषण करत होते. प्रशासनानं दखल न घेतल्यानं हे आंदोलन केल्याचं
त्यांनी सांगितलं. पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी भोसले यांची समजूत काढली, त्यानंतर
त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या काही गावात वादळी वाऱ्याचा आणि गारपिटीचा शेतकऱ्यांना
फटका बसला आहे. लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासंदर्भात
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी जिल्हाधिकारी आणि कृषी खात्यातल्या
अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून तत्काळ नुकसान पाहणीचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान,
मराठवाड्यासह विदर्भात काल सर्वत्र अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीट झाली. या
गारपीटीने रब्बी पिकांचं आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.या नुकसानीचे पंचनामे
करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
****
येत्या २
दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
विदर्भात ऑरेंज अॅलर्ट दिला असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसच गारा
पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment