Friday, 31 December 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      कापड उत्पादनांवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती.

·      शेतमालाला आधारभूत किंमत आणि नफा मिळवून देणारं सॉफ्टवेअर सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून विकसित.

·      शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी आणखी दोघांना अटक.

आणि

·      मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी; कोविड नियम पालन करण्याचं शासनाचं आवाहन.

****

****

कापड उत्पादनांवरील वस्तू आणि सेवा कर - जीएसटी दर पाच टक्क्यांवरून १२ टक्के करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली इथं झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्यासह सर्व राज्यांचे अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. कापड उत्पादनांवरील जीएसटी दर पाच टक्क्यांवरून १२ टक्के करण्याचा निर्णय या सप्टेंबरमध्ये घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी उद्या १ जानेवारी २०२२ पासून होणार होती. अनेक राज्यांचे आक्षेप लक्षात घेऊन कापड उत्पादनांवर १२ टक्के दराने जीएसटी लावण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात ल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स -कॅटने या निर्णयाला दिलेल्या स्थगितीचं स्वागत केलं आहे. कपड्यांप्रमाणेच पादत्राणांवर जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलणं आवश्यक असल्याचं मत कॅट चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केलं.

****

शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत आणि नफा मिळावा, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. या सॉफ्टवेअरला पेटंट मिळाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. 'ऍन इंटिलीजेंट सिस्टीम अँड ए मेथड फॉर सिस्टिमेटिक डिस्ट्रीब्यूशन ऑफ अग्रिकल्चर गुड्स' असे या सॉफ्टवेअरचे नाव असून, केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे यांना यासंबंधी पेटंट जाहीर झालं आहे. कोणत्या वेळी कोणतं पीक घ्यावं, विविध शेती मालाला कोणत्या कालावधीमध्ये भाव प्राप्त होतो, तसंच कोणत्या विभागांमध्ये त्या पिकाला दर मिळतो, यासंदर्भात हे सॉफ्टवेअर मार्गदर्शन करू शकते. जिल्हानिहाय विक्री तसंच वितरण व्यवस्था देखील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करता येणार असल्याचं कुलगुरू डॉ फडणवीस यांनी सांगितलं.

****

शिक्षक पात्रता परीक्षा -टीईटी गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे याला गुन्हे शाखा पोलिसांनी आज अटक केली. घोलप याने २०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षे अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतले. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावं आणि हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्स ॲपवर पाठवत होता. घोलपकडून ते अन्य साथीदाराला पाठवलं जात असल्याचं तपासात समोर आलं आहे. न्यायालयानं घोलप तसंच डोंगरे या दोघांना ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनल विजयी झालं असून महाविकास आघाडी प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचा पराभव झाला आहे. सिद्धिविनायक सहकार पॅनलला ११ तर सहकार समृद्धी पॅनलला ८ जागा मिळाल्या. सहकार पॅनलचे प्रमुख सतीश सावंत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मतं मिळाली यात चिठ्ठी काढून विठ्ठल देसाई विजयी झाले.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वच्या सर्व जागा मिळविण्यात अपयश आल्यानं राजन तेली यांनी सिंधुदूर्ग भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. स्वतः राजन तेली यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

****

मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळीकडे जय्यत तयारी दिसून येत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २०२२ या नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकाने राज्यासाठी तसेच समाजासाठी अधिक निष्ठेनं आणि समर्पण भावनेनं कार्य करण्याचा संकल्प करावा, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, आरोग्यदायी संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे. नववर्षाचं स्वागत करताना, कोरोना संकटाचं भान राखावं. आपल्या वागण्यातून कोविड संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नववर्षाचं स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यचं भान राखत संयमाने करावं, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.

मावळत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरं तसंच पर्यटनस्थळं, चौपाट्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व चौपाट्या बंद करण्यात आल्या आहेत. सर्व पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

 

शिर्डी इथल्या साईबाबांच्या मंदिरावर नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा गाभाराही आकर्षक फुलांनी सजण्यात आला आहे.

खंडाळा-लोणावळा या सर्वात मोठ्या पर्यटन स्थळ असलेल्या भागात नवीन वर्षाच्या स्वागत समारंभासाठी कोणताही बंगला, लॉज, किंवा जागा भाड्याने देऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सूचना स्थानिक जिल्हा प्रशासनानं लोणावळा तसच खंडाळातल्या सर्व हॉटेल्स तसंच बंगला मालकांना बजावली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथं नववर्षाचं स्वागत जल्लोषात आणि आतिषबाजीनं करण्यात आलं.

****

No comments: