Tuesday, 28 December 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.12.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 December 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशीही विधानसभा अध्यक्ष निवडीचा पेच कायम.

·      विधिमंडळ आवारात आणि सभागृहात आचारसंहिता पालनाची उपाध्यक्षांची सूचना.

·      आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक.

·      दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव ३२७ धावांवर संपुष्टात.

आणि

·      औरंगाबाद जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस.

****

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशीही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होऊ शकली नाही. राज्यपाल आणि सरकार यांच्यात चाललेल्या पत्रव्यवहारांनंतरही विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा पेच सुटू शकला नाही. आता याबाबत मार्च २०२२ मध्ये प्रस्तावित असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेल्या फेब्रुवारी महिन्यात विधानसभा अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यापासून हे पद रिक्त आहे.

****

राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी पदभरती, वैद्यकीय उपकरण खरेदी, इमारत बांधणी असे विषय तातडीने मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. विधान परिषदेत सतीश चव्हाण आणि इतरांनी केलेल्या एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. अपूर्ण इमारतीबाबत हडको आणि एशियन बँकेकडून कमी व्याज दराचं कर्ज घेऊन त्यांची बांधणी करण्याचं काम तातडीनं मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

गट क आणि ड च्या पदभरतीबाबत शासन गंभीर आहे, कोरोना काळात काम करणाऱ्या वर्गाला यात दहा टक्के आरक्षण देण्याबाबत जयंत पाटील यांच्या सूचनेवर नियमाप्रमाणे शक्य ती कार्यवाही केली जाईल असं ही टोपे यांनी सांगितलं.

 

राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा तर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी सेवा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती, टोपे यांनी आज विधानपरिषदेत दिली. वैद्यकीय उपकरणं पुरवणं त्याचप्रमाणे रिक्त जागा भरण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही केली जात असल्याचं आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातील जलसंधारण विभागात २०१७ ते २०२० या कालावधीत बोगस देयकांवर स्टेशनरी खरेदी घोटाळा झाल्याचा मुद्दा शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला. या प्रकरणी एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिलं.

****

राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं तातडीनं भरली जातील असं कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सतीश चव्हाण यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

****

अकोला महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल असताना यावर चर्चा होऊ नये, या मुद्यावरून विरोधी पक्षानं विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेत गदारोळ घातला. यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरू राहिला, या भ्रष्टाचारात जे दोषी आढळतील त्या अधिकाऱ्यांसह सर्वांवर कारवाई करण्याची घोषणा नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या गदारोळातच केली.

****

विधिमंडळ आवारात आणि सभागृहात सर्व सदस्यांनी आचारसंहितेचं योग्य पालन करावं, अशी सूचना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली आहे. आपल्या दालनात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. यासंदर्भात काही जणांच्या वर्तनानं सभागृहाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, त्यामुळे सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचं मत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. आपल्या वर्तनाने इतरांचा अवमान, उपमर्द होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, असं पवार यांनी सांगितलं.

****

दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला परवानगी नाकारणारे क्रीडा मंत्री सुनिल केदार यांच्या मुंबईतल्या घराबाहेर खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज भाजप कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं. खासदार शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

****

आरोग्य भरती प्रक्रियेत परीक्षेत पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अमरावतीचा निशित गायकवाड आणि त्याच्या मित्राचा समावेश आहे. या दोघांना नागपूरमधून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव आज ३२७ धावांवर संपुष्टात आला. सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नव्हता, त्यामुळे पहिल्या दिवशी थांबलेल्या ३ बाद २७२ धावांवरून भारतानं आज सकाळी खेळायला सुरवात केली. शतकी खेळी केलेला के एल राहुल १२३ धावांवर, तर अजिंक्य राहणे ४८ बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेची सुरवातही अडखळत झाली. त्यांचे आघाडीचे चार फलंदाज झटपट बाद झाले. मोहम्मद शमीनं दोन तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी एक बळी घेतला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या चार बाद ४२ धावा झाल्या होत्या.

****

हरियाणा आणि सभोवतालच्या परिसरात सक्रीय चक्रीवादळामुळे विदर्भ तसंच मराठवाड्यात कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात अमरावती, अकोला, बुलडाणा, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यात आज दुपारनंतर गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. या गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून तूर, संत्रे, कांदा आणि आंबा पिकांची प्रतवारी सुद्धा खालावण्याची भीती वर्तवली जात आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, पैठण, सिल्लोड, या तालुक्यांमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. आज अनेक ठिकाणी पाऊस झाला. या पावसामुळे ऊस, कांदा, तसंच गव्हाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...