Sunday, 26 December 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 December 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi

 

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 December 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

** १५ ते १८ वयोगटातील मुलांचं तीन जानेवारी पासू कोविड लसीकरण करण्याची पंतप्रधानांची घोषणा, आरोग्य आणि प्रत्यक्ष रुग्ण संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० जानेवारीपासून बुस्टर डोस तर ज्येष्ठ नागरिकांनाही वैद्यकीय सल्ल्यानुसार लसीची तिसरी मात्रा देणार

** राज्यात कोविड संसर्गाचा दर दुप्पट, ओमायक्रॉनची रुग्णसंख्याही वाढली

** औरंगाबादमध्ये दोन नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्ण, राज्यात एक हजार ४८५ तर मराठवाड्यात २२ नवे कोविड बाधित रुग्ण

** शिक्षक पात्रता परिक्षा घोटाळ्यातील आरोपी अश्विन कुमारकडून २४ किलो चांदी दोन किलो सोनं आणि हिरे जप्त

** राजकारणापलिकडे मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

आणि

** भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान आजपासून पहिला कसोटी क्रिकेट सामना

****

देशात ओमायक्रान या नव्या विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल १५ ते १८ वयोगटातील मुलांचं कोविड लसीकरण येत्या तीन जानेवारी पासू सुरु करण्याची घोषणा केली. काल रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते बोलत होते. त्याच बरोबर येत्या १० जानेवारीपासून आरोग्य आणि प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिसरा संरक्षक म्हणजेच बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात येईल अशी घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. ज्येष्ठ नागरिकांनाही वैद्यकीय सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून हा प्रतिबंधात्मक डोस देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

नाकावाटे दिली जाणारी आणि जगातली पहिली डीएनए लस देण्यासही देशभरात लवकरच सुरुवात होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं.

अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असून भारतातही संसर्ग वाढआहे. मात्र, देशवासियांनी घाबरुन न जाता सतर्क रहावं आणि सातत्यानं कोविडविषयक नियमावलीचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं.

      सद्यस्थितीत देशभरात १८ लाख एकल खाटा, प्राणवायुची व्यवस्था असलेल्या ५ लाख खाटा, १ लाख ४० हजार आयसीयू खाटा तर मुलांसाठी ९० हजार विशेष खाटांची उपलब्धता आहे. ९० टक्के नागरिकांचं प्रथम लसीकरण झालं असून, ६१ टक्के नागरिकांनी दुसरी लस घेतली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. देशरात ३ हजारांहून अधिक प्राणवायू प्रकल्प कार्यान्वित असून राज्यांना बफर स्टॉक म्हणजे मध्यकृत साठा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करत असल्याचं ही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात कोविड संसर्गाचा दर दुप्पट झाला असून, ओमायक्रॉनची रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून सर्व कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते काल जालना इथं माध्यमांशी बोलत होते. राज्यात कोविडची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनची असेल, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता, सण तसंच नववर्षाचं स्वागत करताना, निर्बंधांकडे दुर्लक्ष करू नये, अशी सूचना टोपे यांनी केली आहे. ते म्हणाले..

 

माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की, आपण सण आहे. नवीन वर्षाचं स्वागत आहे. निश्चित प्रकारे करावं, परंतू निर्बंध लक्षात घेऊन त्याचं अनुपालन करत करत या सगळ्या गोष्टी कराव्यात. सध्या जो सहाशे सातशेचा आकडा दररोजचा होता, तो आता चौदाशेवर दररोज चालला आहे. याची गती जर अशी वाढत गेली तर हे नक्कीच आहे की, तिसरी लाट जर आली तर ती आता ओमायक्रॉनचीच राहील. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना काळजी घ्यायची आहे. एवढीच माझी यानिमित्ताने नम्रता पूर्वक सुचना आहे.

****

औरंगाबाद शहरात  काल २ नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले. यामुळे आता राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या, ११० झाली असून, यापैकी ५७ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. काल आढळलेल्या दोन नव्या रुग्णांपैकी एक रुग्ण लंडनहून कुटूंबासह मुंबईमार्गे औरंगाबादमध्ये आला आहे. या कुटुंबातली एक तरुणी मुंबईत झालेल्या तपासणीत ओमायक्रॉन बाधित आढळली होती, तिच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. तिचे ५५ वर्षीय वडील औरंगाबाद इथं झालेल्या तपासणीत बाधित आढळले. दुसरा रुग्ण ३३ वर्षाचा तरुण असून, तो दुबईहून औरंगाबाद इथं आला आहे. दोन्ही रुग्णांचं कोविड लसीकरण पूर्ण झालेलं आहे. एका रुग्णात संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, तर दुसऱ्या रुग्णात सौम्य लक्षणं दिसत असल्याचं, आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ४८५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ५६ हजार २४० झाली आहे. काल १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ४१६ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल ७९६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख दोन हजार ३९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या नऊ हजार १०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर एक ही मृत्यू झाला नाही.  औरंगाबाद मध्ये काल ९ नवे रुग्ण आढळले, लातूर जिल्ह्यात ६ , जालना ४, बीड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्य्की २ तर उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला. हिंगोली जिल्ह्यात काल एकही रुग्ण आढळला नाही.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

लोकशाहीत सत्तेच्या माध्यमातून गरीबांचे अश्रू पुसायचे असतील तर सर्वांनी दिवगंत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचं सुशासन अंगिकारणं आवश्यक असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नागपूर इथं वाजपेयी यांच्या जयंती निमित्त सुशासन दिवस कार्यक्रमात बोलत होते.

****

वाजपेयी यांच्या जयंती निमित्त काल उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोहित शशिकांत निंबाळकर यांना रक्तदान सेवेबद्दल, बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं अनाथ मुलांसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारे गर्जे दांपत्य आणि वर्षानुवर्षे करत असलेल्या अंत्यविधीच्या सेवेसाठी उस्मानाबाद इथले बाळासाहेब गोरे यांना लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

शिक्षक पात्रता परिक्षा - टीईटी घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अश्विन कुमारकडून पोलिसांनी मोठं घबाड जप्त केलं आहे. पुणे पोलिसांच्या एका पथकाने आरोपी अश्विन कुमार याच्या बंगळुरू इथल्या घरातून काल रात्री तब्बल २४ किलो चांदी, दोन किलो सोनं आणि काही हिरे जप्त केले आहेत. अश्विनकुमार हा जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख आहे.

****

राजकारणापलिकडे मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला आपलं प्राधान्य असल्याचं, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काल नांदेड इथं कर्मचाऱ्याकरिता निवासी संकुलाचे भूमिपूजन आणि सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचं उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. परभणी, हिंगोली आणि इतर जिल्ह्यामध्ये विकास कामांची अत्यावश्यकता आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन जे प्रकल्प पूर्ण करता येतील त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी बोलताना, मराठवाड्याच्या विकासात दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या योगदानाला उजाळा दिला.

****

आरोग्य भरतीच्या परीक्षेबाबत विधिमंडळात चर्चा झाली असून, पुन्हा परीक्षेबाबतचा निर्णय पोलीस तपासाचा अहवाल आल्यानंतर घेतला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. ते काल जालन्यात बोलत होते. यापुढे राज्यात खाजगी संस्थांना परीक्षेचं कंत्राट दिलं जाणार नाही असंही टोपे यांनी सांगितलं. परीक्षा घेण्याच्या पद्धतीत बदल करून परीक्षा कोणत्या संस्थेमार्फत घ्यायच्या याबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल असं टोपे म्हणाले.

****

११ व्या झेप साहित्य संमेलनाला काल औरंगाबादमध्ये प्रारंभ झाला. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर वासुदेव मुलाटे, संयोजक डी एन जाधव, पुंडलिक अतकरे, डॉक्टर बलराज पांडवे, डॉक्टर सावली राउत, उत्तम बावीस्कर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लोकशाहीर नारायण जाधव समाजभूषण पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. या समेलनात ग्रंथप्रदर्शन तसंच अनेक परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.

****

उस्मानाबाद इथल्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष केशव तुकाराम पाटील यांचं काल राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. उस्मानाबाद जनता बँकेचेही ते काही काळ संचालक होते. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. उस्मानाबादच्या शैक्षणिक वाटचालीत त्यांचा मोठा सहभाग होता.

****

उस्मानाबाद जिल्हा मजूर सहकारी संघाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे नारायण नन्नवरे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. संघाच्या काल झालेल्या सभेमध्ये ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान आजपासून कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज दुपारी दीड वाजता दक्षिण आफ्रिकेतल्या सेंच्युरियन इथं सुरु होईल

****

परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून मतदार संघातल्या नागरिकांसाठी शासकीय योजना-मोफत मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या मोफत मदत केंद्राचं उद्घाटन काल उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. मदत केंद्राच्या माध्यमातून शंभर लाभार्थ्यांना ई-श्रम-कार्डचं मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं.

****

लातूर शहरातल्या दिव्यांग, निराधार, विधवा आणि इतर पात्र व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रभागात समाधान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विधिज्ञ किरण जाधव यांच्या हस्ते लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये समाधान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

****

नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या आदर्श गाव शेळगाव गौरी इथं काल २५  कुटुंबातील महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस सिलेंडर, शेगडीचं जिल्हा परिषद सदस्य माणिक लोहगावे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. यावेळी सरपंच मनोहर तोटरे उपस्थित होते.

****

इतर मागासवर्ग ओबीसी आरक्षणासंदर्भात समता परिषद आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलच्या वतीनं काल औरंगाबाद इथं सेवन हिल परिसरात निषेध म्हणून केंद्र सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात रस्त्यालगत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. सुरक्षित आणि पोषक अन्नाशी संबंधित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. शहरात पुरवठा होणाऱ्या दुधाची शुद्धता तपासणी करावी, अन्न प्रक्रिया आणि निर्मिती उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, रस्त्यालगत असलेल्या अन्न पदार्थांच्या गाड्यांवरच्या पदार्थांची गुणवत्ता तपासणी करावी, तसंच पदार्थ तळण्यासाठी तेलाचा दोन पेक्षा अधिक वेळा पुनर्वापर वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अन्न औषध प्रशासनाला दिले आहेत.

****

हवामान -

राज्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र हवामान कोरडं राहिल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळ ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

//************//

 

 

No comments: