Thursday, 30 December 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.12.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरीकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं, पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज पुणे इथं एका कार्यक्रमात बोलताना, राज्यातल्या जनतेला नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असून, नागरीकांनी विनाकारण गर्दी करु नये, नववर्षाचं स्वागत घरी राहुनच करावं, असं त्यांनी म्हटलं आहे. अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले असून, आपल्या राज्यात अशी वेळ येऊ देऊ नये, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

****

दरम्यान, राज्यातल्या कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कृती दलाच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहेत.

****

राज्याच्या गृह विभागानं नववर्ष स्वागत कार्यक्रमासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नववर्षाचं स्वागत घरीच राहून करावं, असं सांगण्यात आलं आहे. बंदिस्त सभागृहातल्या कार्यक्रमांना, आसन क्षमतेच्या ५० टक्के तर खुल्या जागेतल्या कार्यक्रमांना, क्षमतेच्या २५ टक्के मर्यादेत उपस्थित राहायला परवानगी असेल. कार्यक्रमस्थळी कोविड नियमांचं पालन होण्याकडे विशेष लक्ष पुरवण्याची गरज असल्याचं, गृह विभागाच्या आदेशात म्हटलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १४३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ६३ लाख ९१ हजार २८२ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १४३ कोटी ८३ लाख २२ हजार ७४२ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १३ हजार १५४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २६८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या तीन कोटी ४८ लाख २२ हजार ४० झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख ८० हजार ८६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल सात हजार ४८६ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४२ लाख ५८ हजार ७७८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ८२ हजार ४०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.   

****

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला आज पहाटे रायपूर पोलिसांनी खजुराहो इथून अटक केली. त्याला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं झालेल्या दोन दिवसीय ‘धर्म संसद’ कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

जम्मू काश्मीरधल्या कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या दोन चकमकींमध्ये सहा दहशतवादी मारले गेले. कुलगाम जिल्ह्यातल्या मिरहामा परिसरात काल सुरक्षा बलाचे जवान शोधमोहीम राबवत असताना दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत दोन स्थानिक आणि एक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. तर अनंतनाग जिल्ह्यात नौगाम परिसरात झालेल्या अन्य एका चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. हे सर्व दहशतवादी जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, राज्यातल्या सर्व शाळांमध्ये तीन ते १२ जानेवारीदरम्यान, ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’, या अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या जीवन विकास ग्रंथालयाचा “सावित्रीबाई जोशी स्मृती पुरस्कार”, ‘माझा साहित्यिक प्रवास’ या लेखसंग्रहाचे लेखक प्रकाश कुलकर्णी यांना काल प्रदान करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ.कैलास अंभुरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन कुलकर्णी यांना गौरवण्यात आलं.

****

मुंबई विभागात कळवा-दिवा सेक्शन मध्ये ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आल्यामुळे नांदेड - मुंबई- नांदेड, आदिलाबाद - मुंबई - अदिलाबाद, जालना- मुंबई - जालना या रेल्वे एक, सात आणि आठ जानेवारीला रद्द करण्यात आल्या आहेत, परिणामी त्या परतीच्या प्रवासात दोन, आठ आणि नऊ जानेवारीलाही धावणार नाहीत. जालना-मुंबई -जालना ही रेल्वे दोन जानेवारीला धावणार नसल्याचं, रेल्वे विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...