Wednesday, 29 December 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.12.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 December 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, २८ फेब्रुवारी २०२२ पासून नागपूरमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन

·      विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा निर्णय

·      खामगाव- जालना रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करणार

·      आरोग्य भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आणखी दोन दलालांना अटक

·      मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोलीसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस

·      राज्यात कोविड संसर्गाचे दोन हजार १७२ तर मराठवाड्यात ३३ नवे रुग्ण

आणि

·      दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात १४६ धावांची आघाडी

****

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन काल संस्थगित झालं. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत ही घोषणा केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २८ फेब्रुवारी २०२२ पासून प्रारंभ होणार असल्याचं, उपाध्यक्षांनी सांगितलं.

दरम्यान, राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल शेवटच्या दिवशीही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होऊ शकली नाही. आता ही निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याचा निर्णय घेतल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नियम बदलणं हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असं काहीच नाही, असं त्यांनी नमूद केलं. विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात राज्यपालांना पत्र पाठवून संपूर्ण प्रक्रिया कळवण्यात आली होती, राज्यपालपदाचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी सरकारनं घेतली होती, अध्यक्षपदाची संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात पार पाडता आली असती, मात्र काल शेवटच्या दिवशी सकाळी राज्यपालांनी पुन्हा पत्र पाठवल्यानं ही निवडणूक पुढे ढकलली गेल्याचं, पटोले यांनी सांगितलं.

****

राज्यातली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी पदभरती, वैद्यकीय उपकरण खरेदी, इमारत बांधणी असे विषय तातडीने मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. विधान परिषदेत सतीश चव्हाण आणि इतरांनी केलेल्या एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. अपूर्ण इमारतीबाबत हडको आणि एशियन बँकेकडून कमी व्याज दराचं कर्ज घेऊन त्यांची बांधणी करण्याचं काम मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

गट क आणि ड च्या पदभरतीबाबत शासन गंभीर आहे, कोरोना काळात काम करणाऱ्या वर्गाला यात दहा टक्के आरक्षण देण्याबाबत जयंत पाटील यांच्या सूचनेवर नियमाप्रमाणे शक्य ती कार्यवाही केली जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं.

राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा तर उप जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी सेवा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल, तसंच वैद्यकीय उपकरणं पुरवणं आणि रिक्त जागा भरण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही केली जात असल्याचं, आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात जलसंधारण विभागात २०१७ ते २०२० या कालावधीत, बोगस देयकांवर स्टेशनरी खरेदी घोटाळा झाल्याचा मुद्दा, शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला. या प्रकरणी एका महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिलं.

****

अकोला महानगरपालिकेच्या भ्रष्ट्राचार प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल असताना यावर चर्चा होऊ नये, या मुद्यावरून विरोधी पक्षानं विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेत गदारोळ घातला. यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी, सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं होतं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरू राहिला, या भ्रष्टाचारात जे दोषी आढळतील त्या अधिकाऱ्यांसह सर्वांवर कारवाई करण्याची घोषणा नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली. या संदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची सूचना, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षानं काल सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सादर केली.

****

खामगाव- जालना रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल विधानसभेत दिली. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणच्या रस्त्यांवरील कामासाठी हरकती घेण्यात आल्यानं, काम प्रलंबित आहे. तर काही ठिकाणी वन विभागाकडून परवानगी प्राप्त होईपर्यंत विलंब होत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

****

आरोग्य भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी दोन दलालांना अटक केली आहे. यामध्ये अमरावतीचा निशित गायकवाड आणि त्याच्या मित्राचा समावेश आहे. या दोघांना नागपूरमधून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

****

हरियाणा आणि सभोवतालच्या परिसरात सक्रीय चक्रीवादळामुळे मराठवाडा तसंच विदर्भात कमी दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि हिंगोली तसंच विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, जिल्ह्यांमध्ये काल दुपारनंतर गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. या गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं असून, तूर, संत्री, कांदा आणि आंबा पिकांची प्रतवारी सुद्धा खालावण्याची भिती वर्तवली जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, पैठण, सिल्लोड, या तालुक्यांमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यात ऊस, कांदा, तसंच गव्हाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. भोकरदन, जाफाराबाद, घनसावंगी बदनापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे ज्वारी आणि गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं. जाफराबाद तालुक्यात काही भागात बोराच्या आकाराच्या गाराही पडल्या. अंबड तालुक्यातल्या मठपिंपळगाव, धनगरपिंप्री, हस्तपोखरी, शिराढोण, नांदी धनगरपिंपळगाव या भागातही पावसानं हजेरी लावली. भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी शिवारात बाभळीच्या झाडावर वीज कोसळल्यानं एक बैल दगावला.

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, औंढा नागनाथ, डिग्रस कर्हाळे आणि खुडस या परिसरात पाऊस झाला.

दरम्यान, येत्या २ दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात ऑरेंज अॅलर्ट दिला असून, तुरळक ठिकाणी  मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसच गारा पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

कोविड प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेण्यासाठी लाभार्थ्याला मधुमेह किंवा इतर आजार असल्यास, त्याचं वैद्यकीय प्रमाणपत्र लसीकरण केंद्रावर सादर करावं लागेल, अशा आशयाचे कोणतेही निर्देश केंद्र सरकारने जारी केलेले नाहीत, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं आहे. लसीकरण मोहिमेबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर समन्वय साधण्याच्या हेतूनं घेतलेल्या कार्यशाळेत, ते बोलत होते. लसीची दुसरी मात्रा घेऊन झाल्यानंतर किमान नऊ महिन्यांनी बूस्टर डोस घेता येईल, असं ते म्हणाले. बूस्टर डोससाठी पात्र लाभार्थ्यांना कोविन मंचावरुन आठवण करुन देणारा संदेश मिळेल, आणि त्याचा उल्लेख लसीकरण प्रमाणपत्रावर असेल, असं भूषण यांनी सांगितलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार १७२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ६१ हजार ४८६ झाली आहे. काल २२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ४७६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार ९८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख चार हजार ८३१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ४९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, राज्यात काल ओमायक्रॉन बाधा झालेला एकही नवीन रुग्ण आढळला नाही.

****

मराठवाड्यात काल ३३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात १२, लातूर आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी आठ, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर जालना जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली. हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या नेतृत्वाखाली काल जिंतूर इथं, मुख्य बाजारपेठेत लसीकरण मोहीम राबवण्यात आली. अनेक दुकानदार आणि नागरिकांनी टाकसाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लसीकरण करून घेतलं. यावेळी १२८ जणांना लस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश बोराळकर यांनी दिली.

****

लसीकरणापासून वंचित नागरिकांसाठी १ ते १० जानेवारी या कालावधीत बीड जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबवावी, असा निर्देश जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी दिले आहेत. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी महसूल विभागानं तालुकानिहाय पथकाची नेमणूक करावी, या पथकात तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांचा समावेश करुन त्यांना प्रशिक्षण द्यावं, आणि लसीकरण मोहीम यशस्वी करुन आदर्श बीड पॅटर्न निर्माण करावा, असं ते यावेळी म्हणाले.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सेंच्यूरिअन इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव १९७ धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद शमीनं सर्वाधिक पाच, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराजने एक बळी घेतला. त्यापूर्वी भारतीय संघ काल पहिला डाव्यात ३२७ धावांवर सर्वबाद झाला. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद १६ धावा झाल्या होत्या. मयांक अग्रवाल चार धावांवर बाद झाला. के एल राहुल पाच तर शार्दुल ठाकूर चार धावांवर खेळत होते. सामन्यात भारतानं १४६ धावांची आघाडी घेतली आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलली आहे. दोन जानेवारी रोजी ही परीक्षा होणार होती, मात्र काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं वयोमर्यादा वाढवून देण्यासंदर्भातला शासन निर्णय प्रसिद्ध केला होता, त्याचा लाभ उमेदवारांना घेता यावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या एक मार्च ते यंदाच्या १७ डिसेंबर दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना, आजपासून एक जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

****

No comments: