आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात कोरोना
विषाणू बाधित रुग्णांचं वाढतं प्रमाण आणि ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग यामुळे पुन्हा निर्बंध
लागू करण्यात आले आहेत. हे सर्व निर्बंध आज मध्यरात्रीपासून लागू होतील. खुल्या मैदान
किंवा बंदिस्त सभागृहातल्या विवाह सोहळय़ांमध्ये, तसंच सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक
कार्यक्रमांत फक्त ५० लोकांना आणि अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.
रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार
स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत.
****
केंद्र सरकारनं
ग्राहक हक्क संरक्षण आयोगांचे कार्यक्षेत्र निर्धारित करणाऱ्या नियमांची अधिसूचना प्रसिद्ध
केली. यानुसार ५० लाखापर्यंतच्या तक्रारी जिल्हा आयोगात, दोन कोटींपर्यंतच्या राज्य
आयोगात तर त्यावरच्या राष्ट्रीय आयोगात दाखल कराव्या लागतील. ग्राहक संरक्षण कायदा
२०१९ मध्ये ग्राहक आणि विक्रेते यांच्यातल्या वादांवर तोडगा काढण्यासाठी त्रिस्तरीय
रचना अस्तित्वात आली आहे.
****
सोलापूर - औरंगाबाद
राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबाद जवळील आळणी फाटा इथं प्रवासी कार आणि मालवाहू कंटेनर
यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे हा अपघात
झाला. मृत चौघेही एकाच कुटुंबातले असून, ते लातूरला जात होते असं पोलिसांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या
मुदखेड तालुक्यातल्या राजवाडी इथले शेतीनिष्ठ ऊस भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगवानराव
पाटील राजवाडीकर यांचं काल निधन झालं, ते ९१
वर्षांचे होते. विक्रमी ऊस उत्पादनासाठी २००७ मध्ये त्यांना वसंतदादा शुगर इन्स्ट्युटचा
ऊस भुषण पुरस्कार देण्यात आला होता.
****
राज्यातल्या
विविध १२ सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्य सांस्कृतिक
पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येतं. या वर्षापासून ‘आचार्य पार्वतीकुमार’ यांच्या नावानं
नृत्य क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
****
मराठवाड्यात
काल ५३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment