Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 December 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ डिसेंबर २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत
आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या
सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस
घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी
घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९
शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत
वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातल्या ४७ नगरपरिषदांवर मुदत संपताच
प्रशासकाची नियुक्ती करण्याचे नगरविकास विभागाचे आदेश
·
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानानं घेण्याचा राज्य
सरकारचा प्रस्ताव राज्यपालांकडून अमान्य
·
इतर मागास वर्गीयांना वगळून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
घेण्यास विरोध करणारा ठराव विधानसभेत एकमतानं मंजूर
·
एस टी कर्मचारी संपात सहभागी असलेल्या कामगारांच्या बडतर्फीचा
निर्णय मागे घेणार नाही- परिवहन मंत्री अनिल परब
·
राज्यात २६ नवे ओमायक्रॉन बाधित, नांदेड जिल्ह्यातील दोन रूग्णांचा
समावेश, कोविडचे एक हजार ४२६ रुग्ण, मराठवाड्यात १९ बाधित
आणि
·
राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी झाल्याची
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांची टीका
****
मराठवाड्यातल्या
आठ जिल्ह्यातल्या ४७ नगरपरिषदांवर मुदत संपताच प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश,
नगरविकास विभागानं काल जारी केले आहेत. कोविड संसर्गामुळे निवडणुका घेणं शक्य नसल्यानं,
आणि मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण
करण्यास, आणखी काही कालावधी लागणार असल्यानं, हा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या
कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद, जालना जिल्ह्यातल्या जालना, अंबड, भोकरदन, परतूर,
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठ, हिंगोली
जिल्ह्यातल्या वसमत, हिंगोली, कळमनुरी, बीड जिल्ह्यातल्या बीड, अंबाजोगाई, माजलगाव,
परळी, वैजनाथ, गेवराई आणि धारुर, नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर, माहूर, देगलूर, बिलोली,
धर्माबाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
उस्मानाबाद, भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परंडा, तुळजापूर, तर लातूर जिल्ह्यातल्या
उदगीर, अहमदपूर, औसा आणि निलंगा, या नगरपरिषदांवर, प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहेत.
****
विधानसभा
अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानानं घेण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी अमान्य केला आहे. आवाजी मतदानाची पद्धत घटनाबाह्य असल्याचं राज्यपालांनी
सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. या आक्षेपानंतर राज्य सरकारकडून पुन्हा राज्यपालांना
पत्र पाठवण्यात आलं आहे. सरकारने नियमात केलेले बदल योग्यच असून, आज सकाळी ११ वाजेपर्यंत
निवडणुकीला संमती द्यावी, असं सरकारनं या पत्रात म्हटलं आहे.
****
इतर
मागास वर्ग - ओबीसींना वगळून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात
येऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करणारा ठराव, काल विधानसभेत एकमतानं मंजूर झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव सभागृहात मांडला. ओबीसी त्यांच्या हक्कांपासून
वंचित राहण्याची शक्यता असल्याने, ओबीसी आरक्षण वगळून निवडणूक घेण्यात येऊ नये, अशी
शिफारस एकमताने करत असल्याचं अजित पवार यांनी हे विधेयक मांडताना नमूद केलं. विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रस्तावाला समर्थन दिलं. हे विधेयक संमत झाल्यामुळे
आता ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात
येणार आहे.
पुरवणी
मागण्यांसाठीचं विनियोजन विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं.
****
पर्यावरण
मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर विधान भवनाच्या पायऱ्यांवर आमदार नितेश राणे यांनी
मांजरीचा आवाज काढल्याच्या घटनेचा, विधानसभेत शिवसेनेच्या सदस्यांनी निषेध केला. नितेश
राणे यांनी माफी मागावी अशी मागणी करत सदस्यांनी सदनात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे विधानसभेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं. राणे यांच्या वक्तव्याविषयी
आज पीठासीन अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली आहे.
****
राज्य
परीवहन - एस टी कर्मचारी संपात सहभागी असलेल्या कामगारांच्या बडतर्फीचा निर्णय ताबडतोब
मागे घेता येणार नाही, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल विधानसभेत सांगितलं. या
कामगारांना अनेक संधी देऊनही काही कामगार कामावर परतले नसल्यामुळे, विलानीकरणासंदर्भात
त्रिसदस्यीय समितीचा जो अहवाल येईल तो राज्य सरकार मान्य करेल, असं ते म्हणाले. एसटी
कर्मचाऱ्यांचं वेतन यापुढे वेळेवरच होईल अशी ग्वाही परब यांनी दिली.
****
बीड
जिल्ह्यात मौजे वरपगाव या पुनर्वसन करण्यात आलेल्या गावासाठीच्या सोयी-सुविधेकरता प्रस्ताव
मागवून आवश्यक निधी एका महिन्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मदत आणि पुनर्वसन
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती दिली.
****
देशात
१५ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी येत्या एक जानेवारीपासून
नोंदणी करता येणार आहे. कोविन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी ही माहिती
दिली. यासाठी कोविन पोर्टलमध्ये नोंदणी वेळी ओळखपत्रासाठी “दहावीचं विद्यार्थी ओळखपत्र” सादर करता येणार आहे. काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा
इतर कुठलं ओळखपत्र नसू शकतं, त्यामुळे त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात
आली आहे.
****
सर्व
जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांत कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती
देण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते काल राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत बोलत होते. अधिक दक्षता बाळगून काटेकोर पावलं उचलण्याची गरज व्यक्त करत, मुख्यमंत्र्यांनी,
एक दोन दिवसांत राज्य कोविड कृती दलाची बैठक बोलावण्याचे निर्देश दिले. आरोग्य विभागाचे
अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी या बैठकीत केलेल्या सादरीकरणात, जानेवारीच्या
मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली.
****
राज्यात
काल ओमायक्रॉन बाधित नवे २६ रुग्ण आढळले. यामुळे आता राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित
रुग्णांची संख्या, १६७ झाली असून, यापैकी ७२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. काल आढळलेल्या
२६ नव्या रुग्णांपैकी मुंबईत ११, ठाण्यात चार, रायगड पाच, तर नांदेड जिल्ह्यात दोन
रुग्ण आढळले. नागपूर, पालघर, भिवंडी, आणि पुण्यात काल प्रत्येकी एक रुग्ण आढळला. यापैकी
१८ वर्षाखालील चार आणि अन्य तीन असे सात रुग्ण वगळता, इतर १९ जणांचं कोविड लसीकरण पूर्ण
झालेलं आहे. २१ रुग्णांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणं नाहीत, तर पाच रुग्णांमध्ये
सौम्य लक्षणं असल्याचं, आरोग्य विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे.
नांदेड
जिल्ह्यात आढळलेले दोन्ही रुग्ण महिला असून, त्या हिमायतनगर तालुक्यातल्या रहिवासी
आहेत. या दोन्ही महिला दक्षिण आफ्रिका या देशातून आल्या असून, त्यांच्यासोबत आलेल्या
अन्य एका पुरुष रुग्णाचा अहवाल प्रलंबित आहे.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ४२६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ५९ हजार ३९४ झाली आहे. काल २१ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
४५४ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ७७६ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख तीन हजार ७३३ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या १० हजार ४४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल १९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात सहा, औरंगाबाद चार, परभणी
आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी तीन, बीड दोन, तर उस्मानाबाद जिल्ह्यात एका रुग्णांची
नोंद झाली. हिंगोली तसंच जालना जिल्ह्यात काल एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
****
राज्यातल्या
जनतेचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी झालं असल्याची टीका, केंद्रीय आरोग्य राज्य
मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केली. त्या काल उस्मानाबाद इथं प्रसारमाध्यमांशी बोलत
होत्या. एसटी कर्मचारी संपामुळे विस्कळीत जनजीवन, अनेक परीक्षांमध्ये घोटाळे, तसंच
केंद्रावर वारंवार आरोप करून जबाबदारी टाळण्याचं राज्य सरकारचं धोरण, अशा अनेक मुद्यांवरून
त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचा
आरोपही पवार यांनी केला, त्या म्हणाल्या..
ब्लॅक लिस्ट झालेल्या एजन्सी
असतील त्यांना जबाबदारी द्यायची, विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं, म्हणजे चाललं काय
आहे राज्यात? एस टी कर्मचार्यांचे संप चालु आहे, त्या बाबतीत काय? म्हणजे कुठेच असं
सुरळीत गाडा चालुए राज्याचा असं कधीच नसतं. जनतेला चिंतेत ढकलण्याचं काम चालुए. आणि
अजुनही काही अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी राज्य सरकारचं धोरणच दिसत नाही. केंद्र
सरकार राज्यांना मदत करते, राज्यांच्या माध्यमातून ही मदत गावागावात पोहोचते. परंतू
प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलून चालणार नाही.
****
ओमायक्रॉनचा
संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणावर भर देणं आवश्यक असून, कोविड लसीच्या दुसऱ्या मात्रेचं
नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते. ६० वर्षावरील नागरिकांचं
प्राधान्यानं लसीकरण, १५ वर्षावरील मुलांचं लसीकरण, तसंच आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या
बुस्टर डोससाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
अतिवृष्टीग्रस्त
शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान काँग्रसेच्या
वतीनं, काल जालना इथं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षातच धरणे आंदोलन करण्यात आलं.
या मागणीचे एक निवेदन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
मराठा
आरक्षण आंदोलनाच्यावेळी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख
रुपये देण्याच्या आश्वासनाची, महाविकास आघाडी सरकारने पूर्तता केली आहे. यात लातूर
जिल्ह्यातल्या चार जणांच्या वारसांसाठी हा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा प्रशासनाने
तो त्वरित वितरित करावा असे निर्देश लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी
दिले आहेत.
****
जालना
- मुंबई - जालना जनशताब्दी एक्सप्रेस, आणि मुंबई - अदिलाबाद - मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस
येत्या दोन, आठ आणि नऊ जानेवारीला रद्द करण्यात आली आहे. तर नांदेड - मुंबई - नांदेड
राज्यराणी एक्सप्रेस येत्या एक, सात आणि आठ जानेवारीला रद्द करण्यात आली आहे. ठाणे
जिल्ह्याच्या कळवा आणि दिवा इथं ट्रफिक ब्लॉक आणि तांत्रिक कारणामुळे या रेल्वेगाड्यांच्या
फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
विदर्भात
काही ठिकाणी रात्रीच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय, तर मराठवाडा आणि मध्य
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली. आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी
पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment