Saturday, 25 December 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 December 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** कोविड संसर्गाचा दुप्पट झालेला दर आणि ओमायक्रॉनची वाढती रुग्णसंख्या - या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोविड नियमांचं काटेकोर पालन करावं - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

** औरंगाबाद इथं ओमायक्रॉनचे दोन रुग्ण; दोघेही परदेश प्रवास करून आल्याची माहिती

** टीईटी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या घरातून २४ किलो चांदी, दोन किलो सोनं आणि काही हिरे जप्त

आणि

** औरंगाबाद जिल्ह्यात रस्त्यालगत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे निर्देश

****

राज्यात कोविड संसर्गाचा दर दुप्पट झाला असून, ओमायक्रॉनची रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून सर्व कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालना इथं माध्यमांशी बोलत होते. राज्यात कोविडची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची असेल, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता, सण तसंच नववर्षाचं स्वागत करताना, निर्बंधांकडे दुर्लक्ष करू नये, अशी सूचना टोपे यांनी केली आहे. ते म्हणाले...

माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की, आपण सण आहे. नवीन वर्षाचं स्वागत आहे. निश्चित प्रकारे करावं, परंतू निर्बंध लक्षात घेऊन त्याचं अनुपालन करत करत या सगळ्या गोष्टी कराव्यात. सध्या जो सहाशे सातशेचा आकडा दररोजचा होता, तो आता चौदाशेवर दररोज चालला आहे. याची गती जर अशी वाढत गेली तर हे नक्कीच आहे की, तिसरी लाट जर आली तर ती आता ओमायक्रॉनचीच राहील. म्हणुन आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायची आहे. एवढीच माझी यानिमित्ताने नम्रता पूर्वक सुचना आहे.

 

केंद्राने आता कोविड प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस देण्याबाबत निर्णय घेणं गरजेचा असून आता याबाबत निर्णय घ्यायला हवा अशी मागणीही टोपे यांनी केली.  १२ ते १८ वर्ष वयोगटातल्या बालकांना लसीकरण करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली असून, याबाबत निर्णय व्हायला पाहिजे असंही ते म्हणाले.

****

औरंगाबाद इथं ओमायक्रॉनचे आज दोन रुग्ण आढळले. यापैकी एक रुग्ण लंडनहून कुटूंबासह मुंबईमार्गे औरंगाबाद इथं आला आहे. या कुटुंबातली एक तरुणी मुंबईत झालेल्या तपासणीत ओमायक्रॉन बाधित आढळली होती. तिचे ५५ वर्षीय वडील औरंगाबाद इथं झालेल्या तपासणीत बाधित असल्याचे आढळलं आहे. दुसरा रुग्ण ३३ वर्षाचा तरुण असून, तो दुबईहून औरंगाबाद इथं आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

लोकशाहीत सत्तेच्या माध्यमातून गरीबांचे अश्रू पुसायचे असतील तर सर्वांनी दिवगंत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं सुशासन अंगिकारणं आवश्यक असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नागपूर इथं वाजपेयी यांचा जयंती निमित्त सुशासन दिवस कार्यक्रमात बोलत होते.

****

वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आज उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोहित शशिकांत निंबाळकर यांना रक्तदान सेवेबद्दल, बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं अनाथ मुलांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारे गर्जे दांपत्य आणि वर्षानुवर्षे करत असलेल्या अंत्यविधीच्या सेवेसाठी उस्मानाबाद इथले बाळासाहेब गोरे यांना लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा आणि सोयीसुविधा द्यायलाच हव्यात, असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात ‘अटलशक्ती महासंपर्क अभियानाची सुरुवात आज चंद्रकांत पाटील यांनी केली, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिक्षक पात्रता परीक्षा  - टीईटी रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी, आरोग्य विभागातील भरती, म्हाडा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत. याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयमार्फेत करावा या मागणीचाही पाटील यांनी पुनरुच्चार केला.

****

आरोग्य भरतीच्या परीक्षेबाबत विधिमंडळात चर्चा झाली असून, पुन्हा परीक्षेबाबतचा निर्णय पोलीस तपासाचा अहवाल आल्यानंतर घेतला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते आज जालन्यात बोलत होते. यापुढे राज्यात खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही असंही टोपे यांनी सांगितलं. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल असं टोपे म्हणाले.

****

शिक्षक पात्रता परिक्षा टीईटी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पोलिसांनी मोठं घबाड जप्त केलं आहे. पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या बंगळुरू इथल्या घरातून काल रात्री तब्बल २४ किलो चांदी दोन किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विनकुमार हा जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख आहे.

****

 औरंगाबाद जिल्ह्यात रस्त्यालगत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात ''ऍडव्हायझरी कमिटी फॉर सेफ फूड अँड हेल्दी डाएट'' या विषयावर झालेल्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते. पर्यंटकांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न देण्याची जबाबबदारी अन्न औषध प्रशासनाची असल्याने ही जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पडावी अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. शहरात पुरवठा होणाऱ्या दुधाची शुद्धता तपासणी करावी, अन्न प्रक्रिया आणि निर्मिती उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, रस्त्यालगत असलेल्या खाद्यपदार्थांच्या ठेल्यांवरच्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता तपासणी करावी, तसंच पदार्थ तळण्यासाठी तेलाचा दोन पेक्षा अधिक वेळा पुनर्वापर वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अन्न औषध प्रशासनाला दिले आहेत.

****

उस्मानाबाद इथल्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष केशव तुकाराम पाटील यांचं आज राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. उस्मानाबाद जनता बँकेचेही ते काही काळ संचालक होते. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. उस्मानाबादच्या शैक्षणिक वाटचालीत त्यांचा मोठा सहभाग होता.

****

जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद तालुक्यातल्या पिंपळखुटा इथल्या राजू खोसरे यांच्या शेतवस्तीवर काल मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. चार ते पाच दरोडेखोरांनी घरातल्या पाच महिलांना काठी आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

इतर मागासवर्ग ओबीसी आरक्षणासंदर्भात समता परिषद आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलच्या वतीने आज औरंगाबाद इथं सेवन हिल परिसरात निषेध म्हणून केंद्र सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आलं.

****

लातूर शहरातल्या दिव्यांग, निराधार, विधवा आणि इतर पात्र व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रभागात समाधान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विधिज्ञ किरण जाधव यांच्या हस्ते लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये समाधान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

****

No comments: