Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल
करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे.
सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस
घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी
घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19
शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी
किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
**
कोविडच्या ओमायक्रॉन या नव्या स्वरुपाशी
लढण्यासाठी स्वयंजागरुकता, स्वयंशिस्त आवश्यक - मन की
बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
**
ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास राज्य सरकार कठोर निर्बंध लावू शकतात -
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
**
अहमदनगर जिल्ह्यात टाकळी ढोकेश्वर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात आणखी ३३ जणांना कोविड
संसर्ग; बाधितांची एकूण संख्या ५२
आणि
**
भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यात
पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याला प्रारंभ
****
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या स्वरुपाशी लढण्यासाठी
स्वयंजागरुकता, स्वयंशिस्त आवश्यक असून आपली सामुहिक शक्ती
कोरोनाचा पराभव करेल, या विश्वासासह आपणा सर्वांना २०२२ या
वर्षात प्रवेश करायचा आहे, असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या
कार्यक्रम शृंखलेच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत होते. तामिळनाडू मध्ये हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेले देशाचे पहिले संरक्षण
दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पंतप्रधानांनी यावेळी
गौरवपूर्ण उल्लेख केला.
या अपघातात मृत्युशी अनेक दिवस झुंज दिल्यानंतर मरण पावलेले कॅप्टन वरुण सिंह
यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्राचा ही मोदी यांनी उल्लेख
केला. या पत्रात दिवंगत वरुण सिंह यांनी आपल्या यशाचा नव्हे तर आपल्या कमतरतांचा
संदर्भ दिला असून आपल्यातल्या उणीवांवर मात करण्यासाठी, विशेष करुन विद्यार्थ्यांकरीता हे पत्र प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान
यावेळी म्हणाले.
परीक्षांपूर्वी आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करणार असून या कार्यक्रमासाठी आजपासून
२ दिवसांनंतर mygov.in या संकेतस्थळावर नोंदणी
करता येणार आहे. २८ डिसेंबर पर्यंत नोंदणी उपलब्ध असून यात ९ वी ते बारावीचे
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित
करण्यात येणार आहे, यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं
आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.
पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेनं इतर देशांच्या
लोकांना महाभारताच्या महत्त्वाविषयी परिचय करुन देण्यासाठी सुरु
केलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाबद्दल आणि देशविदेशातून त्याला मिळणाऱ्या
प्रतिसादाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संवादातून
प्रशंसा केली.
****
आरोग्य कर्मचारी आणि प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात
येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लसीचा तिसरा संरक्षक
म्हणजेच बुस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केलं आहे. या लसीकरणाचं राज्यात
योग्य पद्धतीनं नियोजन केलं जाईल,
असं यांनी सांगितलं.
बूस्टर डोस देण्यासंदर्भात अलिकडेच राज्य
मंत्रिमंडळात चर्चा झाली होती, आणि आमची ती मागणी होतीच,
असं मुख्यमंत्री म्हणाले. पंधरा ते अठरा
वयोगटातील मुलांचं देखील लसीकरण केल्यामुळे विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तसंच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील बुस्टर
डोसमुळे लाभ होईल, असं मुख्यमंत्री
ठाकरे म्हणाले.
****
ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास राज्य
सरकार कठोर निर्बंध लावू शकतात, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी म्हटलं आहे. त्या आज सांगली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत
होत्या. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार प्रतिबंधित क्षेत्र - कंटोनमेंट झोन तयार करणं, कडक
नियमावली लावणं, हे निर्णय राज्य सरकारनं घ्यायचे असल्याचं, पवार यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या...
केंद्रसरकार सातत्याने कोविड नियंत्रणासाठी आपल पथक पाठवत असत त्या त्या राज्यात
संख्या वाढल्या तर तिथ गाईडलाईन देत असते, त्या राज्याशी चर्चा पण करत असते आणि एक
लक्ष ठेवून असते. आता लॉकडाऊनचा विषय हा राज्य सरकारचा असतो. एखाद्या ठिकाणी पेशंटची
संख्या वाढली तर तिथल नियंत्रण करन असेल, कंटोनमेंट झोन असतील किंवा तिथली व्यवस्था असेल, ती राज्याने द्यायची असते. गरज पडल्यास
लॉकडाऊनचा विषय असेल तर राज्यसरकारला ते अधिकार आहेत, ते करु शकतात.
ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग लवकर होतो आणि तो बरा देखील लवकर होतो,
तरीही नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता पवार
यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दोन
पॅकेज मधून विशेष मदत करण्यात आली यातून राज्यांना आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध
खरेदी करता येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.
****
अहमदनगर
जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयातले आणखी
३३ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. या विद्यालयातले १९ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून
आल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांची कोविड तपासणी करण्यात आली, त्यातून हा निष्कर्ष
समोर आला. त्यामुळे या विद्यालयातल्या एकूण बाधितांची संख्या ५२ झाली आहे.
दरम्यान,
बीड जिल्ह्यात आज एकही नवीन कोविडग्रस्त आढळला नाही.
****
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी परिसरात आज पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. ३ पूर्णांक ९ रिस्टर स्केल
इतक्या तीव्रतेचा या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू भूगर्भात १० किलोमीटर खोल नोंदवला गेला.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या
कसोटी क्रिकेट सामन्याला आज दक्षिण आफ्रिकेतल्या
सेंच्युरिअन इथं सुरूवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून
पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त
हाती आलं तेव्हा भारताच्या दोन बाद
१५७ धावा झाल्या होत्या. मयंक अग्रवाल ६० धावांवर तर चेतेश्वर
पुजारा शून्यावर बाद झाला. सध्या लोकेश राहूल ६८ तर कर्णधार विराट कोहली १९ धावांवर खेळत आहे. तीन
कसोटी सामन्यांच्या या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एक दिवसीय
सामन्यांची मालिकाही होणार आहे.
****
बीड
इथं आज दहा किलोमीटर अंतराची मॅरेथॉन
स्पर्धा घेण्यात आली. आमदार विनायक मेटे, अभिनेता देवदत्त नागे, स्नेहा कोकणे यांनी सकाळी साडे सहा
वाजता हिरवा झेंडा दाखवल्यावर या स्पर्धेला सुरुवात झाली. सर्वांना उत्तम आरोग्य मिळावं तसंच प्रत्येकानं आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं या हेतूनं या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याचं आमदार विनायक मेटे यांनी यावेळी सांगितलं. मराठवाडा लोक विकास मंच मुंबई, कैलासवासी अण्णासाहेब
पाटील प्रतिष्ठान आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमात
तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
****
नागालँड इथं होणाऱ्या ५६ व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातून ३२ खेळाडूंची निवड करण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या जत इथं निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राज्यातून सातशे पाच
खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते यावेळी
विजेत्या खेळाडूंना बक्षीसं प्रदान करण्यात आली.
****
'दास्तान-ए-बड़ी
बांका' या विशेष सादरीकरणातून औरंगाबादकरांनी आज मुंबई नगरीच्या अनोख्या दर्शनाचा अनुभव
घेतला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय केंद्र, महात्मा गांधी मिशन आणि अभ्युदय
फाउंडेशन यांच्या वतीनं सादर झालेल्या या कार्यक्रमात धनश्री खंडकर आणि अक्षय शिंपी
यांनी हावभाव आणि संवादातून मुंबईतल्या लोकलची कथा, लेडीज डब्यातले किस्से, लोकलच्या
आत आणि बाहेर घडणाऱ्या घटना, स्टेशनवरचे संवाद आदी प्रसंग सादर केले.
****
लातूर शहरातल्या सर्व प्रभागांमध्ये आज संजय गांधी
निराधार योजना समाधान शिबीर घेण्यात आलं. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख यांच्या हस्ते शहरातल्या प्रभाग क्रमांक १४ इथं या शिबिराचा शुभारंभ करण्यात
आला. शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी
यावेळी या योजनेपासून एकही पात्र नागरिक वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल असं
आश्वासन दिलं.
****
No comments:
Post a Comment