Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 December 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० डिसेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत
आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना
आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही,
त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क
वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक
माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ९६१.
·
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं
उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचं आवाहन.
·
सिल्लोड तालुक्यातल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू.
आणि
·
भारताचा दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात
११३ धावांनी विजय.
****
देशभरातल्या
ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ९६१ झाली आहे. यापैकी सर्वाधिक २६३ रुग्ण दिल्लीतले आहेत,
तर २५२ रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. देशभरात आत्तापर्यंत २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये
ओमायक्रॉननं शिरकाव केला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. आजवर आढळलेल्या ओमायक्रॉन
बाधितांपैकी ३२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
दिली आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्गाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या जनतेला
नियमांचं पालन करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. आज पुणे इथं
एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आवाहन केलं आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग
वाढत असल्यानं नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये, नववर्षाचं स्वागत घरी राहूनच करावं,
असं त्यांनी म्हटलं आहे. अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले असून, आपल्या
राज्यात अशी वेळ येऊ देऊ नये, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या वाढत्या
कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
नागरीकांनी या संसर्गाच्या प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं, पोलिसांवर कारवाई करण्याची
वेळ येऊ देऊ नका, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.
****
अत्यंत
वेगानं पसरत असलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपाचा प्रसार रोखण्यासाठी
मुंबई पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू केलं आहे. याबाबतचा आदेश मुंबई पोलिसांनी जारी
केला आहे. हा आदेश आजपासून येत्या सात जानेवारीपर्यंत लागू राहील.
****
गेल्या
काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाच्या रूग्ण संख्येत होत असलेली वाढ, ही तिसऱ्या
लाटेची चाहूल असल्याचं जाणवतं असल्यामुळं याला रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात नागरिकांनी
दक्ष राहून पथ्य पाळावीत, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री
तसंच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. तिसऱ्या लाटेचा कमीत
कमी परिणाम राहण्याच्या दृष्टीनं जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर
पालन करणं आवयश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले. या संसर्ग प्रादूर्भावाला प्रतिबंध
करण्यासाठी लातूर जिल्ह्यात लसीकरण मोहिम गतीमान करणं गरजेचं असून, ज्यांनी अद्याप
लसीकरण केलेलं नाही, त्यांनी तत्काळ करुन घ्यावं असं अवाहनही देशमुख यांनी केलं आहे.
****
ओमायक्रॉन
विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्र्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी खबरदारी
घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटनकर यांनी केलं आहे. आरोग्याच्या दृष्टीनं
खबरदारी म्हणून एकत्र न येता यावर्षी नववर्षाचं स्वागत घराबाहेर न पडता अत्यंत साधेपणानं
घरच्या घरीच करा, असं विटणकर यांनी म्हटलं आहे.
औरंगाबादचे
पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनीही नववर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं आवाहन केलं
आहे. नागरिकांनी घरीच राहून नववर्षाचा आनंद साजरा करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सिल्लोड परिसरात एक प्रवासी वाहन आणि ट्रॅक्टर दरम्यान काल मध्यरात्रीच्या
सुमारास भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिल्लोड
- कन्नड मार्गावर मोढा फाटा इथं ही दुर्घटना झाली. मृतांमध्ये सिल्लोड तालुक्यातल्या
मंगरुळ इथल्या एकाच कुटुंबातले सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना
उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लग्नावरून परतणाऱ्या एका प्रवासी वाहनानं
उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण
सुटल्यानं हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या भीषण अपघातानंतर
या भागातली वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
****
भारतानं
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना ११३ धावांनी जिंकला आहे. दक्षिण
आफ्रिकेचा संघ ३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १९१ धावांवर बाद झाला. आज पाचव्या
दिवशी यजमान संघानं चार बाद ९४ धावांवरुन पुढं खेळण्यास सुरुवात केली होती. कर्णधार
डीन एल्गरनं एकाकी झुंज देताना ७७ धावा केल्या. जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह आणि
मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्र्विन यांनी प्रत्येकी
दोन गडी बाद केले. पहिल्या डावात शतक झळकवणारा सलामीवीर के. एल. राहूल सामनावीर पुरस्काराचा
मानकरी ठरला. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतानं एक - शून्य अशी आघाडी घेतली
आहे. या मालिकेतला दुसरा कसोटी सामना तीन ते सात जानेवारी दरम्यान होणार आहे.
****
कथाकार
किरण गुरव यांच्या `बाळूच्या अवस्थांतराची
डायरी` या लघु कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा या वर्षीचा पुरस्कार जाहिर झाला आहे.
आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. `जोकर
बनला किंगमेकर` या संजय वाघ यांच्या कादंबरीला या अंतर्गत बालसाहित्य पुरस्कार जाहिर
झाला आहे. तर प्रणव सखदेव यांच्या `काळे करडे
स्ट्रोक्स` या कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार जाहिर झाला आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात केसराळी शिवारात काल संध्याकाळी गारांचा पाऊस झाला.
या पावसामुळं रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे.
****
मराठा
आरक्षण आंदोलनात आठ ऑगस्ट २०१८ रोजी मृत्यूमुखी पडलेल्या लातूर जिल्ह्यातल्या माटेफळ
इथले दिवंगत रमेश ज्ञानोबा पाटील यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता मदत निधीचा धनादेश
आज लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला.
//**************//
No comments:
Post a Comment