Thursday, 30 December 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.12.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीरधल्या कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या झालेल्या दोन चकमकींमध्ये सहा दहशतवादी मारले गेले. कुलगाम जिल्ह्यातल्या मिरहामा परिसरात काल सुरक्षा बलाचे जवान शोधमोहित राबवत असताना दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत दोन स्थानिक आणि एक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. अनंतनाग जिल्ह्यात नौगाम परिसरात झालेल्या दुसऱ्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. हे सर्व दहशतवादी जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीवरच्या सवलतीला राज्य सरकारनं ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या अंतर्गत दुचाकींना १० हजार रुपये तर मालवाहू वाहनांना एक लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जाते. एक जानेवारीपासून सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना, फक्त इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करता येईल, तर एक एप्रिलपासून शासकीय वापरासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणारी वाहनं फक्त बॅटरीवर चालणारी असावीत, असं सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या शासन आदेशात नमूद केलं आहे.

****

राज्यात सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार असून, त्यासाठी जमीन तसंच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे. मुंबईत मध्य रेल्वेच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या चार्जिंग पोलचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. येत्या काळात अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

मुंबईच्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीनं साहित्यसेवेसाठी राज्यस्तरीय गुणीजन गौरव साहित्यरत्न पुरस्कार दिले जातात. यंदा औरंगाबाद इथले लेखक कवी रत्नकुमार गोरे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना कोविडची लागण झाली आहे. गेल्या आठवड्याभरात आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोविड तपासणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

No comments: