Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 December 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ डिसेंबर २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत
आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना
आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही,
त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क
वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक
माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
१०० कोटी रुपये खंडणी प्रकरणी ईडीकडून अनिल देशमुख यांच्याविरुद्ध
आरोपपत्र दाखल.
·
हिंगोली जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या अपघातात चार जणांचा मृत्यू.
·
बनावट नोटा तयार करून चलनात आणणाऱ्या पाच जणांना औरंगाबाद इथं
अटक.
·
अहमदनगर
बीड परळी मार्गावर बारा डब्यांच्या रेल्वेची चाचणी.
आणि
·
सेंच्युरियन कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर
विजयासाठी ३०५ धावांचं लक्ष्य.
****
१००
कोटी रुपये खंडणी प्रकरणी सक्तवसुली संचालनालय- ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध
आज आरोपपत्र दाखल केलं. सहा हजार पानांच्या या आरोपपत्रात देशमुख यांचा मुख्य आरोपी
म्हणून, तर त्यांची दोन मुलं, ऋषिकेश आणि सलील यांचाही आरोपपत्रात समावेश करण्यात आला
आहे. अनिल देशमुख गेल्या २ नोव्हेंबरपासून ईडीच्या अटकेत असून, सध्या ते न्यायालयीन
कोठडीत आहेत. या प्रकरणातलं हे दुसरे आरोपपत्र असून देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव
पांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याविरुद्ध ऑगस्ट महिन्यात पहिले आरोपपत्र
दाखल करण्यात आलेलं आहे.
****
कोल्हापूर
जिल्ह्यात आज ओमायक्रॉन विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला. जिल्ह्यात एका कुटुंबातल्या
चौघांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. यातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल
करण्यात आलं. चौघांपैकी तिघांची ओमायक्रॉन विषाणूसंदर्भात तपासणी करण्यात आली. या तपासणीच्या
अहवालात एका रुग्णाला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे
राज्यातली या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १६९ झाली आहे.
****
राज्यातल्या
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत तिपटीनं वाढली असून, संसर्गदर
यापुढे वाढण्याची भीती, आरोग्य विभागानं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शासनानं
घालून दिलेल्या नियमांचं सर्वांनी वेळोवेळी पालन करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी केलं आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात आज बस आणि ट्रकच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर २४ प्रवासी जखमी
झाले. हिंगोली- नांदेड रस्त्यावर कळमनुरी तालुक्यातल्या पारडी मोड जवळ ट्रक आणि लक्झरी
बस यांच्यात आज दुपारी हा अपघात झाला. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्यानं,
त्यांना उपचारासाठी नांदेड इथं हलवण्यात आलं आहे.
****
बनावट
नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या पाच जणांच्या टोळीला औरंगाबाद पोलिसांनी आज अटक
केली. शहरात एका दारूच्या दुकानात काही इसम बनावट नोटा देऊन दारू खरेदी करत असल्याची
माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधारे विशेष पोलीस पथकानं सापळा रचून ही कारवाई केली.
या टोळीकडून १ लाख २० हजार रुपये दर्शनी मूल्याच्या ५००, १०० आणि ५० रुपयांच्या बनावट
चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. नोटा तयार करण्यासाठी वापरात येणारं साहित्य, वाहतुकीसाठी
वापरलेली कार आणि पाच मोबाईल असा एकूण तीन लाख १० हजार ३९० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात
आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून दोन
लाख ९८ हजार ५३० रुपयांचा अवैध मुद्येमाल जप्त केला. काल रात्री टाकलेल्या छाप्यात
तीन जणांना अटक करून त्यांच्याकडून देशी मद्याच्या १ हजार ८४० बाटल्या आणि एक चार चाकी
वाहन जप्त करण्यात आलं. दरम्यान, रेणापूर तालुक्यात ग्रामीण भागातल्या चार ढाब्यांवर
छापे टाकून चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे दोनशे लीटर देशी तसंच विदेशी
मद्य जप्त करण्यात आलं.
****
धुळे
जिल्हा आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आणि उपविभागीय
कार्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुशासन सप्ताहांतर्गत अनुसूचित
जमातीच्या मुलांना जातीच्या दाखल्यांचं आज मोफत वाटप करण्यात आलं. या उपक्रमात एकाच
दिवशी एक हजार आठ विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. प्रकल्प अधिकारी
तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
****
अहमदनगर बीड परळी मार्गावर
आज नगर ते कडा या ४१ किलोमीटर अंतरावर बारा डब्यांच्या रेल्वेची चाचणी झाली. आष्टी
रेल्वेस्थानकावरून बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा
दाखवून रवाना केलं. खासदार मुंडे यांनी या बद्दल आनंद व्यक्त करत, रेल्वेसाठी अनेक
दशकं लढाई देणाऱ्या घटकांचं अभिनंदन केलं आहे.
****
दक्षिण
आफ्रिकेत सेंच्युरियन इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं ३०४
धावांची आघाडी घेत, दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी ३०५ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
भारतानं कालच्या एक बाद १६ धावसंख्येवरून आज खेळ पुढे सुरू केला. ऋषभ पंतच्या ३४ धावा
वगळता अन्य एकही फलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही. शार्दुल ठाकूर १०, रविचंद्रन
अश्विन १४, चेतेश्वर पुजारा १६, कर्णधार विराट कोहली १८, अजिंक्य राहणे २०, तर के एल
राहुल २३ धावांवर बाद झाले. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताचा दुसरा डाव १७४ धावांवर
संपुष्टात आला होता.
****
लातूर
जिल्ह्यात शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेची अंमलबजावणी
करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील दारिद्र्य रेषेखालील
भूमिहीन शेतमजूर, विधवा महिला, परितक्त्या महिला यांना, शंभर टक्के अनुदान तत्वावर
चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करुन देण्यात येते.
****
“द्विशिक्षकी
शाळांचे सक्षमीकरण” या विषयावर औरंगाबाद इथं एक चर्चासत्र घेण्यात आलं. शिक्षण विकास
मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं औरंगाबाद इथलं विभागीय केंद्र यांच्या वतीनं घेण्यात
आलेल्या या चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी द्विशिक्षकी शाळांचं सक्षमीकरण करत असताना
जिल्हा परिषदेच्या द्विशिक्षकी शाळांची गुणवत्ता वाढवण्याचं मतही मान्यवरांनी व्यक्त
केलं.
****
No comments:
Post a Comment