Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 December 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० डिसेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत
आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या
सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस
घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी
घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९
शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत
वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
नववर्ष स्वागत कार्यक्रमासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना
जारी, घरीच राहून नववर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन
·
राज्यात ८५ नवे ओमायक्रॉन बाधित तर कोविडचे तीन हजार ९०० रुग्ण,
मराठवाड्यातही ४९ बाधित
·
अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर बारा डब्यांच्या जलदगती
रेल्वेची यशस्वी चाचणी
·
१०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध
आरोपपत्र दाखल
·
बीड जिल्ह्यात आणखी एक ४०९ एकरचा वक्फ जमिन घोटाळा उघडकीस, उपजिल्हाधिकाऱ्यासह
आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
आणि
·
दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी
भारताला सहा फलंदाज बाद करण्याची गरज तर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २११ धावांची आवश्यकता
****
गृह
विभागानं नववर्ष स्वागत कार्यक्रमासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात नववर्षाचं
स्वागत घरीच राहून करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सरकारनं २५ डिसेंबरपासूनच रात्री
नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घातली
आहे, त्यामुळे ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं
आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. फटाक्यांची आतिषबाजी करु नये, तसंच ध्वनी प्रदुषणाच्या
नियमांचं पालन करण्याच्या सूचनाही गृह विभागानं दिल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी
धार्मिक स्थळांना भेटी देताना गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात
आले आहेत.
सरत्या
वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताकरता बंदिस्त सभागृहातल्या कार्यक्रमांना, आसन
क्षमतेच्या ५० टक्के तर खुल्या जागेतल्या कार्यक्रमांना, क्षमतेच्या २५ टक्के मर्यादेत
उपस्थित राहायला परवानगी असेल. कार्यक्रमस्थळी कोविड नियमांचं पालन होण्याकडे विशेष
लक्ष पुरवण्याची गरज असल्याचं, गृह विभागाच्या आदेशात म्हटलं आहे.
****
राज्यात
काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले नवे ८५ रुग्ण आढळले. यापैकी ४७ रुग्ण राष्ट्रीय विषाणू
विज्ञान संस्थेच्या तर ३८ रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या तपासणीत
आढळून आले आहेत. राज्यातली ओमायक्रॉन बाधितांची संख्या २५२ झाली आहे. यापैकी ९९ रुग्ण
संसर्गमुक्त झाल्यानं घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान काल आढळलेल्या रुग्णांपैकी ४३
रुग्ण मुंबईतले, पिंपरी चिंचवड ६, पुणे, मुंबई तसंच कल्याण डोंबिवली प्रत्येकी पाच,
नागपूर तीन, पनवेल दोन, तर ठाणे, भिवंडी, कोल्हापूर, आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी
एका रुग्णाचा समावेश आहे.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार ९०० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ६५ हजार ३८६ झाली आहे. काल २० रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
४९६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार ३०६
रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख सहा हजार १३७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या १४ हजार ६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ४९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात १९, औरंगाबाद १६,
लातूर चार, परभणी आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी तीन, तर नांदेड आणि बीड जिल्ह्यात
दोन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
अहमदनगर
- बीड - परळी मार्गावर काल अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर काल बारा डब्यांच्या
जलदगती रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. काल आष्टी रेल्वे स्थानकावर बीड जिल्ह्याच्या
खासदार प्रितम मुंडे यांनी पूजन करुन रेल्वेचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी या रेल्वेला
हिरवा झेंडा दाखवून परतीच्या प्रवासाला रवाना केलं. खासदार मुंडे यांनी याबद्दल आनंद
व्यक्त करत, रेल्वेसाठी अनेक दशकं लढाई देणाऱ्या घटकांचं अभिनंदन केलं आहे. या मार्गावरचं
उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या...
फार आनंदाचा, भाग्याचा, अभिमानाचा
क्षण आहे. अनेक वर्ष माझ्या लहानपणापासून मी या रेल्वेविषयी ऐकत होते. ती रेल्वे आज
प्रत्यक्ष आपल्या जिल्ह्यात आलेली आहे. आज मुंडे साहेबांमुळेच हे स्वप्न शक्य झालेलं
आहे. जितक्या लोकांनी या रेल्वेसाठी संघर्ष केला जिल्ह्यातल्या त्या सगळ्या माणसांना
आहे. आष्टीपर्यंत आज ही सगळी तयारी झालेली आहे. फार मोठ पाऊल पडलं आहे आणि त्यांच्या
आशिर्वादाने लवकरचं पुढची मजल सुद्धा गाठू.
****
१००
कोटी रुपये खंडणी प्रकरणी सक्तवसुली संचालनालय- ईडीनं, माजी गृहमंत्री अनिल देशमुख
यांच्याविरुद्ध काल आरोपपत्र दाखल केलं. सहा हजार पानांच्या या आरोपपत्रात देशमुख यांचा
मुख्य आरोपी म्हणून, तर त्यांची दोन मुलं, ऋषिकेश आणि सलील यांचाही समावेश करण्यात
आला आहे. अनिल देशमुख गेल्या दोन नोव्हेंबरपासून ईडीच्या अटकेत असून, सध्या ते न्यायालयीन
कोठडीत आहेत. या प्रकरणातलं हे दुसरं आरोपपत्र असून, देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव
पांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याविरुद्ध ऑगस्ट महिन्यात, पहिलं आरोपपत्र
दाखल करण्यात आलं होतं.
****
आमदार
नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर न्यायालयानं
निकाल राखून ठेवला असून निकाल आज जाहीर केला जाईल. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राणे
आरोपी असून, त्यांनी अटकपूर्व जमीन अर्ज दाखल
केला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली आणि ओरोस इथं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला
होता.
दरम्यान,
एका पत्रकार परिषदेतील वक्तव्यावर कणकवली पोलिसांनी काल केंद्रीय मंत्री नारायण राणे
यांना नोटीस बजावली आहे.
****
बीड
जिल्ह्यात आणखी एक वक्फ जमिन घोटाळा उघडकीस आला असून, वक्फ बोर्डाचं सुमारे ४०९ एकर
क्षेत्र खालसा करुन खासगी लोकांनी हडपल्याचं समोर आलं आहे. यात तत्कालिन उपजिल्हाधिकारी
प्रकाश आघाव पाटील, तहसिलदार, महसुलच्या आठ अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. जिल्हा वक्फ अधिकारी अमीनजुमा, खलीखुजमा यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई
करण्यात आली.
****
बनावट
नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या पाच जणांच्या टोळीला औरंगाबाद पोलिसांनी काल अटक
केली. शहरात एका मद्याच्या दुकानात काही इसम बनावट नोटा देऊन मद्य खरेदी करत असल्याची
माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधारे विशेष पोलीस पथकानं सापळा रचून ही कारवाई केली.
या टोळीकडून एक लाख २० हजार रुपये दर्शनी मूल्याच्या, ५००, १०० आणि ५० रुपयांच्या बनावट
चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. नोटा तयार करण्यासाठी वापरात येणारं साहित्य, वाहतुकीसाठी
वापरलेली कार आणि पाच मोबाईल, असा एकूण तीन लाख १० हजार ३९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात
आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून, दोन
लाख ९८ हजार ५३० रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त केला. मंगळवारी रात्री टाकलेल्या छाप्यात
तीन जणांना अटक करून त्यांच्याकडून देशी मद्याच्या, एक हजार ८४० बाटल्या आणि एक चारचाकी
वाहन जप्त करण्यात आलं. दरम्यान, रेणापूर तालुक्यात ग्रामीण भागातल्या चार ढाब्यांवर
छापे टाकून चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे दोनशे लीटर देशी तसंच विदेशी
मद्य जप्त करण्यात आलं.
****
उस्मानाबाद
इथं आठवड्यातले काही ठराविक औद्योगिक आणि कामगार न्यायालयीन कामकाज चालवण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी
जागेची उपलब्धता करून देण्याचे निर्देश, कामगार तसंच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
यांनी दिले आहेत. आमदार कैलास घाडगे - पाटील यांनी ही माहिती दिली. उस्मानाबाद जिल्ह्याकरता
औद्योगिक तसंच कामगार न्यायालय नसल्यानं, जिल्ह्यातली प्रकरणं लातूर इथं चालवली जातात.
****
दक्षिण
आफ्रिकेत सेंच्युरियन इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज सामन्याच्या
अखेरच्या दिवशी, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २११ धावांची, तर भारताला विजयासाठी दक्षिण
आफ्रिकेचे सहा फलंदाज बाद करण्याची गरज आहे. भारतानं दुसऱ्या डावात १७४ धावा करून ३०४
धावांची आघाडी घेतली, आणि दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी ३०५ धावांचं लक्ष्य ठेवलं.
भारताच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतच्या ३४ धावा वगळता अन्य एकही फलंदाज विशेष कामगिरी
करू शकला नाही. शार्दुल ठाकूर १०, रविचंद्रन अश्विन १४, चेतेश्वर पुजारा १६, कर्णधार
विराट कोहली १८, अजिंक्य राहणे २०, तर के एल राहुल २३ धावांवर बाद झाले. काल चौथ्या
दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या चार बाद ९४ धावा झाल्या होत्या.
****
हिंगोली
जिल्ह्यात काल बस आणि ट्रकच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर २४ प्रवासी जखमी
झाले. हिंगोली- नांदेड रस्त्यावर कळमनुरी तालुक्यातल्या पारडी मोड जवळ ट्रक आणि लक्झरी
बस यांच्यात काल दुपारी हा अपघात झाला. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्यानं,
त्यांना उपचारासाठी नांदेड इथं हलवण्यात आलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या नाळेश्वर- सुगाव- हस्सापूर रस्त्यावरील काम सुरु करण्यात येणार असल्यामुळे
या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीला २९ एप्रिल २०२२ पर्यंत मनाई करण्यात
आली आहे. या रस्त्यावरील वाहतुकीसाठी पर्यायी मागाचा वापर करावा अशी याबाबतची अधिसूचना
जिल्हाधिकारी तसंच जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काल निर्गमीत केली आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात दिनांक तीन ते २२ जानेवारी या कालावधीत जपानी मेंदुज्वर प्रतिबंधक लसीकरण
मोहीम राबवण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
यांनी केलं आहे. ते काल यासंदर्भात जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत बोलत होते.
****
कोल्हापूर
जिल्ह्यातल्या राधानगरी धरणाच्या एका दरवाजाचं काल सकाळी काम सुरू असताना दरवाजा १६
फुटांवर उघडून अचानक अडकला. त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता.
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याला अथक परिश्रमानंतर दुपारी तीन
वाजेनंतर धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश आलं.
****
No comments:
Post a Comment