Wednesday, 29 December 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.12.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

केंद्र सरकारनं ग्राहक संरक्षणासंदर्भातल्या कायद्यांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार थेट विक्री करणाऱ्या संस्था किंवा विक्रेत्यांना पिरॅमिड योजना किंवा पैशांचं हस्तांतरण करणाऱ्या योजना अंमलात आणण्यापासून रोखण्यात आलं आहे. या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारांना यंत्रणा विकसित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. थेट विक्री केलेल्या वस्तू किंवा सेवांमधल्या त्रुटीसाठी यांची विक्री करणाऱ्या संस्थांना जबाबदार धरलं जाणार आहे.

****

केंद्र सरकारनं वस्रोद्योग क्षेत्रासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. यासाठी येत्या पाच वर्षांत दहा हजार ६८३ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. विविध प्रकारचे कपडे, धागे यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एक ते ३१ जानेवारी दरम्यान ऑनलाइन अर्ज सादर करता येतील.

****

लातूर शहरात १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलांची संख्या ३३ हजार ४७७ एवढी आहे. या मुला-मुलींच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी शहरातली काही महाविद्यालयं तसंच माध्यमिक शाळांमध्ये १४ लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या १६ गावांमध्ये, केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन योजनेंतर्गतची मंजूर कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिले आहेत. राष्ट्रीय रुरबन मिशनच्या जिल्हास्तरीय नियामक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. कामं अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

****

औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत काल अर्जांची छाननी केली असता, ७४ अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हा दूध संघाच्या १४ जागांसाठी २२ जानेवारीला मतदान होणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातल्या नरवाडी शिवारात तोड सुरु असलेल्या ऊसाच्या फडाला वीज वितरण कंपनीच्या तारांच्या घर्षणामुळे आग लागली. ऊसाची तोड सुरु असल्याने फडात ऊसतोड मजूर महिला, लहान मुले, तसंच बैल आणि गाड्या होत्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.

****

No comments: