Monday, 27 December 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.12.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 December 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

वैद्यकीय शिक्षण विभागातली पदभरती जलदगतीने पूर्ण होईल, असं आश्वासन, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित ‌देशमुख यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. शासनाच्या अखत्यारिच्या बाहेरच्या कारणांमुळे या पदभरतीला उशीर झाला, मात्र आता मंजुर पदं एमपीएससीद्वारे भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं. 

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर आमदार नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढल्याच्या घटनेचा, विधानसभेत शिवसेनेच्या सदस्यांनी निषेध केला. नितेश राणे यांनी माफी मागावी अशी मागणी करत सदस्यांनी सदनात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं होतं.

दरम्यान, विविध विभागांच्या पेपरफुटीची सीबीआय चौकशी आणि शेतकरी प्रश्नांवरुन विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केलं.

****

तेलंगणा - छत्तीसगढ सीमेवर भद्रादी कोठागुडम जिल्ह्यात, नक्षलवादी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यात आज सकाळी चकमक झाली. यात जवळपास १० नक्षलवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह सापडले असून, सुरक्षा बलाच्या जवानांनी या परिसरात शोधमोहिम सुरु केली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला, पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. भूषण यांनी या राज्यांना, कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याचे निर्देश यापूर्वी दिले होते. पुढच्या वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १४१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात २९ लाख ९३ हजार २८३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १४१ कोटी ७० लाख २५ हजार ६५४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या सहा हजार ५३१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३१५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल सात हजार १४१ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४२ लाख ३७ हजार ४९५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ७५ हजार ८४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.   

****

भारतानं कधीच कोणावर हल्ला केला नाही, पण आपल्या नागरिकांचं कोणत्याही आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी भारत तयार आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. लखनौ इथं संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्र तसंच ब्रम्होस निर्मिती केंद्राच्या पायाभरणी कार्यक्रमात ते काल बोलत होते. परकीय आक्रमणाला अटकाव करण्याच्या हेतुनं ब्रम्होस निर्मिती केंद्राची सुरवात केली. ब्रम्होस २१ व्या शतकातली सगळ्यात सक्षम प्रणाली असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. या प्रणालीमुळे भारत आणि रशिया मधले संबंध आणखी वृद्धींगत झाल्याचंही त्यांनी सांगितलं. लखनौच्या २२ एकर जागेत हे केंद्र उभारलं जाणार आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

****

भारतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीच्या बळावर या शतकातल्या सर्वात मोठ्या कोरोना संकटावर मात केली असं प्रतिपादन, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केलं आहे. धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा इथं नगरपरिषदेच्या वतीनं अल्पसंख्यांक समाजासाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर नक्वी यांनी दोंडाईचा शहरातल्या नागरिकांना केंद्र सरकारच्या वतीनं अल्पसंख्यांक समुदायासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. कोरोना विरुद्धच्या लढाईला बळकटी आणण्यासाठी सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असं आवाहनही त्यांनी केलं.  

****

शिक्षण महर्षी आणि कृषि क्रांतीचे प्रणेते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

अहमदनगर शहराजवळ असणाऱ्या निंबळक या गावात शौचालयाचा हौद साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगाराचा, आणि त्याला वाचवायला गेलेल्या घर मालकाचाही मृत्यू झाला. काल संध्याकाळी ही घटना घडली. टाकीचा अंदाज न आल्यानं कामगार आतमध्ये फसला, त्याला बाहेर काढण्यासाठी घरमालक साहेबराव कैसे आणि दुसऱ्या कामगाराने मिळून प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात तेही टाकीत पडल्यानं त्यांचा आणि कामगाराचा मृत्यू झाला. दुसर्या कामगाराची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

****

No comments: